व्हीएस न्यूज - अजंठानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डींगमध्ये गेल्या महिन्याभरापासून, पाण्याची टंचाई जाणवत आहे. याबाबत फ क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुन दखल घेतली जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागातर्फे शुक्रवारी (दि.10) हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास फ-प्रभाग कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी यावेळी दिली.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग अध्यक्षा गंगा धेंडे, कविता खराडे, पुष्पा शेळके, रेश्मा पठाण, पल्लवी साखळे, शिला भोंडवे, पौर्णिमा पालेकर, आशा शिंदे, दिपाली देशमुख, रेश्मा पठाण, संजय धेंडे, नवनाथ कांबळे, शिरीष आवाळे, दत्ता कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गंगा धेंडे यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चो काढून फ क्षेत्रीय कार्यालय कामकाजाचा निषेध करण्यात आला. यावेळी वैशाली काळभोर म्हणाल्या की, अजंठानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डींगमध्ये पाणी पुरवठा अनेक महिन्यांपासून सुरळीत होत नाही, तेथील रहिवासी कुंटूंबाची पाण्यावाचून वणवण सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही वारंवार होणारे दुर्लक्षामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोर्चो काढून निषेध केला आहे. तसेच दोन दिवसात पाणी पुरवठा सुरु न केल्यास प्रभागाला टाळे ठोकण्याचा इशाराही यावेळी दिला आहे.
व्हीएस न्यूज – सांगवी येथील मुळा व पवना नदीपात्रात मैलामिश्रित पाणी थेट सोडण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष केले असून चेंबर दुरुस्त करुन नदीपात्रात येणारे पाणी थांबवावे, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपळे गुरवमधील स्मशानभूमीच्या पाठीमागे ड्रेनेज लाईन फुटली आहे. तेथील मैलापाणी थेट पवना नदीच्या पात्रात जात आहे. या मैला पाण्यामुळे संपूर्ण नदीपात्र दूषित होवून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. याशिवाय त्या भागात डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नदीपात्रातील बहुतांश चेंबर तळाला फुटलेले असून संपुर्ण मैला मिश्रीत पाणी नदीपात्रात मिसळून पाणी दुषित होत आहे. दरम्यान, मैलायुक्त पाणी नदीपात्रात येऊनही स्थानिक नगरसेवक गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. निकृष्ट कामामुळे ही लाईन फुटली असून त्यांचा फटका पिंपळे गुरव, सांगवीकरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे नदीपात्रात मिसळणारे मैलापाणी थांबवावे, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - दुचाकीवरील चोरट्याने पादचारी नागरिकचा 5 हजार किंमतीचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना मंगळवार दि. 7 ला रात्री दहाच्या सुमारास हिंजवडीतील मेझा नाईक चौक ते लक्ष्मी चौक दरम्यान घडली.
या प्रकरणी मोहम्मद अन्सारी (वय 38, रा. मारुंजी रोज, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मोहम्मद हे मंगळवारी रात्री मेझा चौकाकडून लक्ष्मी चौकाकडे जात होते. यावेळी दुचाकीवरून येऊन चोरट्याने 5 हजार किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला, अशी माहिती पोलिसांनी दिली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिका 40 टक्के स्वहिश्यापोटी एकूण 157 कोटी रुपये अदा करणार आहे. त्यापैकी मागील सहा महिन्यात महापालिकेने 78कोटी अदा केले आहेत. संचलन तूट, पासेस आणि बसखरेदीसाठी ही रक्कम पालिकेने दिली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएल ही सार्वजनिक वाहतूक सेवा चालविण्यासाठी दोन्ही महापालिका निधी पुरवितात. त्यात पुण्याचा 60 टक्के, तर पिंपरीचा 40 टक्के हिस्सा आहे. चालू आर्थिक वर्षात संचलन तुट, बसपासेस आणि बसखरेदी या गोष्टींसाठी एकूण 156 कोटी रुपये इतका पिंपरी पालिकेचा हिस्सा दिला जाणार आहेत. त्यापैकी मागील सहा महिन्यात पिंपरी महापालिकेने एकूण 78 कोटी रुपये पीएमपीएमएलला अदा केले आहेत.
