व्हीएस न्यूज - प्रभाग क्र.३२ अंतर्गत सांगवी, नवी सांगवी परिसरातील नाल्यांच्या साफसफाई कामकाजाला वेग आला असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य खात्याने कंबर कसली असल्याचे चित्र सांगवी परिसरात दिसून येत आहे. नगरसेवक हर्षल ढोरे यांनी स्वत: या लक्ष देऊन या कामाचा आढावा घेतला.
आरोग्य विभागाकडुन जुनी सांगवीतील कै. शकुंतलाबाई शितोळे शाळेशेजारील व शिवांजली परिसरातील नाले साफ – सफाई पूर्ण करण्यात आली. नवी सांगवी दशक्रिया घाट,इंद्रप्रस्थ सोसायटी समोरील नाला साफसफाईचे कामकाज प्रगतीपथावर सुरू आहे. आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य खात्याचे पंधरा ते वीस कर्मचारी गेली पंधरा दिवस नालेसफाईच्या कामात व्यस्त आहेत.
शिवांजली परिसर व दशक्रिया घाट येथील नालेसफाईच्या कामाची नगरसेवक हर्षल ढोरे यांनी पाहणी केली. “एम एस काटे चौक, नर्मदा गार्डेन येथील नाला साफसफाईच्या कामासाठी आरोग्य विभागाच्या मदतीला स्थापत्य विभागामार्फत जेसीबी व अन्य साधनसामुग्री उपलब्ध करून दिली जाईल. येत्या आठ-दहा दिवसांत सांगवी-नवी सांगवीतील नालेसफाईची कामे मार्गी लावली जातील,” असे नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - जनसेवा सहकारी बँक लि. हडपसर पुणे या बँकेच्या भोसरी एमआयडीसी शाखेतील एटीएम सेवेला आज (सोमवार) पासून प्रारंभ झाला. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सह संपर्क प्रमुख मिलिंदराव देशपांडे यांच्या हस्ते एमटीएम सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
एटीएम सेंटरच्या उद्घाटन समारंभासाठी जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीेेए प्रदीप जगताप, पालक संचालक अॅड. सतीश गोरडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक जोशी, संचालक सूर्यकांत शिर्के, संदीप सारडा, विनायक गायकवाड,अनुपमा कळसकर, आशा बहिरट, बाळासाहेब कचरे, रवी तुपे, शाखा व्यवस्थापक विलास लांडगे, नगरसेवक बाबू नायर, सीताराम शेट्टी, संदीप जाधव, राजेश भुजबळ, रवींद्र नामदे, सुनीता पाटसकर, शिवसेना उपशहर प्रमुख गजानन चिंचवडे, भाजप प्रवक्ते अमोल थोरात आदी उपस्थित होते. आमदार महेश लांडगे बँकेच्या नवीन सेवेसाठी शुभेच्छा देताना म्हणाले, जनसेवा सहकारी बँक मागील चार दशकांपेक्षा अधिक कालावधीपासून नागरिकांना सेवा देत आहे. आपल्या ठेवीदारांच्या हिताचा विचार करत सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे ठेवीदारांच्या मनात जनता सहकारी बँकेविषयी विश्वास कायम आहे.
अध्यक्ष प्रदीप जगताप म्हणाले की, आर्थिक यशाला गवसणी घालण्यासाठी आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. एटीएम सेवेमुळे खातेदारांचे व्यवहार वाढतील. चलन फिरते राहील. बँकेच्या एमआयडीसी शाखेने आतापर्यंत ९५ कोटींचा टप्पा पार केला आहे. येत्या आर्थिक वर्षात १०८ कोटींचा टप्पा गाठण्याचे ध्येय शाखेने ठेवले आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
व्हीएस न्यूज – थेरगाव परिसरातील सर्व सामाजिक संस्थांचे संघटन करून "थेरगाव सोशल फ़ाउंडेशन" ची स्थापना करण्यात आली आहे. थेरगाव परिसरातील समस्या निर्मूलन व सामाजिककर्तव्य दक्षतेसाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या अगोदर “आंघोळीची गोळी” या संस्थेमार्फ़त सुरु असलेल्या नेल फ़्री ट्री, पेन फ़्री ट्री या उपक्रमाद्वारे ‘खिळेमुक्त झाड़ांचे थेरगाव ' हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. तसेच, दि. २० मेरोजी बिर्ला हॉस्पिटल ते केजूदेवी बोटक्लब या मार्गावर असलेल्या सर्व झाडांवरील जाहिरात करण्यासाठी लावलेले बोर्ड, खिळे, स्टेप्लर पिन्स, बाईंडिंग वायर्स, नायलॉन पट्टया तसेच तूटलेले ट्री गार्डकाढुन झाडांना खिळेमुक्त व पर्यायाने बंधनमुक्त करण्यात आले. थेरगाव सोशल फ़ाउंडेशनचे निलेश पिंगळे, अनिकेत प्रभु, राहुल सरवदे, सुशांत पांडे, अनिल घोडेकर, मनोज वंजारी यांच्या संयोजनाने उपक्रम राबविण्यात आला. बापू खोसे, मनिषा दनाने, श्रीकांत धावारे, प्रकाश गायकवाड, अंकुश कूदळे, मयूर कांबळे, रोहीत ढोबळे, अमोल शिंदे, राहुल जाधव, अभिजीत खानविलकर, योगेश ननावरे,सचिन पानढवळे यांच्यासह विविध संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
व्हीएस न्यूज - हिंजवडी येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा अंकुश वाघमारे असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी रात्री दहाच्या सुमारास मारुंजी येथे घडला.
