व्हीएस न्यूज– महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम प्रतिबंध विभागामार्फत काळेवाडी आणि रहाटणी परिसरात नव्याने सुरु असलेल्या 12 अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
त्यामध्ये पाच हजार 300 चौरस फूट इतके क्षेत्रफळ मोकळे केले. ब आणि ग क्षेत्रीय कार्यालयाने काळेवाडीतील विजयनगर येथील महाराष्ट्र कॉलनी, इंडियन कॉलनी आणि स्वप्ननगरी कॉलनीतील पूररेषेतील तळमजल्यावरील तीन बांधकामे पाडली. रहाटणीतील बळीराज कॉलनी परिसरातील दोन हजार 500 चौरस फुटांची तीन वाढीव बांधकामे पाडण्यात आली.
साईज्योत कॉलनी येथील दोन पक्की बांधकामे, एक पत्राशेड तसेच तीन वाढीव बांधकामे पाडण्यात आली. कार्यकारी अभियंता मकरंद निकम, मनोज सेठिया यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. यापुढेही कारवाई सुरु राहणार असून नागरिकांनी विनापरवाना बांधकाम करु नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.