व्हिएस न्यूज- मैत्रिणीच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने तरूणासह रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करत दहशत माजविली. वाहनांची तोडफोड करत एकाला बेदम मारहाण केली. ही घटना दिघीतील भारत मातानगर येथे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
सोमेश्वर सोळंके असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांच्या डोक्यात आणि पोटात मारहाण करण्यात आली. सुरज जयस्वाल (वय 24, रा. वडमुखवाडी, चहोली) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जयस्वाल यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, याचा राग टोळक्याला आला. सहा जणांच्या या टोळक्याने भारत मातानगर येथे येऊन जयस्वाल याला शिवीगाळ केली. रस्तयाने ये-जा करणाऱ्यांनाही शिवीगाळ करत दहशत माजवली. तसेच सोळंके यांनाही बेदम मारहाण केली. फौजदार फारूक सोलापूरे तपास करत आहेत.