व्हीएस न्यूज - पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये प्रभागातील विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे. प्रभागातील वारंवार उद्भवणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तसेच सांडपाण्याच्या समस्या नियोजनासंदर्भातील विकासकामांनी वेग धरला आहे. भाजपाचे नगरसेवक नामदेवराव ढाके यांच्या वारंवार सुरु असलेल्या पाठपुराव्याने आगामी काळातील अडचणींचा विचार करून विकासकामे मार्गी लावण्यात येत आहेत.
गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून तत्कालीन नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षांमुळे प्रभागातील विकास खालावला होता. त्यामुळे पावसाळ्यात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येवून स्थानिकांच्या घरात शिरत होते. याबाबत तत्कालीन नगरसेवकांकडे वारंवार मागणी करून देखील नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात होते.
परंतु, ढाके यांनी निवडणुकीच्या पहिल्याच वर्षी विकासकामांचा पाठपुरावा सुरु केला आहे. त्यांनी पहिल्याच वर्षी प्रभागात कमी दाबाचा होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या समस्येकडे गांर्भीयाने लक्ष देवून पाण्याची समस्या सोडविली. यासह रस्ते डांबरीकरणावर भर दिला. इतकेच नव्हे तर बिजलीनगर, चिंचवडे नगर, समर्थ कॉलनी, चिंतामणी चौक, दगडोबा चौक आदी भागातील ड्रेनेजचे काम मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी- चिंचवड शहरातील बिजलीनगर या परिसरात प्रवाशांच्या वाहतुकीसाठी शटल सेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक नामदेव ढाके यांनी केली आहे. याबाबत मागणीचे निवेदन पुणे महानगर परिवहन महामंडळाचे वाहतुक व्यवस्थापक, स्वारगेट यांना देण्यात आले आहे.
नगरसेवक ढाके यांनी निवेदनात म्हटले आहे की, बिजलीनगर, गुरुद्वारा, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज, रावेत परिसर, वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर या भागात बहुतांशी मध्यमवर्गीय कामगार वर्ग, शाळकरी – महाविद्यालयीन विद्यार्थी वास्तव्यास आहेत. येथील बहुतांश नागरीक पिंपरी- चिंचवड, पुणे भागात कामानिमीत्त आकुर्डी रेल्वे स्टेशन, डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज, पिंपरी- चिंचवड पॉलीटेक्निक, चिंचवडगाव या ठिकाणी जातात. तथापि या भागातून प्रवाशांना प्रवासासाठी कुठलीही सार्वजनिक सुविधा नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा पर्याय शोधावा लागतो. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी चिंचवडगाव- बिजलीनगर – गुरुद्वारा – आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर – डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज – रावेत परिसर, वाल्हेकरवाडी – चिंचवडेनगर – चिंचवडगाव अशी शटल सुविधा सुरु केल्यास मध्यमवर्गीय नागरिक, विद्यार्थी यांना जाणे- येणे सोयीस्करहोईल. तसेच, वाहतुक सुरळीत होवून वाहतुक कोंडीही लगाम बसेल. तरी, या परिसरात शटल सेवा सुरु करावी, असेही नामदेव ढाके यांनी निवेदनात नमूद केले आहे.
व्हीएस न्यूज - कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त कलारंग कला संस्था व संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि.१५) ‘कलासंगम सोहळा २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये पिंपरी चिंचवड परिसरातील कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील १५० हून अधिक कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती कलासंस्था व संस्कार भारतीचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोरवाडी, येथे झालेल्या पत्रकार परिषदेला केतन लोंढे, दिनेश मारणे, सुमित काटकर, आशा नेगी, सुप्रिया धाईंजे, सरोज राव आदी उपस्थित होते.
चिंचवड, येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी सायंकाळी पाच वाजता हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी महापौर नितीन काळजे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, प्रसिद्ध कथक नृतक डॉ. नंदकिशोर कपोते, तेजश्री अडिगे, पालिकेचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे, रविंद्र गांगुर्डे, गीता शर्मा, संदीप जाधव, संस्कार भारतीचे सतीश कुलकर्णी उपस्थित असणार आहेत.