पूजा ही आयटी कंपनीत काम करत होती. सोमवारी रात्री तिने राहत्या घरात गळफास घेतला. तिच्या घराशेजारी रहाणाऱ्या नागरिकांना याबाबत संशय आल्यानेत त्यांन हिंजवडी पोसिांना माहिती दिली. माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घडल्या प्रकाराची चौकशी केली. दरम्यान, पूजाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
व्हीएस न्यूज - वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असलेल्या सराईत गुन्हेगार रोहन उर्फ गंग्या वासुदेव वाघमारे याला पोलिसांनी दीड वर्षासाठी तडीपार केले आहे. गेल्या काही दिवसांपासून छोट्या मोठ्या गुन्हेगारी कारवायामूळे गंग्याची दहशत निर्माण झाली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांच्या सुचनेनुसार पोलिस कर्मचारी सुहास पाटोळे, नाना झेंडे यांनी त्याच्या सर्व गुन्ह्यांचे रेकॉर्ड तयार करून तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावरून उपायुक्त गणेश शिंदे यांनी त्यास दीड वर्ष तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.
व्हीएस न्यूज - तरुणींचे सोशल मीडियाचे अकाऊंट हॅक करून त्यावर त्यांचे फोटो मॉर्फ करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंजिनीअरला सायबर शाखेने अटक केली. त्याने सहा तरुणींकडे अशाप्रकारे खंडणी मागितली आहे.
कृष्णा बळीराम फड (रा. खणावळकर आळी, पनवेल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. फड हा कोल्हापूर येथे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्याला फेसबुक, इन्स्ट्राग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडिया अकाऊंटला हॅक कसे करायचे माहिती होते. त्याचा गैरवापर करीत त्याने तरुणींची अकाऊंट हॅक करण्यास सुरुवात केली. सहापैकी दोन तरुणींनी सायबर शाखेकडे तक्रार केल्यानंतर त्याचा तपास केला असता, फड याने हा उद्योग केल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला अटक केली.
पिंपळे सौदागर येथील एका तरुणीचे इन्स्टाग्रामचे अकाऊंट हॅक झाले आहे. त्यावर अश्लिल फोटो व मजकूर टाकला आहे. बदनामी टाळायची असेल तर १५ हजार रुपये दे; अन्यथा मॉर्फ केलेले आणखी काही फोटो व्हायरल करेन, अशी धमकी दिल्याची तक्रार तिने सायबर शाखेकडे केली. सायबर सेलच्या उपनिरीक्षक रूपाली पवार आणि मंदा नेवसे यांनी या संदर्भात तपास केला. त्यावेळी फड याचे नाव समोर आले. त्याला सायबर शाखेने अटक केली.
फड हा त्या तरुणींचे अकाऊंट हॅक करून त्या अकाऊंटमधील तरुणींच्या मित्र-मैत्रिणींनाही पैशाच्या मदतीसाठी मेसेज करीत असे. त्यांच्याकडे पासवर्ड व युजर आयडीही मागत असे. फडने आतापर्यंत सहाजणींचे अकाऊंट हॅक केले. त्यांचे फोटो मॉर्फ करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. अकाऊंट हॅक करण्यासाठी त्याने वापरलेला मोबाईल जप्त केला आहे. अशा प्रकारे बदनामीकारक मजकूर टाकून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला असेल तर तरुणींनी सायबर शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.
२७६ गुन्हे दाखल
एकीकडे सोशल मीडियावर सक्रिय राहण्याची क्रेझ वाढत असताना, दुसरीकडे त्याचा धोकाही निर्माण होत आहे. सोशल मीडियावरून बदनामी करणे, अश्लिल फोटो टाकणे, ब्लॅकमेल करणे असे प्रकार घडत आहेत. गेल्या सोळा महिन्यांत सायबर शाखेकडे अशा प्रकारच्या ७९५ तक्रारी आल्या आहेत. त्यांपैकी २७६ तक्रार अर्जांचा तपास करून आरोपींचा शोध घेण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.
