व्हीएस न्यूज – महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवत, नजर चुकवून हात चलाखीने दीड लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्याने चोरुन नेले. ही घटना तळवडे येथील भवानी ज्वेलर्स या सराफी पेढीत 18 नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास घडली. अनिल बिले (वय 40, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी निगडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका 35 वर्षीय अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अनिल बिले यांची तळवडेत तुळजा भवानी ज्वेलर्स नावाची सराफी पेढी आहे. याठिकाणी त्यांची आई असताना, दागिने पाहण्याच्या बहाण्याने एक जण आला. त्यांच्या आईला बोलण्यात गुंतवून नजर चुकवत प्लास्टिकच्या डब्यातील दीड लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. निगडी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – काळेवाडी येथे शासकीय नोकरीचे अमिष दाखवून तरुणांची अकरा लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. एका कोचिंग क्लास चालकाने ही फसवणूक केली.
संजय लोखंडे (वय 46, रा. थेरगाव यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी रवींद्र विक्रम जाधव (वय 45, रा.बीड) असे आरोपीचे नाव असून, तो सध्या फरार आहे. प्रमोद मधुकर पाटकुले (वय 26 रा. थेरगाव) 3 लाख 60 हजार, प्रमोद भाऊसाहेब जोंधळे (वय 27 रा.कोकण गाव जि. अहमदनगर) 3 लाख 30 हजार, रोहिदास शेळके (वय 35 राहटणी) याने 2 लाख 80 हजार, सुजाता वसंत गागरे (वय 23 कानड गाव, जि, अहमदनगर), 1 लाख 30 हजार रुपये,शांताराम सुभाष गायकवाड (काळेवाडी) आणि प्रियांका गायकवाड प्रत्येकी 30 हजार रुपये रवींद्रला दिले आहेत.
गेली काही महिन्यांपासून जाधव हा काळेवाडी येथे आदर्श क्लासेसच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता. या क्लासला सहा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यात सुजाता वसंत गागरे आणि प्रियांका गायकवाड या दोन मुलींसह चार तरुणांचा समावेश होता. समाज कल्याण विभाग, माहिती बालकल्याण विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क येथे क्लार्क पदासाठी जागा निघाल्या आहेत. 16 सप्टेंबरला शिवाजीनगर येथे ऑफलाईन परीक्षा होईल. 30 सप्टेंबरला नोकरीवर रुजू व्हाल, असे सांगत रवींद्रने या विद्यार्थ्यांकडून 11 लाख 60 हजार रुपये घेतले. त्यानंतर तो पसार झाला. वाकड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरीश माने तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – यंदाचा श्रीमन श्रीमहासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव 27 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. समाधी महोत्सवाचे हे 456वे वर्ष आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन 27 नोव्हेंबर रोजी परमपूज्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 8 ते 9 दरम्यान श्रीमोरया गोसावी चरित्रपठण सतीश कुलकर्णींद्वारे होणार आहे तर चरित्रपठणाचे संयोजक किसनराव पाटील आहेत.
27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान रोज सायंकाळी पाच ते सात वाजे दरम्यान चारुदत्त आफळेबुवा यांचे दत्त संप्रदाय व गुरुशिष्य परंपरा या विषयावर प्रवचन होणार आहे. 5 आणि 6 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते सात वाजे दरम्यान प्रसिद्ध व्याख्यात्या अपर्णा रामतीर्थकर यांचे नाती जपुया या विषयावर व्याख्यान होणार आहे. मंगळवार 5 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता जितेंद्र अभ्यंकर आणि राधा मंगेशकर यांच्या गायनाचा मोगरा फुलला हा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी 6 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता प्रख्यात गायक आनंद भाटे (आनंद गंधर्व) यांचा आनंदरंग हा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी 7 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते सात दरम्यान संभाजी भिडे गुरुजी यांचे श्रीशिवछत्रपती आणि आपण या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच याच दिवशी सायंकाळी साडे सात वाजता श्री मोरया जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात माननीय संभाजी भिडे (गुरुजी) यांना परमपूज्य जगात गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. गुरुवारी सायंकाळी आठ वाजता विश्वविख्यात कलाकार तौफिक कुरेशी यांचे जेम्बे वादन होणार आहे.
शुक्रवार 8 डिसेंबर रोजी मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज,विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी,तसेच श्रीमोरया गोसावी समाधीची महापूजा, दिंडी सोहळा,हभप प्रकाशमहाराज बोधले यांचे काल्याचे कीर्तन आणि दुपारी १२ वाजले पासून महाप्रसाद वितरण होणार आहे. या कार्यक्रमांद्वारे सोहळ्याची सांगता होणार आहे.