अमित गोरखे म्हणाले, ”पिंपरी चिंचवड शहरातील सांस्कृतिक, साहित्य आणि कला क्षेत्रातील सर्वांना, ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून शहराच्या नावलौकीकात भर घालण्याचा प्रयत्न केला आहे. अशा सर्वांचा सन्मान ‘कलासंगम २०१८’ या कार्यक्रमात केला जाणार आहे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य, गायन, नृत्य,अभिनय, दिग्दर्शन, संगीत, चित्रकला, शिल्पकला, रांगोळी, निवेदन, छायाचित्रकार यासारख्या विविध क्षेत्रातील मंडळीचा सन्मान केला जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहर केवळ औद्योगिक नसून कला, साहित्य व संस्कृतीने सज्ज असलेले शहर आहे, हे सिद्ध करण्यासाठी सर्वांना एकत्र जाणार आहे”. साहित्य, कला आणि संस्कृती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे कलासंगम कलासंगम कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील कलाकार आणि त्यांच्यासाठी काम करणा-या संस्थांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सांस्कृतिक मेजवानीसह विविध क्षेत्रातील तब्बल १५० पेक्षा जास्त कलाकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या १५ कलाकारांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील कलाकार एकाच मंचावर आल्याने पिंपरी चिंचवड शहराचा सांस्कृतिक लौकिक वाढणार आहे.
भाऊसाहेब भोईर, नंदकिशोर कपोते, प्रवीण तुपे, डॉ. सतिश गोरे, बाळ जुआटकर, राजन लाखे, सतिश वर्तक, किरण एवलेकर, तेजश्री अडिगे, संजय कांबळे, राज आहेरराव, वैशाली पळसुले, दत्तोबा पाचंगे, देवदत्त कशाळीकर आणि नाना शिवले यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. यावेळी प्रभा एंटरप्रायझेस निर्मित पिंपरी चिंचवड मधील स्थानिक कलाकारांचा मराठी व गाणी, नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीमध्ये झालेल्या हल्लाबोल सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पिंपरी चिंचवड मधल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अपेक्षेप्रमाणे पलटवार केला आहे… कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेची निविदा मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीने त्यात भ्रष्टाचार सिद्ध झाल्याची टीका केली होती. दादा-भाऊ मिळून खाऊ अशा शब्दात अजित पवार यांनी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्योत्तर देताना मी जर कचरा निविदा प्रक्रियेत एक रुपयांचा मिंदा असेल तर राजकारण सोडेल अशा शब्दात लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिले.राष्ट्रवादीचा हल्लाबोल म्हणजे मनोरंजनाचा आर्केस्ट्रा असल्याची टीका त्यांनी केलीय…!
व्हीएस न्यूज - माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अप्रत्यक्षपणे बापटांना दम भरला. मी शांत आहे, तोपर्यंत आहे, माझ्या नादाला लागू नका, असा इशारा अजित पवारांनी दिला.
पुण्यात नारळ फोडण्याशिवाय अजित पवारांनी काहीच कामे केली नाहीत, अशी टीका बापटांनी केली होती. अजित पवारांनी या टीकेला उत्तर देताना हा इशारा दिला. अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात बोलताना भाजपवर निशाणा साधला.
बापटांना मी सांगत आहे, मी शांत आहे तो पर्यंत शांत आहे, नाद करायचा नाय बापट. माझ्या बरोबर तुम्ही दहा वर्ष काम केलेले आहे. प्रत्येकाचा आदर आम्हीपण करतो, तशी पवार साहेबांची शिकवण आहे, तुम्ही काय-काय वक्तव्य केली ते येथे महिला असल्याने काढू इच्छित नाही आणि ते सर्वांना माहित आहे आपला आवाका काय आपली कुवत काय, आपण करता काय? असे म्हणत अजित पवारांनी बापटांचा खरपूस समाचार घेतला.
