व्हीएस न्यूज – शहरात विकास कामे करण्यासाठी महापालिकेत सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे. मागील स्थायी समितीत पेव्हींग ब्लॉकच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला. त्यानंतर बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पिंपळे सौदागर आणि पिंपळे निलखमधील रस्त्यांच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने गेल्या आठ महिन्यात केवळ सल्लागार नियुक्तीचा कार्यक्रम हाती घेवून पध्दतशीरपणे करदात्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी सुरु केली आहे.
या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग क्रमांक 28 मधील पिंपळे सौदागर आणि प्रभाग क्रमांक 26 मधील पिंपळे निलख येथील विकास कामे करणेसाठी मे. इन्फिनिटी कॅन्स्लटिंग इंजिनिअर्स यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये पिंपळे सौदागर मधील झरवरी रस्ता यु.टी.डब्ल्यु.टी. पध्दतीने विकसित करणे, पिंपळे सौदागर स्मशानभूमी ते सर्व्हे नं.23 पर्यंतचा 12.00 मी. रुंदीचा डी. पी. रस्ता विकसित करणे, रहाटणी मनपा शाळा ते पिंपळे सौदागर स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे यु.टी.डब्ल्यु. टी. पध्दतीने कॉक्रीटीकरण करणे, प्रभाग क्रमांक 26 मधील ताब्यात असलेले डी. पी. रस्ते विकसित करणे, पिंपळे निलख येथील रक्षक चौक ते पिंपळे निलख गावठाणातून संरक्षण विभागाच्या हद्दीतुन जाणाऱ्या या 18.00 मी. डी.पी. रस्त्यास सब-वे करणे, ताब्यात येणारा 12.00 मी. रुंदीचा डी. पी. रस्ता विकसित करणे या कामासाठी सल्लागार नियुक्ती केलेला आहे. या विकास कामांच्या निविदा पूर्व व निविदा पश्चात्य बाबींकरिता मे. इन्फिनिटी कंन्स्लटिंग इंजिनिअर्स यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
नाशिक फाटा ते हिंजवडी पर्यंतचे बीआरटीएस कॉरीडॉर क्रमांक 3 वर विविध स्थापत्य विषयक कामे करणेकामी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची नेमणूक करण्यात आली. या रस्त्यावर वाढलेली प्रचंड वाहतूक लक्षात घेता सुदर्शननगर चौक याठिकाणी ग्रेड सेपरेटर व एफ. ओ. बी. बांधणे, गोविंद गार्डन चौकात सब-वे बांधण्याचा प्रस्तावित आहे. याशिवाय बीआरटीएस कॉरीडॉर क्रमांक 3 वर वाकडच्या पुणे-बैंगलोंर महामार्गावरील पुलापासून हिंजवडीपर्यंत रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत 30 मीटर रस्ताची रुंदी 45 मीटर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या रस्त्यावर हिंजवडीकडील वाहतुकीची कोंडी सोडविण्यात येणार आहे. त्यानुसार 2017-18 च्या अंदाज पत्रकांतील नाशिक फाटा ते वाकड या बीआरटीएस रस्त्यावर सब-वे, पीयुपी बांधणे, एफओबी या लेखाशिर्षावर कामास रु.10 कोटी इतकी प्रशासकीय मान्यता असून त्यातील 1 कोटीची तरतुद केली आहे. त्यामुळे महामार्गावर रस्ता विकसित करणे, निगडी ते दापोडी या रस्त्यावरील वल्लभनगर पिंपरीतील सबवेचे सुशोभिकरण करणे या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून मे. इन्फ्रा किंग कन्सल्टींग इंजिनियर्स प्रा. लि. यांची नेमणूक करण्यात आली. तर सांगवी-किवळे रस्त्यावर बीआरटीएस बस डॉकीचे जागेचे मजबुतीकरण करणे या कामास मे. पेव्हटेक कन्सल्टंट पुणे यांची नेमणूक करण्यात आली. या विकास कामांना ऐनवेळी स्थायीत समितीच्या सभेत मंजुरी दिली आहे.