जागा मालकाचा उपोषणाचा इशारा
व्हिएस न्यूज - दापोडी येथील सर्व्हे नं. 77 हिस्सा नं.4 ब येथील जागा भाऊसाहेब मुगुटमल यांची आहे. त्यांच्या जागेत पालिकेच्या जलनिःसारण विभागाने ड्रेनेज लाईन टाकून अतिक्रमण केले आहे. ही ड्रेनेज लाईन त्वरीत काढून घ्यावी, अशी मागणी मुगुटमल यांनी केली आहे. अन्यथा पालिकेच्या विरोधात उपोषणाला बसेन, असा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दापोडी येथील सर्व्हे नं. 77 हिस्सा नं.4 ब येथील जागा भाऊसाहेब मुगुटमल यांची आहे. त्यांच्या जागेशेजारी मोकळी जागा उपलब्ध असताना देखील पालिकेच्या जलनिःसारण विभागाने मुगुटमल यांच्याच जागेत बेकायदेशीरपणे ड्रेनेज लाईन टाकली आहे. काम सुरू होण्यापुर्वी मुगुटमल यांनी जलनिःसारण विभागाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच परिसरातील काही नागरिक आमच्या जागेत येऊन काहीही करू लागले आहेत. वारंवार आमच्याशी वाद घालत असून माझ्या जीवाला काही बरे-वाईट झाल्यास जलनिःसारण विभागाचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. आमच्या हक्काच्या जागेतील ड्रेनेज लाईन त्वरीत काढून टाकावी. अन्यथा पालिकेच्या विरोधात उपोषण करण्यात येईल, असा इशारा मुगुटमल यांनी दिला आहे.
व्हिएस न्यूज - भिगवण अपघातात जीव गमावलेल्या गायकवाड कुटुंबीयांतील पाचही जणांचे मृतदेह शनिवारी सकाळी त्यांच्या यमुनानगर येथील घरी आणण्यात आले. त्यानंतर निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवणजवळील डाळज गावच्या हद्दीत स्कॉर्पियो गाडीचा टायर फुटून शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला होता. प्रकाश रामचंद्र गायकवाड (वय 67), सुनीता प्रकाश गायकवाड (वय 58), संदीप प्रकाश गायकवाड (वय 40), शीतल संदीप गायकवाड (वय 32), आभिराज संदीप गायकवाड (वय 5, सर्वजण रा. रा. नाना-नानी पार्क यमुनानगर निगडी) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या गायकवाड कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या गायकवाड कुटुंबातील पाच सदस्यांचे पार्थिव दोन रुग्णवाहिकांमधून सकाळी त्यांच्या राहत्या घरी यमुनानगरमध्ये आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर सकाळी साडेदहाच्या सुमारास निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. अंत्यविधीसाठी निगडी परिसरातील नागरिक गायकवाड कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले असून अंत्यविधीला असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती. आजोळी गेल्यामुळे बचावलेल्या या कुटुंबातील सदस्य विश्वराजच्या (वय 7) हातून या पाचही सदस्यांना अखेरचे पाणी देण्यात आले. तो आजोळी गेला असल्याने देवदर्शनसाठी गेला नव्हता. मात्र, त्याला आजी, आजोबा, आई, वडील आणि धाकटा भाऊ अभिराज सोडून केल्याने तो पोरका झाला आहे. तर, सर्वांना विश्वराजचे चुलत आजोबा सुभाष गायकवाड यांनी अग्नी दिला. या अपघातात गायकवाड परिवारातील प्रमोद प्रकाश गायकवाड (वय30) व हेमलता प्रमोद गायकवाड (वय28) हे आणखी दोघे जण जखमी झालेले आहेत. त्यापैकी हेमलता गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आई-मुलाला एकाच चितेवर अग्नी शीतल गायकवाड आणि त्यांचा मुलगा अभिराज गायकवाड या दोन्ही मायलेकरांचाही मृत्यू झाला आहे. या दोघांवर अंत्यसंस्कार करताना एकाच चितेवर त्यांना अग्नी देण्यात आला.