व्हीएस न्यूज - पिंपरी – चिंचवड शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे २६ कोटी ७५ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. स्थायी समिती सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. देहू आळंदी रस्त्यावरील विविध सेवा वाहिन्यांसाठी खोदलेला रस्ता व पदपथ यांचे चर पुर्ववत करण्यासाठी सुमारे ७७ लाख २४ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मंजूरी दिली.
मनपा मुख्यालयात उर्वरित सी.सी.टी.व्ही. यंत्रणा उभारण्यासाठी येणाऱ्या सुमारे २८ लाख रुपये, प्रभाग क्र. १० तुळजाईवस्ती व विवेकनगर मध्ये पेव्हींग ब्लॉक, गटर्स, रस्ते दुभाजक फुटपाथ व मनपा इमारतीची किरकोळ दुरूस्तीच्या कामासाठी सुमारे ४१ लाख ०७ हजार रुपये, ड क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील कचरा उचलणे व वाहतुक करण्यासाठी ४९ लाख ६६ हजार रुपये, शेवाळेवाडी ग्रामपंचायतीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून दहा हजार लिटर क्षमतेच्या टॅंकरव्दारे दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ४० लाख रुपयेखर्च, पिंपरी चिंचवड मनपाचे सर्व्हर, फायरवॉल व आवश्यक संगणक यंत्रणा देखभाल दुरुस्ती करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ४८ लाख ५१ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार उपक्रमांतर्गत प्रबोधनपर्वाचे आयोजनासाठी २४ लाख ९८ हजार रुपये खर्चास मान्यता, विविध कंपन्याच्या / मनपाच्या सेवावाहिन्या टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, मनपा क्षेत्रातील डांबरी रस्त्यावरील खड्डे जेट पॅचर पॉटहोल मशिन व्दारे भरण्यासाठी येणा-या सुमारे ८ कोटी ३२ लाख ४१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या ताब्यातील पेठ क्र.५ व ८ मधील ग.नं.५४४ शेजारील क्षेत्रामध्ये उद्यान, खेळाचे मैदान व शाळा बांधणेकरिता मनपास आवश्यक एवढा भुखंड ताब्यात घेण्यास येणा-या सुमारे २ कोटी ०७ लाख ३६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ब व क प्रभाग कार्यक्षेत्रातील घरोघरचा कचरा गोळा करुन मोशी कचराडेपो येथे वाहतुक करुन टाकण्यासाठी येणा-या सुमारे ३ कोटी ३७ लाख ०५ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. ब व क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत टाटा एस वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी उपलब्ध वाहनांवर ३८ वाहन चालक, २ सुपरवायझर व ७६ कामगार पुरविण्यासाठी येणा-या सुमारे ५५ लाख ०४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. फ क्षेत्रीय कार्यालयातील टाटा एस वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी उपलब्ध वाहनांवर ५३ वाहन चालक, ३ सुपरवायझर व १०६ कामगार पुरविण्यासाठी येणाऱ्या सुमारे ७४ लाख ९४ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. ड क्षेत्रीय कार्यालयातील टाटा एस वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी उपलब्ध वाहनांवर ४७ वाहन चालक, ३ सुपरवायझर व ९४ कामगार पुरविण्यासाठी येणा-या सुमारे ६८ लाख ८९ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अ क्षेत्रीय कार्यालयातील टाटा एस वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी उपलब्ध वाहनांवर ४५ वाहन चालक, ३ सुपरवायझर व ९० कामगार पुरविण्यासाठी येणा-या सुमारे ६३ लाख ५८ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेतील कारभाराची परिस्थिती दादा-भाऊ दोघं मिळून खाऊ अशी चाललीय, हे म्हणतील तिच पूर्व दिशा, यांना विचारणारं कोणी नाही. शहराचा विकास थांबलायं, कोणतेही नवीन प्रकल्प नाहीत. प्रत्येक कामात भ्रष्टाचाराचा आरोप होतोय. कचर्याचा प्रश्न गंभीर झालायं, दादागिरी वाढलीय. या आमदारांनी ४ वर्षात काय काम केलंय असा सवाल करत महेश लांडगे आणि लक्ष्मण जगतापांवर नाव न घेता हल्लाबोल केला.