व्हीएस न्यूज - केंद्र आणि राज्य सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यभरात आंदोलने सुरु केली आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस येत्या रविवारी (दि. 26) “हल्लाबोल’आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: सहभागी होणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसची खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार विलास लांडे, महिला शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर, माजी महापौर व नगरसेविका संगिता ताम्हाणे, संजय वाबळे, सरचिटणीस फजल शेख, आनंदा यादव, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, अरूण बोऱ्हाडे, विजय लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, प्रदीप गायकवाड, विशाल काळभोर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, संतोष वाघेरे, रशिद सय्यद आदी उपस्थित होते.
रविवारी दुपारी तीन वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. हनुमान मंदीर, आकुर्डी गावठाण ते तहसील कार्यालय प्राधिकरण येथे धडकणार असून मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकार सर्वंच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. फसलेली नोटबंदी, पूर्णतः फसलेली कर्जमाफी, वाढती महागाई, बिघडलेली कायदा-सुव्यस्था, लोडशेडिंग, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, शिष्यवृत्तीचे प्रश्न,वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण असे विविध प्रश्न सरकाराला सोडविता आले नाहीत. निवृत्त शिक्षक, शिक्षक यांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, सरसकट शास्तीकर माफीच्या घोषणेचे काय झाले?, स्मार्ट सिटीचे पुढे काय झाले. रिंग रोड रद्द करावा, रेडझोनची हद्द कमी करण्यात यावी. मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी. शहरातील अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा याचा जाब विचारण्यासाठी हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याचे, संजोग वाघेरे यांनी सांगितले.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे माजी आमदार, माजी महापौर, आजी-माजी नगरसेवक, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच सरकारच्या कारभाराला कंटाळलेल्या शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संजोग वाघेरे यांनी केले आहे.
मनसेचा १५ दिवसांची अल्टीमेटम, शहराध्यक्ष सचिन चिखले यांची माहिती
व्हीएस न्यूज – शहरातील राष्ट्रीयकृत बॅंकांमधील मराठी कामकाज कालबाह्य होत चालले असल्याचा मुद्दा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा खळ्ळखट्याक करणार आहे. येत्या पंधरा दिवसांत सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांनी आर्थिक कामकाजात मराठी भाषेचा वापर सुरू करावा, अन्यथा “मनसे स्टाईल’ने आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी पत्रकार परिषदेत गुरूवारी (दि. 23) दिला.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बॅंकांमधील मराठीच्या वापरासाठी आंदोलन छेडण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात हे आंदोलन करण्यात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने परिपत्रक काढून सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांना ग्राहकांच्या सोयीसाठी कामकाजामध्ये प्रादेशिक भाषेचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, रिझर्व्ह बॅंकेचे आदेश धाब्यावर बसवून सर्वच राष्ट्रीयकृत बॅंका मराठीचा वापर करण्यास उदासिन आहेत. त्याचा त्रास शहरातील मराठी भाषिक नागरिकांना होत आहे. त्यासाठी शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांनी कामकाज मराठीत करावे, असे चिखले यांनी सांगितले.
बॅंकांचे विविध प्रकारचे फॉर्म, माहितीपत्रके, सूचना फलक, बॅंकेच्या नावाचा फलक हा मराठी भाषेत असावा. बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी मराठीतून संवाद साधावा, अशा प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांचे पत्र मनसेतर्फे सर्व राष्ट्रीयकृत बॅंकामधील व्यवस्थापनाला देण्यात येणार आहे. त्यांना पंधरा दिवसांची मुदत देखील दिली जाणार आहे. तरीही, कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यास उदासिनता दिसून आल्यास संबंधित बॅंकांमध्ये मनसे स्टाईलने खळ्ळखट्याक आंदोलन केले जाईल, असे चिखले यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला मनसचे शहर सचिव राजू सावळे, हेमंत डांगे, राजेश अवसरे, रुपेश पाटेकर, संजय यादव, विशाल मानकरी, सुशांत साळवी, अक्षय नाळे, सुरेश सकट, संगिता देशमुख, विद्या कुलकर्णी आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा (एनएमव्हीपीएम) दुबई येथील मोगरासिस या प्रथितयश आयटी कंपनीसोबत औद्योगिक शैक्षणिक सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. मोगरासिसचे संचालक विपुल टापरे आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या.
या करारांतर्गत कॅम्पस प्लेसमेंट, विद्यार्थी प्रशिक्षण, संशोधन कार्य आदी महत्वपूर्ण बाबींवर एकत्रितपणे काम सुरु होणार असल्याची माहिती प्रा. विजय नवले यांनी दिली. यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष आमदार संजय तथा बाळा भेगडे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार सुरेशभाई शहा, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार एस.डी.गराडे,विश्वस्त भाईजान काझी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पद्माकर विसपुते, प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे यांनी या कराराविषयी समाधान व्यक्त करून अभिनंदन केले.