पालिकेने संचलन तुटीपोटी 42 कोटी, पासेस पोटी 16 कोटी लाख आणि बस खरेदीसाठी 20 कोटी रुपये असे एकूण 78 कोटी रुपये दिले आहेत. तर, उर्वरित सहा महिन्यात आणखी 78 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. दरम्यान, दरवर्षी पालिका तिजोरीतून कोट्यवधी रुपये देऊनही शहरातील बससेवेमध्ये कोणतीही सुधारणा होत नाही. शहरातील पीएमपीएमएलच्या तक्रारी सोडविल्या जात नसून लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या तक्रारीही ऐकून घेतल्या जात नाही. त्यामुळे पीएमपीएमएलच्या कारभाराबाबत सातत्याने नाराजीचा सूर आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी घेत असताना शहरामध्ये चांगली बससेवा पुरविली जावी, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.
व्हीएस न्यूज - टाटा मोटर्सच्या पिंपरी उत्पादन प्रकल्पातील नैसर्गिक वायूचा वापर करुन “प्री ट्रिटमेंट’ प्रकल्पाचे उद्घाटन कमर्शिअल व्हेईकल प्लांटचे प्रमुख अलोक सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पात लाईट,डिझेल ऑईल (एलडीओ) या पारंपारिक इंधनाऐवजी नैसर्गिक वायूच्या वापरामुळे प्रदूषण कमी होऊन, पर्यावरणाची हानी कमी झाल्याने कंपनीला फायदा होणार आहे.
या प्रकल्पामुळे यापूर्वी एलडीओवर चालणारे तीन ओव्हन्स् नैसर्गिक वायूच्या वापरवर कार्यान्वित केले आहेत. त्यामुळे पूर्वीची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. या बदलामुळे लॉंग मेंबरच्या रंगविण्याच्या दर्जामध्ये सुधारणा झाली असून त्याबरोबर वाहनांच्या फ्रेमच्या किंमतीमध्ये सुध्दा कपात झाली आहे.
यावेळी अलोक सिंग म्हणाले की, या सुधारित प्रकल्पामुळे पर्यावरणाच समतोल राखण्यास हातभार लागणार आहे. तसेच, नवनवीन संशोधनाद्वारे हरित पर्यावरण राहण्याच्या दृष्टीने काम असेच पुढे चालू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
व्हीएस न्यूज – चिखलीतील घरकुलमधील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.9) सकाळी साडे नऊच्या सुमारास उघडकीस आली. रोहीत सुभाष कांबळे (वय 23 रा. योगायोग बिल्डींग,घरकूल चिखली) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहीतचे पिंपरीतील मैत्रिणीसोबत भांडण झाले होते. त्यावेळी रोहितने तिला मारहाण केली होती. याप्रकरणी मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. रोहीतला त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली होती.
या गुन्ह्यामध्ये आपल्याला पोलीस अटक करतील या भितीने रोहीत ने आज सकाळी घऱात कोणी नसताना साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. त्याने दरवाजा ठोठावला परंतु आतून काही प्रतीसाद मिळू शकला नाही. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. रोहीत हा पिंपळे गुरव येथे एका खासगी कार्यालयात काम करत होता. चिखली येथील घरकूलमध्ये तो कुटुंबियांसोबत राहत होता. निगडी पोलिस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासातून उघडकीस आले आहे. याप्रकरणी विवाहितेचा पती आणि सासू यांच्याविरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेचा पती निहाल विजय वेलानी (रा. आझाद हिंद कॉलनी, पाचपीर चौक, काळेवाडी) आणि त्याची आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर स्वाती निहाल वेलाणी (वय 26) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पंडित पाटील (वय 58, रा. देशमुख गल्ली, अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती ही पुण्यात स्वारगेट येथे एका कंपनीत नोकरी करत होती. बुधवारी (दि. 1) ती नेहमीप्रमाणे नोकरीवर जाण्यास घराबाहेर पडली. मात्र, पिंपरी रेल्वे स्थानकावर येताच तिने जयपूर एक्स्प्रेस खाली आत्महत्या केली. स्वातीचे निहाल यांच्याशी तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच पती आणि सासुने फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये घेवून ये, असा स्वातीकडे तगादा लावला होता. त्यामुळे तिला नेहमी शारीरिक आणि मानसिक त्रास देत असत. रोजच्या या त्रासाला कंटाळून ती कामाला निघाल्यावर पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सकाळी अकराच्या सुमारास जयपूर एक्स्प्रेस खाली उडी घेवून तिने आत्महत्या केली.