काळेवाडी येथे आयोजित हल्लाबोल सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयंत पाटील,शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार बापू पठारे, विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, खोटं बोलून ही मंडळी सत्तेत आली. ४ वर्षात इथल्या आमदारांनी शहरासाठी काय केलं, कोणतचं विकासाच काम केले नाही. केवळ राष्ट्रवादीने केलेल्या भूमिपूजनांच्या कामांची उद्घाटने यांनी केलीत. वर्षभरात त्यांनी केलेल्या प्रत्येक कामावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. करचा उचलण्याचं टेंडर आज भ्रष्टाचाराच्या आरोपामुळंच रद्द झालं. शहरात आज कचर्याची समस्या भयानक झालीयं. सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलयं. गुन्हेगारी वाढली आहे. वाहने तोडफोडीच्या घटना वाढल्या आहेत. सर्वत्र दादागिरी पसरत चालली आहे. पाण्याची समस्या लोकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. मुळातच काम करण्याची इच्छा शक्ती पाहिजे. परंतू दादा-भाऊ दोघं मिळून खाऊ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ते म्हणतील तिच पूर्व दिशा आहे. यांना कुणीच विचारत नाही.
व्हीएस न्यूज - व्यवसायात तुमच्यामुळे आमचे 25 लाखांचे नुकसान झाले आहे. असे म्हणत तिघांनी एकाकडून जबरदस्तीने अडीच लाख रूपये घेतले. तसेच दोघांना जीवे मारण्याचीही धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी बावधन येथे घडला. याप्रकरणी एकाला अटक केली असून दोघे फरार आहेत.
कृष्णा भुजंगराव वारे (वय-38, रा. आनंदनगर, पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे दोन साथीदार फरार आहेत. याप्रकरणी संदीप उकरणा (वय-43, रा. बावधन, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फौजदार पगारे यांनी माहिती दिली.
फिर्यादी उकरणा व आरोपी एकमेकाच्या ओळखीचे आहेत. त्यांनी 2017 मध्ये औरंगाबाद येथे डिजीटल मार्केटींगचे नागरिकांना प्रशिक्षण दिले. त्यांना 4 लाख 50 हजार रूपये मिळाले होते. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कामगारांना पैशाच्या देवान-घेवानवरून फिर्यादी व आरोपींचा वाद झाला होता. त्यावेळी फिर्यादीच्या एका मित्राने मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता. परंतू, फिर्यादीला तुमच्या मित्रामुळे आमचे 25 लाखांचे नुकसान झाल्याचे म्हणत सोमवारी दोघांना मोटारीत बसवून बावधन येथील घरी नेले. तसेच फिर्यादीकडून अडीच लाख रूपये जबरदस्तीने घेवून त्यांच्या मोटारीची चावी घेतली. याचे सर्व व्हिडीओ रेकॉर्डींग केले. फिर्यादी व त्यांच्या मित्राला मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - कंपनीतील कामगारांना धमकी देत एका त्रिकुटाने कॉपर वायर, पट्या व एक मोबाईल असा 16 हजारांचा ऐवज जबरदस्तीने नेला. हा प्रकार मंगळवारी पहाटे भोसरीतील साई एंटरप्रायजेस या कंपनीत घडला. राकेश चौधरी (वय-22, रा. भोसरी) याने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीत सेक्टर नं 7/108 येथे साई एंटरप्रायजेस नावाची कंपनी आहे. फिर्यादी चौधरी व त्याचा सहकारी बबलू कंपनीत मंगळवारी पहाटे काम करत होते. एका दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने फिर्यादीला धमकी देऊन कॉपर वायर, पट्या व एक मोबाईल असा 16 हजारांचा ऐवज जबरदस्तीने नेला. फौजदार आहेर अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर प्रियकराने बलात्कार केला. तरूणी गर्भवती राहिल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार वाकडमध्ये नुकताच उघडकीस आला आहे. सूरज नामदेव नढे (वय-29, रा. वाकड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर 24 वर्षी तरुणीने या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडमध्ये राहणारा सूरज नढे आणि पीडित मुलगी चिंचवडमध्ये एकाच महाविद्यालयात शिकत होते. त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सूरजने तरुणीला लग्नाचे आमिष वारंवार