महापौर काळजे यांचा स्पेन दौरा
व्हीएस न्यूज – स्पेन येथील बार्सिलोना शहरात नागरिक स्वयंशिस्त बाळगतात, त्या शहरात नागरिकांशी संबंधित सर्व सेवा-सुविधा ऑनलाईन आहेत. त्यामुळे मनुष्यबळ संख्या कमी लागून विविध सॉफ्टवेअरच्या माध्यमांतून ऑनलाईन सुविधांवर भर दिला आहे. त्यादृष्टीने पिंपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटी योजनेत “डिजीटल इंडिया’वर सर्वांधिक लक्ष केंद्रीय करुन नागरिकांना घर बसल्या सुविधा देण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
स्पेन येथील बार्सिलोना शहरात स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड कॉंग्रेस या 14 ते 16 नोव्हेंबरच्या आयोजित एक्झीबिशन व कॉन्फरसला महापौर काळजे यांनी उपस्थित राहून सहभाग घेतला. याविषयी ते माहिती देताना म्हणाले की, त्या शहरात महापालिका व शासनाच्या नागरिकांशी निगडीत असणाऱ्या विविध सेवा-सुविधांचे ऑनलाईन पध्दतीने एकत्रित करुन कामकाजाचे नियोजन केले आहे. संकेतस्थळाच्या डॅशबोर्डद्वारे अत्यंत सुव्यवस्थित आणि बिनचुकपणे त्या सेवा पुरविल्या आहेत. त्यांनी सर्व मिळकतींचा मिळकत भरणा संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन आहे. सर्व रुग्णालयात रुग्णांना केस पेपर ऑनलाईन देवून आरोग्य सेवा पुरविली जाते.
पालिकेच्या सर्व विभागाच्या निविदा कामकाजही ऑनलाईन करीत आहेत. वीज चालु अथवा बंद झाल्यास त्याचे नियोजन देखील संगणकाद्वारे चालविले जात आहे. कचरा संकलन आणि वाहतुकीचे नियोजन, त्या कचऱ्यांची विल्हेवाट लावताना कमी मनुष्यबळात यांत्रिकीकरणाचा वापर अधिक होतोय, जलःनिस्सारण हे संगणकाद्वारे नियंत्रण ठेवून देखभाल दुरुस्तीचे कामे होत आहेत. शहरात महत्वांच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था व सद्यस्थिती अपडेट माहिती मोबाईल ऍपद्वारे सर्वाना मिळते. त्यामुळे वाहनाचे पार्किंग केले जात आहे. यामुळे रस्त्यावरील गर्दीची कमी होवून वाहतुकी कोडींवर नियंत्रण राहत आहेत. वाहतुकीचे नियोजन देखील संपुर्ण शहराचे संगणकाद्वारे करुन त्यांची प्रत्येक रस्त्यांवरची परस्थितीची माहिती संबंधित प्रशासनाला मिळत आहे.
दरम्यान, त्या शहराचा कारभार कमी मनुष्यबळात संगणकीय डॅशबोर्डच्या माध्यमातून चालविला जात आहे. शहरातील वाहतुकीचे नियोजन, पार्किंग व्यवस्था, कचरा उचलून, कचऱ्यांची विल्हेवाट लावली जात आहे. त्यानुसार सर्व कारभार ऑनलाईन करुन त्यांचे नियोजन व्यवस्थित केले जात आहे. त्यामुळे आपल्या शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याकरिता आणि नागरिकांशी निगडीत सुविधांचे अद्ययावतीकरण करुन संगणकाच्या डॅशबोर्डवर एकत्रीत त्याचे नियंत्रण व पाहणी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कृती करण्यासंबंधीची उपाययोजना राबविल्यास प्रशासन अधिकाधिक वेगवान व लोकाभिमुख होईल, असेही महापौर काळजे यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाद्वारे 133 पैकी 126 नगरसेवकांसाठी आरोग्य विमा योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, जैवविविधता समिती सभापती उषा मुंढे, शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, अमित गावडे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी विमा घेण्यास स्थायी समितीच्या सभेत नकार दिला आहे.
दरम्यान, या योजनेसाठी येणाऱ्या 18 लाख रुपये खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. महापालिकेत नगरसेवकांचे संख्याबळ 128 आहे. तर पाच स्वीकृत सदस्य असे एकूण 133नगरसेवक आहेत. या 133 नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिकेतर्फे आरोग्य विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, 128 नगरसेवकांपैकी सात नगरसेवकांनी यापूर्वीच आरोग्य विमा योजनेची सवलत स्वीकारण्यास नकार दर्शविला आहे. आता शिवसेनेच्या नऊ नगरसेवकांनी आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, सदस्य उषा मुंढे यांनीही आरोग्य विमा नाकारला आहे. त्यामुळे 108 अधिक पाच स्वीकृत अशा 113नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा योजना लागू करण्यात येणार आहे. हा विमा नगरसेवक दाम्पत्य आणि त्यांच्या 21 वर्षापर्यंतच्या दोन अपत्यांसाठी लागू राहणार आहे.
