व्हीएस न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.23) सकाळी नऊच्या सुमारास चिखली येथील सरकारी दवाखान्यासमोर घडली.
दीपक वसंतराव पाटील (वय 30, रा. जाधववाडी, चिखली) असे मयत कामगाराचे नाव आहे. मयताचे सासरे तानाजी बापू इंगळकर (वय 54, रा. देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक पाटील त्यांच्या दुचाकीवरुन (एमएच 10, बीक्यू 6018) कामासाठी जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये पाटील यांच्या डाव्या खांद्याला व डोक्याला दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले पण त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दीपक पाटील हे म्हाळुंगे येथील एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होते. निगडी पोलीस तपास करत आहेत.