स्वतःच्या घरात, हॉटेलमध्ये घेवून जात तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. मार्च 2018मध्ये पीडित तरुणी सात आठवड्यांची गरोदर असल्याचे पुढे आले. त्यानंतर सूरज याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. पीडित तरुणीने सूरजचे घर गाठले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनीही स्वीकारण्यास नकार देत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. अखेर या पीडित तरुणीने वाकड पोलिसांत तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. के. आढाव अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज आणि उद्या हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त पिंपळे सौदागर जगताप डेअरी चौक येथे लावण्यात आलेला अधिकृत फलक प्रशासनाकडून क्रेनच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान ही कारवाई सुरू असल्याचे समजताच राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक नाना काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकृत फलक असताना कारवाई का करता असा सवाल त्यांनी अधिकार्यांना विचारला. त्यावेळी अधिकार्यांनी सारवासारवीची उत्तरे देत तो फलक पुन्हा लावल्याने या वादावर पडदा पडला. त्यानंतर मात्र सत्ताधारी भाजपच्या सुडबुध्दीच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे.
नाना काटे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत फ्लेक्स उभारू नयेत ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र अधिकृत फ्लेक्सवर कारवाई करणे चुकीचे आहे. एकीकडे शहरात सर्रासपणे अनधिकृत फलक लावले जात असताना केवळ सुडबुध्दीने राष्ट्रवादीच्या फलकावर कारवाई केली जात आहे. राष्ट्रवादीचा शहरात दोन दिवस हल्लाबोल मोर्चा आहे. त्याची धास्ती सत्ताधारी भाजपने घेतली आहे. आज जगताप डेअरी चौकात हल्लाबोलच्या अधिकृत फलकावर प्रशासनाने कारवाई सुरू केली होती. मात्र मी त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांना त्याचे कारणही योग्य पध्दतीने देता आले नाही. सत्ताधार्यांच्या दबावामुळेच ही कारवाई होणार होती. अखेरीस हतबल होऊन अधिकार्यांनी तो फलक पुन्हा लावला.
व्हीएस न्यूज - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षबांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेत सुमारे शंभर कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला आहे.
मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरात पक्षाचे नेतृत्व करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधणीचे काम जोरात सुरू आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जबाबदारी चिखले यांच्यासह पक्षाच्या शहर पदाधिका-यांवर सोपविण्यात आली आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी पक्षाचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी शहरातील मनसैनिकांची नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यापुढे शहरात जाणिवपूर्वक लक्ष घालणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यामुळे मनसे पदाधिका-यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. प्रत्येक कार्यकर्ता पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागला आहे.
पक्षवाढीसाठी मनसेच्या विविध संघटनांची कार्यकारिणी मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठीच सेनेच्या कार्यकारिणीतील विविध पदे रविवारी जाहिर करण्यात आले. विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या हस्ते पदाधिका-यांना नियुक्त पत्र देण्यात आले. त्यामध्ये अक्षय नाळे (सचिव), अनिकेत प्रभु (उपशहर अध्यक्ष), अमित तापकीर (उपशहर अध्यक्ष), गौरव लोटलीकर (विद्यार्थी उपशहराध्यक्ष), प्रतिक शिंदे (विभाग अध्यक्ष), सचिन शिंदे (विभाग अध्यक्ष), बंटी कदम (विभाग अध्यक्ष),महेश येवले (विभागाध्यक्ष) आदी पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002