या विमा योजनेसाठी महापालिकेतर्फे इच्छुक विमा कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या. निविदा दर 19 लाख 66 हजार रुपये निश्चित करण्यात आला. मात्र, पहिल्यांदा एकाही निविदाधारकाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पुन्हा निविदा मागविण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा दोनदा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, मार्श इंडिया इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड या एकाच कंपनीची निविदा प्राप्त झाली. त्यांनी निविदा दरापेक्षा नऊ टक्के कमी म्हणजेच 17लाख 89 हजार रुपये दर सादर केला. त्यानुसार, मार्श ब्रोकर्स कंपनीबरोबर करारनामा करण्यात येणार आहे.
व्हीएस न्यूज - शहरातील विकास कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे 121 कोटी 49 लाख 27 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. यासह महापालिकेच्या वतीने इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशन यांच्या वतीने सांगवीत महापौर चषक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या स्पर्धांच्या प्रत्यक्षात येणाऱ्या खर्चास मान्यता मिळाली आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. चिखली सेक्टर क्रमांक 17 व 19 येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ईडब्लुएस गृहप्रकल्पात विविध आरक्षणे विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी येणाऱ्या सुमारे 76 लाख 05 हजार रुपयांच्या खर्चास मान्यात देण्यात आली. नागरवस्ती विकास योजनेतून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. निःसमर्थ (अपंग) कल्याणकारी योजनेतून अपंग व्यक्तींना व्यवसायास अर्थसहाय्य देण्यात येते. त्यानूसार दोन पात्र लाभार्थ्यांना सुमारे 1 लाख 87 हजार रुपयास मान्यता देण्यात आली.
पुनावळे येथे उद्यान विकसित करण्यासाठी अमृत योजनेतून येणाऱ्या सुमारे 1 कोटी 09 लाख 84 हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. पालिका जलशुद्धीकरण केंद्राच्या सेक्टर 26 मधील जलशुद्धीकरण प्रक्रियेसाठी द्रवरुप स्वरुपातील पॉली अल्युमिनियम क्लेराईड व पावडर स्वरुपातील पॉली अल्युमिनियम क्लोराईड पुरविणे, याकरिता होणाऱ्या 46 लाख 16 हजार रुपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
आकुर्डी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत सेक्टर 22 मधील जुन्या जलनिःसारण नलिका बदलणे व उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्यासाठी येणा-या सुमारे 31 लाख 51 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. च-होली, चिखली मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत शेलारवस्ती, पाटीलनगर, धर्मराजनगर परिसरातील जुन्या जलनिःसारण नलिका बदलणे व उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्यासाठी येणाऱ्या सुमारे 35 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
दरम्यान, चिखली मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत ताम्हाणे वस्तीत जुन्या जलनिःसारण नलिका बदलणे व उर्वरीत ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्यासाठी येणा-या सुमारे 33 लाख 35 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच फुगेवाडी पंपीग स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुन्या मलनिःसारण नलिका आवश्यक त्या ठिकाणी बदलण्यासाठी येणाऱ्या सुमारे 36 लाख 89 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
मनपा इमारत सुधारण्यास मान्यता…
भोसरीतील गव्हाणेवस्ती येथे मनपा इमारतीची सुधारणा करण्यासाठी येणा-या सुमारे 31 लाख 86 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. शहरात फुटपाथची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 33 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.25 मधील फुटपाथची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 31 लाख 47 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. प्रभाग क्र.24 मधील फुटपाथची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 30 लाख 31 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
बंद कंटेनरला तवेराची धडक बसल्याने घडली घटना..
व्हीएस न्यूज - जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव तवेरा गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडक दिल्याने एक जण ठार तर तिघे जखमी झाले. ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली असून मृत व जखमी हे आयकर अधिकारी असल्याचे सांगण्यात येते. हा अपघात देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरजाई मंदिराजवळ झाला.