व्हिएस न्यूज - चारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने वाहनांना सेफ्टी गार्ड बसवू शकतो, अशी माहिती इंडियन सेफ्टी गार्डस इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष मनिष कोल्हटकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
कोल्हटकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चार चाकी वाहनांचे सेफ्टी गार्ड पादचारी व प्रवाशांना सुरक्षित नसल्याचे कारणामुळे रस्ते महामार्ग व परिवहन मंत्रालयाच प्रियांक भारती यांनी वाहनांना बसवलेले क्रॅश गार्डस काढून टाकण्याचे परिपत्रक काढून सर्व राज्यांना दिले होते. त्यांच्या परिपत्रकामुळे अनेक राज्यात वाहनांना बसविलेले सेफ्टी गार्ड काढण्याची कारवाई सुरू केली होती. यावर असोसिएशनने कोर्टात धाव घेतली. याबाबतीतची पहिली सुनावणी दि 12 मार्च 2018 ला झाली. या सुनावणीदरम्यान कोणत्या कायद्याच्या आधारे हि बंदी आणली असा प्रश्न कोर्टाने विचारला. यावर रस्ते वाहतूक रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर व्हेईकल सेक्शन 110 अंतर्गत कायदा बनवून बंदी आणू शकतो. असे उत्तर दिले. यावर कोर्टाने ताशेरे ओढत 2 पाने अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. 20 ऑगस्ट 2018 पर्यंत स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गीता मित्तल व सी. हरिशंकर यांनी या खटल्याचा निकाल दिला.
कोल्हटकर पुढे म्हणाले कि, प्रवासी आणि पादचारी यांची आम्हालाही काळजी आहे. केवळ आमचे उत्पादन विकून मोकळे होणार नाही तर वाहनाचे सौंदर्य व मानवी सुरक्षा या दोन्ही बाबी लक्षात घेवून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित असे सेफ्टी गार्डची निर्मिती करण्यावर आमचा भर आहे. या निर्णयामुळे उद्योजक व नागरीकांना एक दिलासा मिळाला आहे. हे सेफ्टी गार्ड बनवणे, विकणे आणि वाहनांना लावण्यावर आता बंदी नसल्याचेही कोल्हटकर यांनी पत्रात म्हटले आहे.
व्हिएस न्यूज - येथील ओटास्कीममध्ये बेकायदेशीर जमाव जमवून एका तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी 15 ते 17 जणांच्या टोळक्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत थोरात (वय 25, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिरोज डंके, हैदर शेख, संदीप खैरनार, शमीम शेख (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्यासह इतर दहा ते बारा जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी ओटास्कीमधील जिवलग सोसायटीसमोर मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास 15 ते 17 जणांचे टोळके आले. हातात तलवारी, कोयता घेऊन या टोळक्याने थोरात याला शिवीगाळ केली. तसेच, मारहाणा करून जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सूर्यवंशी तपास करीत आहेत.
व्हिएस न्यूज - भरधाव वाहनाच्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर बावधान येथील ओंकार ब्रीजजवळ घडली.
निखील बबन आनेराव (वय 25, रा. गणपतीमंदिरा शेजारी, बालेवाडी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे वडील निखील आनेराव (वय 50) यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळुरू महामार्गावर बावधानच्या ओंकार ब्रीजजवळ निखीलला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात गंभीर जमखी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारा वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
फौजदार एम. के. आबनावे तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - ‘आमदार लक्ष्मण जगताप सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने दिव्यांगास कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) वाटप करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयामध्ये शुक्रवारी दुपारी १ वाजता दिव्यांगास कृत्रिम अवयवयाचा आधार देण्यात आला.
जुनी सांगवी येथील प्रविण जाधव या तरूणास आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कृत्रिम पाय (जयपूर फूट) वाटप करण्यात आले. तसेच प्रविण यास संजय गांधी योजने अंतर्गत शासनाची पेंशन सुरू करण्यात आली आहे. आमदार लक्ष्मण जगताप सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून दहा दिव्यांगांचे हात-पाय याचे मोजमाप घेऊन कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) वाटप करण्यात येणार आहे. कोणत्याही दिव्यांग व्यक्तीस मदतीची आवश्यकता असेल तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार जगताप म्हणाले, सामान्य जीवन जगण्यासाठी मनुष्याला निसर्गाने दिलेले सर्वच अवयव हवेत. दुर्दैवाने अनेकांना अपघात किंवा इतर काही कारणांमुळे हात, पाय यासारखे महत्त्वपूर्ण अवयव गमवावे लागतात. मनुष्याचे एक बोट जरी जायबंदी किंवा निकामी झाले, तरी दैनंदिन काम करताना अडचणी येतात. काही लोकांना तर अख्खा हात, पाय किंवा दोन्ही हात व पाय गमवावे लागतात. दिव्यांग व्यक्ती शरीराने अधू असल्या तरी त्या मनाने कुठेही खचलेल्या दिसत नसतात. समाजातील अशा घटकांसाठी काही तरी करावे, या उद्देशाने आमदार लक्ष्मण जगताप ट्रस्ट समाजातील पिडितांना मोफत मदत करत आहे. यावेळी शहर प्रवक्ते अमोल थोरात, स्विकृत सदस्य गोपाळ माळेकर, देविदास पाटिल, प्रमोद ताम्हणकर, अदिती निकम, आकाश वाघमारे आदि उपस्थित होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002