व्हीएस न्यूज - केंद्र आणि राज्य सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यभरात आंदोलने सुरु केली आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस येत्या रविवारी (दि. 26) “हल्लाबोल’आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: सहभागी होणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसची खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार विलास लांडे, महिला शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर, माजी महापौर व नगरसेविका संगिता ताम्हाणे, संजय वाबळे, सरचिटणीस फजल शेख, आनंदा यादव, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, अरूण बोऱ्हाडे, विजय लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, प्रदीप गायकवाड, विशाल काळभोर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, संतोष वाघेरे, रशिद सय्यद आदी उपस्थित होते.
रविवारी दुपारी तीन वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. हनुमान मंदीर, आकुर्डी गावठाण ते तहसील कार्यालय प्राधिकरण येथे धडकणार असून मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकार सर्वंच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. फसलेली नोटबंदी, पूर्णतः फसलेली कर्जमाफी, वाढती महागाई, बिघडलेली कायदा-सुव्यस्था, लोडशेडिंग, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, शिष्यवृत्तीचे प्रश्न,वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण असे विविध प्रश्न सरकाराला सोडविता आले नाहीत. निवृत्त शिक्षक, शिक्षक यांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, सरसकट शास्तीकर माफीच्या घोषणेचे काय झाले?, स्मार्ट सिटीचे पुढे काय झाले. रिंग रोड रद्द करावा, रेडझोनची हद्द कमी करण्यात यावी. मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी. शहरातील अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा याचा जाब विचारण्यासाठी हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याचे, संजोग वाघेरे यांनी सांगितले.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे माजी आमदार, माजी महापौर, आजी-माजी नगरसेवक, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच सरकारच्या कारभाराला कंटाळलेल्या शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संजोग वाघेरे यांनी केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002