अधिक माहिती अशी, आयकर विभागाचे काही अधिकारी कामानिमित्त मुंबईहून पुण्याकडे तवेरा गाडीतून (एमएच १२ एफसी २६१५) येत होते. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अमरजाई मंदिराजवळ लोखंडाचे खांब घेऊन जात असलेला कंटेनर (एमएच ०६ के ७९४४) उभा होता. तवेरा चालकाला याचा अंदाज आला नाही. भरधाव असलेल्या तवेराने त्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह तिघे जखमी झाले. अभिषेक त्यागी असे मृताचे नाव असून ते आयकर विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत होते, असे सांगण्यात येते. तर उपसंचालक आनंद उपाध्याय, कृष्णकांत मिश्रा व चालक गंभीर जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. वाहनं उभी करण्याची जागा नसतानाही कंटेनर तिथे उभा होता. चालकाने योग्य ती दक्षता घेऊन कंटनेर उभा केला असता तर हा अपघात झाला नसता, असे सांगण्यात येते.
मुंढेच्या सभात्यागाने सत्ताभारी भाजप अडचणीत
व्हीएस न्यूज - पीएमपीएमएलसंदर्भात बोलाविलेल्या मुख्यसभेस पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे उपस्थित राहिले खरे; मात्र, सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्या कार्यपध्दतीवर बोट ठेवण्यास सुरूवात करताच त्यांनी थेट सभेतूनच निघून जाणे पसंत केले. मात्र, त्यानंतर मुख्यसभेत चांगलाच गोंधळ उडाला. प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ येताच कोणालाही न सांगता मुंढे यांनी काढता पाय घेतल्याची टिका करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी तुकाराम मुंढे पळपुटे असल्याची जोरदार घोषणाबाजी केली.
तसेच सभा सुरू असताना; सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सभापतींची संमती न घेता सभागृहाबाहेर गेलेल्या मुंढे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, सत्ताधारी भाजपने मुंढे यांची पाठराखण करत विरोधकांची मागणी फेटाळून लावली. मुंढे निघून गेल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस तसेच मनसे नगरसेवकांनी मुंढेच्या कार्यपद्धतीसह, भारतीय जनता पक्षाच्या हतबलतेवरही जोरदार टिका केली. मात्र, मुंढे यांच्या निघून जाण्याने अडचणीत आलेल्या भाजपच्या कोणत्याही सदस्याला विरोधकांच्या टिकेला उत्तर देता आले नाही.
पीएमपीएमएलला 2016-17 या आर्थिक वर्षाची संचलन तूट 12 समान हत्यांमध्ये देण्यासाठी महापालिकेची खास सभा बोलाविण्यात आली होती. या सभेस मुंढे उपस्थित राहिले खरे मात्र, मुंढेच्या उपस्थितीने सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला.मुंढे सभागृहात आल्यानंतर सकाळी सव्वा अकाराच्या सुमारास सभेस सुरूवात झाली. यावेळी मुंढे यांनी सभागृहात पीएमपीची सदस्यस्थिती आणि त्यावर करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. त्यानंतर सभाग़ृहातील इतर सदस्यांनी आपल्या भाषणास सुरूवात केली.
यावेळी माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक धीरज घाटे, गोपाळ चिंतल यांची भाषणे झाली आणि त्यानंतर भाजप नगरसेविका पल्लवी जावळे यांची भाषणे झाली. जावळे यांच्या भाषनानंतर राजश्री शिळीमकर यांचे भाषण सुरो असताना; अचानक कोणालाही न सांगता मुंढे महापालिकेच्या सभागृहातून बाहेर पडले.महापौर सभागृहात उपस्थित नसल्याने उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. मुंढे निघून गेल्यानंतर कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी उपमहापौर मुंढे हे तुम्हाला सांगून बाहेर गेले आहेत का ? अशा प्रश्न विचारला मात्र, मुंढे यांनी बाहेर जाताना कोणालाही कल्पना न दिल्याने डॉ. धेंडे यांना काहीच उत्तर देता आले नाही. त्यामुळे मुंढे यांनी सरळ सरळ सभागृहाचा अपमान केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात मुंढे पळपूटे असल्याची जोरदार घोषणाबाजी केली.
तसेच मुंढे हाय हाय अशा घोषणाही दिल्या. त्यामुळे सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येत पालिकेची सभा अर्धवट सोडून गेलेल्या मुंढेवर कंपनी कायद्यानुसार, कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच मुंढेच्या या वर्तूनुकीच्या निषेधार्थ ही खास सभा तहकूब करावी अशी तहकूबी माजी उपमहापौर दिपक मानकर, विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्यासह कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी दिली. मात्र, सत्ताधारी भाजपने ही तहकूबी फेटाळून लावली.