व्हीएस न्यूज - पिंपळे निलख येथील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तुषार कामठे यांच्यावर खोटी कागदपत्रे दाखल करुन निवडणूक लढवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. कामठे यांनी बारावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख येथील कामठे यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढवताना बनावट कागदपत्रे सादर केली होती. या प्रकरणी 27 ऑक्टोबरला त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे कामठे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
कॉंग्रेसचे सचिन साठे यांच्या तक्रारीवरुन कामठे यांचे बारावीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. कामठे यांनी डेक्कन येथील एम. एम. विद्यालयात शिकत असताना अकरावीच्या वर्गात ते अनुतीर्ण झाले होते. मात्र, बारावी उत्तीर्ण असल्याच्या दाखला सादर करुन सांगवी येथील घोलप महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. हेच प्रमाणपत्र त्यांनी निवडणुकीच्या काळात सादर केले होते. कामठे हे पिंपळेनिलख येथील प्रभाग क्रमांक 26 (ब) येथून निवडून आले आहेत.
व्हीएस न्यूज - ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना शुक्रवारी न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाने डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दोन आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कुलकर्णी यांनी पुणे विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र,विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी बुधवारी तो फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
कुलकर्णी दाम्पत्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्य़ात त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज त्यांचे वकील अॅड. श्रीकांत शिवदे आणि अॅड. गिरीश कुलकर्णी यांनी न्यायालयात सादर केला होता. ठेवीदाराची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलकर्णी यांच्याविरोधात पुण्यात ३५१ ठेवीदारांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी देण्यात आल्या आहेत.
यंदाच्या वर्षी ठेवीदारांना तीस कोटी रुपये परत करण्यात आले आहेत तसेच गेल्या महिन्यात त्यांनी पाच कोटी रुपये ठेवीदारांना परत केले आहेत. सोळाशे ठेवीदारांनी कंपनीची परतावा योजना (रिफंड स्किम) मान्य केली आहे. मुदत संपलेल्या दोनशे कोटी रुपयांच्या ठेवीचे देणे कुलकर्णी यांना परत करायचे आहे. कुलकर्णी यांच्या कंपनीचे ४८ लाख चौरस फुट बांधकाम आहे. या बांधकामाच्या किमतीचा विचार केल्यास देय असलेल्या रकमेच्या पाचपट किंमत आहे. मार्च २०१८ पर्यंत ठेवीदारांना पैसे परत करण्याचे नियोजन आहे. कुलकर्णी यांनी स्वत:हून त्यांचे पारपत्र पोलिसांकडे जमा केले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या काही बदलांमुळे त्या कंपनीने व्यवहार केला नाही. त्यात बांधकाम क्षेत्रात होत असलेल्या बदलांचे परिणाम कुलकर्णी यांच्या नियोजित ड्रीम सिटी प्रकल्पावर झाले. कुलकर्णी यांच्या मोटारीचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. विविध कारणांमुळे कुलकर्णी यांच्या कंपनीसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीनअर्ज मंजूर करण्यात यावा, अशी विनंती अॅड. शिवदे यांनी युक्तिवादात केली होती. त्यानंतर त्यांना तात्पुरता जामीन मिळाला. मात्र, विशेष न्यायालयाने पुन्हा जामीन नाकारल्यानंतर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
व्हीएस न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे चार दिवसांच्या पुणे भेटीवर येत आहेत. गुरूवार, ०९ ते रविवार, १२ नोव्हेंबर २०१७ दरम्यान त्यांचा हा पुणे प्रवास असणार आहे.
हा पुणे प्रवास सरसंघचालकांच्या नियोजित प्रवासाचाच भाग असून ते या प्रवासादरम्यान विविध पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकींना उपस्थित राहून ते मार्गदर्शन करणार आहेत. या प्रवासातील तीन दिवस म्हणजेच गुरूवार, ०९ रोजी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील एका सेवेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार १० व शनिवार, ११ नोव्हेंबर रोजी तळेगाव येथील नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर चौथ्या दिवशी रविवार, १२ नोव्हेंबर रोजी मयुर कॉलनी, कोथरूडमधील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात होणार्या महाराष्ट्र राज्य समन्वय बैठकीला उपस्थित राहून ते मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान या बैठकीत महाराष्ट्रातील संस्था व संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. प्रतिवर्षी व विविध शहरांमध्ये होणारी ही बैठक यंदा पुण्यात होते आहे. संघ विचाराने प्रेरित होऊन काम करणार्या महाराष्ट्रातील विविध संस्था व संघटनांच्या कामांचा आढावा, संघटनात्मक वाढ, सेवा कार्यांची स्थिती,पुढील संकल्प याविषयी विस्ताराने चर्चा करण्यात येणार आहे. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह विनायक थोरात यांनी कळविली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002