व्हीएस न्यूज – महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम प्रतिबंध विभागामार्फत काळेवाडी आणि रहाटणी परिसरात नव्याने सुरु असलेल्या 12 अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
त्यामध्ये पाच हजार 300 चौरस फूट इतके क्षेत्रफळ मोकळे केले. ब आणि ग क्षेत्रीय कार्यालयाने काळेवाडीतील विजयनगर येथील महाराष्ट्र कॉलनी, इंडियन कॉलनी आणि स्वप्ननगरी कॉलनीतील पूररेषेतील तळमजल्यावरील तीन बांधकामे पाडली. रहाटणीतील बळीराज कॉलनी परिसरातील दोन हजार 500 चौरस फुटांची तीन वाढीव बांधकामे पाडण्यात आली.
साईज्योत कॉलनी येथील दोन पक्की बांधकामे, एक पत्राशेड तसेच तीन वाढीव बांधकामे पाडण्यात आली. कार्यकारी अभियंता मकरंद निकम, मनोज सेठिया यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. यापुढेही कारवाई सुरु राहणार असून नागरिकांनी विनापरवाना बांधकाम करु नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
व्हीएस न्यूज – शहरात ई-कचरा (निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू)ही दुर्लक्षित बाब असल्यामुळे त्याचे घातक परिणाम आज शहराच्या सार्वजनिक आरोग्यावर जाणवू लागले आहेत. ही बाब गंभीरतने हातळण्यासाठी पर्यावरण संवर्धन समिती (ईसीए)या सामाजिक संस्थेने पुढकार घेतला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय स्तरावर या विषयी दोन बैठका झाल्या आहेत. ई-कचरा संकलन गरजेचे झाले असून या संदर्भात महाभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. 17 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत ई-वेस्ट संकलन महाअभियान संपूर्ण शहरात राबविले जाणार आहे.
या संदर्भात 23 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ई प्रभाग भोसरीच्या मुख्य कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी ई प्रभागातील हौसिंग सोसाट्याचे पदाधिकारी उपस्थित होते. ईसीएचे अध्यक्ष व या महाभियानाचे प्रमुख पर्यावरणतज्ज्ञ विकास पाटील यांनी यावेळी उपस्थितांना ई-वेस्ट संकलनाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच पाटील यांनी ई-कचऱ्यामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देताना सांगितले की आपल्याकडे साठून असलेला इलेक्ट्रॉनिक कचरा ई वेस्ट भंगार साहित्य खरेदी करणारे हातगाडी वाले यांना न देता ते शास्त्रीय पद्धतीने विघटन करणाऱ्या यंत्रणांना देण्यात यावा यासाठी जनजागृती करण्यात येईल.
यावेळी ई क्षेत्रीय कार्यालय अध्यक्ष भीमाताई फुगे, पर्यावरण तज्ञ विकास पाटील, इसीएचे पुरषोत्तम पिंपळे, प्रभाकर मेरुकर, दत्तात्रेय कुमठेकर, मनपा आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, कमिन्स इंडिया कंपनीचे पदाधिकारी संपत खैरे, नितीन साबळे, सायकलरचे प्रतिनिधी रणजीत भगत, विकास आंबले आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात एकूण 200 ई- वेस्ट संकलन केंद्र महा अभियानातंर्गत उभारली जाणार आहेत. प्रत्येक केंद्रावर विविध कॉलेजची मुले-मुली उपस्थित राहणार आहेत. ज्या सोसायट्या 100 किलो किंवा त्यापेक्षा जास्त ई-वेस्ट देतील त्यांचा इसीएकडून विशेष सन्मान केला जाणार आहे. ज्याना ह्या ई वेस्ट संकलन केंद्रावर स्वयंसेवक म्हणून काम करायचे असेल त्यांनी इसीएकडे संपर्क करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज – येथील एका कापड व्यापाऱ्याचा गळा आवळून खून करण्यात आला. शवविच्छेदन अहवालातून ही बाब उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 22) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली.
कुलवंत जनजीत जुनेजा (वय 37, रा. मोनिका अपार्टमेंट, पिंपरी) हे सकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल मागवला असता त्यामध्ये जुनेजा यांचा मृत्यू हा बेशुद्ध पडण्यामुळे झाला नाही तर गळा आवळल्याने श्वास गुदमरुन झाल्याचे समोर आले. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.23) सकाळी नऊच्या सुमारास चिखली येथील सरकारी दवाखान्यासमोर घडली.
दीपक वसंतराव पाटील (वय 30, रा. जाधववाडी, चिखली) असे मयत कामगाराचे नाव आहे. मयताचे सासरे तानाजी बापू इंगळकर (वय 54, रा. देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक पाटील त्यांच्या दुचाकीवरुन (एमएच 10, बीक्यू 6018) कामासाठी जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये पाटील यांच्या डाव्या खांद्याला व डोक्याला दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले पण त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दीपक पाटील हे म्हाळुंगे येथील एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होते. निगडी पोलीस तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002