हा गोंधळ सुरू असतानाच; नगररस्त्यावरील खूळेवाडीला जाणारी बस बंद केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, महेंद्र पठारे, सुमन पठारे यांनी महापौरांच्या समोरच जमीनीवर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे सभागृहात आणखीनच गोंधळ उडाला. सुमारे अर्धातास सुरू असलेल्या या गोंधळानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने बहुमताच्या जोरावर ही तहकूबी फेटाळून लावली. त्यानंतर झालेल्या भाषणांच्या वेळी सत्ताधारी पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या कारभाराचे वाभाडेच काढले.मात्र, मुंडे यांच्या अचानक जाण्याने भाजपचीही चांगलीच कोंडी झाल्याने या टिकेला एकाही भाजप सदस्याला उत्तर देता आले नाही.
महापालिकेसाठी काळा दिवस…
महापालिकेच्या इतिहासात अशा प्रकारे अधिकाऱ्याने सभागृह सोडून जाणे म्हणजे काळा दिवस असल्याची टिका विरोधकांनी केली. तसेच महापालिकेत सत्तेत असताना; पुणेकरांच्या हिताची बाजू सोडून मुंढे यांची पाठराखन करणाऱ्या भाजपला पुणेकरांविषयी आपूलकी नाही तर सूड उगविण्याचा प्रकार असल्याची टिका विरोधीपक्षांच्या नगरसेवकांनी केली. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्यासह कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अविनाश बागवे यांनी मुंढेनी सभागृहात दिलेल्या माहीती मधील तफावतच आकडेवारी तसेच कागदपत्रांसह सभागृहाच्या समोर आणली. मात्र, यावेळी विरोधकांनी भाजपचाही शेलक्या शब्दात समाचार घेतला.मात्र, विरोधकांच्या टिकेवर हसण्यापलिकडे त्यांच्या टिकेला कोणलाच उत्तर देता आले नाही.
नगरसेवकांच्या सूचना मुंढेना पाठविणार…
सर्व सदस्यांची भाषणे झाल्यानंतर सभपतीपदी असलेल्या डॉ. धेंडे यांनीही मुंढे यांच्या या वर्तुनुकीचा निषेध केला. अशा प्रकारे सदस्यांच्या भावना तीव्र असताना; त्यांनी सभागृह सोडून जाणे योग्य नाही. त्यामुळे सदस्यांनी उपस्थित केलेले आक्षेप तसेच सूचना मुंढे यांना पाठवून त्यावर त्यांचा खुलासा मागविण्यात यावा असे आदेश डॉ. धेंडे यांनी यावेळी दिले. त्यानुसार, सदस्यांच्या भावना प्रशासनाकडून मुंढे यांना कळविल्या जाणार आहेत.
व्हीएस न्यूज - देशात ओबीसी व बलुतेदारांची संख्या मोठी आहे. त्यांनी संघटीत लढा उभा करावा. त्यांच्या हिताच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार न्यायाची भूमिका घेत आहे, असे प्रतिपादन खासदार अमर साबळे यांनी केले.
विविध मागण्या शासन दरबारी पोहोचविण्यासाठी बारा बलुतेदार समाज विकास संघाच्या शिष्टमंडळाने खासदार साबळे यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. मागण्यांचे निवेदन संघाचे अध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांनी दिले. यावेळी संघाचे सचिन राजेंद्र पंडित, प्रदेश निरीक्षक प्रदीप वाळुंजकर, शहराध्यक्ष नागेश भोपुलकर, संपर्कप्रमुख विशाल वाळुंजकर, सरला कानमपल्लीवार, अशोक पंडित, संतोष शिंदे, चेतन भालेराव, संदीप राऊत, गणेश वाळुंजकर, अनंत कानडे, नितीन कुटे आदी उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळाने बलुतेदारांना स्वतंत्र बजेट द्यावे, त्यांची जनगणना जाहीर करावी, क्रिमिलेअर मधून बलुतेदारांना बगळावे, बलुतेदारांसाठी व्यावसायिक, शैक्षणिक, प्रगतीचे धोरण ठरवावे, बलुतेदारांना सर्वत्र प्रतिनिधीत्व द्यावे,तसेच कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न व राष्ट्रसंत सेना व नामदेव महाराज यांच्यासह भाई कोतवाल यांचे टपाल तिकीट सुरू करावेत, आदी मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्या शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार साबळे यांनी शिष्टमंडळाला दिले. सूत्रसंचालन विशाल वाळुंजकर यांनी केले. आभार नागेश भोपुलकर यांनी मानले. निवेदन सचिव राजेंद्र पंडित यांनी केले.
व्हीएस न्यूज – रेल्वेच्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरी रेल्वे स्टेशन येथे 177/28 किलोमीटर येथे सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. मृताची ओळख पटलेली नाही.मयत व्यक्तीचे वय अंदाजे 65 वर्षे असून, उंची पाच फूट चार इंच, किरकोळ शरीरयष्टी, रंग काळासावळा, सरळ नाक, डोक्यावर पांढरे केस, अंगात पांढरा शर्ट, राखाडी निळी बरमुडा व लाल बनियन घातले आहे. या वर्णनाच्या व्यक्तिची माहिती असलेल्या नागरिकांनी पिंपरी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज – महापालिकेच्या रुग्णालय, दवाखान्यातील 21 डॉक्टरांच्या शहरांतर्गत अन्यत्र बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशाने प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
महापालिका आरोग्य वैद्यकीय विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या काही डॉक्टरांच्या शहरातंर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या बदल्यामध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. सुजाता गायकवाड यांची भोसरी रुग्णालयातून वायसीएम रुग्णालयात, डॉ. गोविंद तळपाडे यांची प्राधिकरणातून पिंपरीगाव दवाखान्यात, डॉ. वर्षा डांगे यांची कुटुंब नियोजन विभागातून वायसीएम रुग्णालयात, डॉ. विकल्प भोई यांची आकुर्डी रुग्णालयातून बोपखेल दवाखान्यात, डॉ. सुनीता साळवे यांची यमुनानगर रुग्णालयातून आकुर्डी रुग्णालयात, डॉ. गितांजली कोल्हे यांची यमुनानगर रुग्णालयातून वाल्हेकरवाडी दवाखान्यात, डॉ. सध्या भोईर यांची वाल्हेकरवाडी दवाखान्यातून म्हेत्रेवस्ती येथील दवाखान्यात बदली केली आहे.
डॉ. स्मिता नागरगोजे यांची नेहरुनगर येथील दवाखान्यातून यमुनानगर रुग्णालयात, डॉ. रामनाथ बच्छाव यांची भोसरी रुग्णालयातून यमुनानगर रुग्णालयात, डॉ. किशोरी नलवडे यांची थेरगाव रुग्णालयातून तालेरा रुग्णालयात, डॉ. आसावरी ढवळे यांची यमुनानगर रुग्णालयातून थेरगाव रुग्णालयात, डॉ. छाया शिंदे यांची यमुनानगर रुग्णालयातून नेहरुनगर दवाखान्यात, डॉ. राजीव शहारे यांची पोस्ट मार्टेम विभागातून यमुनानगर रुग्णालयात, डॉ. अंजली ढोणे यांची तालेरा रुग्णालयातून पुनावळे येथील दवाखान्यात बदली करण्यात आली आहे.
डॉ. श्रीराम भंडारे यांची पोस्ट मार्टेम विभागातून सांगवी रुग्णालयात, डॉ. संजय पोटे यांची पिंपरीगावातील दवाखान्यातून प्राधिकरणातील दवाखान्यात, डॉ. राहुल साळुंखे यांची पोस्ट मार्टेम विभागातून आकुर्डी रुग्णालयात, डॉ. तृप्ती सांगळे यांची वायसीएम मधून वैद्यकीय मुख्य विभागात, डॉ. मेधा खरात यांची वायसीएमएच् मधून भोसरी रुग्णालयात, डॉ. प्रकाश ताडे यांची भोसरी रुग्णालयातून सांगवी रुग्णालयात तर, डॉ. स्नेहा जगदाळे यांची सांगवी रुग्णालयातून भाटनगर येथील दवाखान्यात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, बदली झालेल्या डॉक्टरांनी त्वरीत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
व्हीएस न्यूज – पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ठेकेदार प्रसन्न पर्पलशी असलेला करार संपुष्टात आणल्याने संतप्त झालेले कर्मचारी बुधवारी सकाळी (दि. 22) नेहरुनगर डेपोबाहेर एकत्र जमले. या कर्मचाऱ्यांनी मार्गावर जाणाऱ्या अनेक बस रोखून धरल्या. अखेर पोलीस बंदोबस्त मागवत सुरक्षेत पीएमपीच्या सर्व बस मार्गांवर रवाना करण्यात आल्या.
दोन महिन्यांचे वेतन थकल्याने पीएमपीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.21) अचानक संप पुकारला. याचा फटका प्रवाशांना बसला. अनेक गाड्या मार्गांवर धावू न शकल्याने पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नावर देखील याचा परिणाम झाला. तुकाराम मुंढे यांनी ठेकेदार प्रसन्ना पर्पलशी असलेला करार रद्द केल्याने, कंत्राटी कामगार रोजंदारीपासून वंचित राहिले. दुसऱ्या दिवशी देखील या घटनेचे प्रतिसाद उमटले. सकाळी शेकडो कंत्राटी कर्मचारी नेहरुनगर बस आगारासमोर एकत्र जमा झाले. त्यांना प्रशासनाने कामावर रुजू करुन घेण्यास नकार दिल्याने ते आणखी संतप्त झाले.
दोन महिन्यांचे वेतन थकीत असतानाच कामावार रुजू करुन घेण्यास नकार दिल्याने कामगारांनी आगाराबाहेर येणाऱ्या बस काढण्यास विरोध दर्शविला. यामुळे पीएमपी प्रशासनासमोर पेच निर्माण झाला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता त्यांनी पोलीस बंदोबस्त मागविला. त्यानंतर हळुहळू सर्व बस मार्गावर रवाना झाल्या. या बहुतांशी सर्व बस पीएमपीच्या कायम कर्मचाऱ्यांनी मार्गावर नेल्या. मात्र, ठेकेदाराच्या बस मार्गावर धावू न शकल्याने दुसऱ्या दिवशी देखील अनेक मार्गांवर बस फेऱ्यांची कमतरता जाणवत होती. याबाबत नेहरुनगर आगार व्यवस्थापनाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ न शकल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
तीन दिवसांत थकीत वेतन देणार…
संतप्त जमाव झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत पोलीस बंदोबस्तात बस बाहेर सोडण्यात आल्या. त्यानंतर प्रसन्न पर्पल कंपनीच्या पदाधिकाऱ्यांकडून लवकरच यावर मार्ग काढला जाईल. आणि सर्व चालकांचा पगार येत्या तीन दिवसात मिळेल, असे आश्वासन प्रसन्न पर्पलच्या व्यवस्थापकांकडून मिळाले आहे, अशी माहिती या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिली.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) सेंट्रल ट्रेनिंग प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे यांची महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग ऍन्ड प्लेसमेंट ऑफीसर्सच्या (टीपीओ) अध्यक्षपदी निवड झाली.
मुंबईतील खालापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीत एकमताने प्रा. रवंदळे यांची निवड करण्यात आली. राज्यातील 250 अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्लेसमेंट ऑफीसर्स आणि प्रतिनिधी उपस्थित होते. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमता वृद्धिंगत करून त्यांना सुयोग्य ठिकाणी कॅम्पस मधून नोकरी मिळावी या उद्देशाने असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे.
पुढील काळात राज्यातील सर्वंच विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे असोसिएशन मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. असोसिएशनच्या कार्यकारी संचालकपदी सांगलीतील वालचंद महाविद्यालयाचे प्रा. संजय धायगुडे, सचिवपदी मुंबईच्या एससीओईचे प्रा. संजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
व्हीएस न्यूज – कॉलेजमधून जाऊन येतो, असे घरातून सांगून घराबाहेर पडलेला महाविद्यालयीन युवक बेपत्ता झाल्याची घटना कृष्णानगर चिंचवड येथे सोमवारी (दि.20) सकाळी सातच्या सुमारास घडली.
वैभव पांडुरंग बिराजदार (वय 17, रा. कृष्णानगर, चिंचवड) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील पांडुरंग बिराजदार यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वैभव हा निगडी येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. काल सकाळी सात वाजता कॉलेजला जात असल्याचे घरच्यांना सांगून तो निघाला. परंतु रात्री उशीरापर्यंत तो घरी परतला नाही. वैभवच्या घरच्यांनी त्याच्या मित्र, वर्ग शिक्षक आणि इतरत्र त्याचा शोध घेतला. परंतु, तो मिळून न आल्याने त्याच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड तपास करीत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002