व्हिएस न्यूज- देशभरात NEET-UG परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींविरोधात विद्यार्थी संघटना, विविध सामाजिक गट आणि विरोधी पक्षांनी उभारलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा करत विद्यार्थ्यांना उद्देशून एक खुले पत्र जारी केले आहे.
पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, गेल्या चार दशकांपासून ते शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून विद्यार्थ्यांच्या आकांक्षा, स्वप्ने आणि अपेक्षांचा त्यांनी नेहमीच आदर केला आहे. NEET-UG परीक्षेतील अनियमिततेची दखल घेत केंद्र सरकारने तातडीने चौकशीचे आदेश दिले, प्रकरण सीबीआयकडे सोपविले आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांनी पत्रात म्हटले आहे की, सुमारे २० लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयाने काम केले. कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये आणि परीक्षा माफियांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सरकार कटिबद्ध राहिल्याचा दावा त्यांनी केला.
धर्मेंद्र प्रधान यांनी पुढे म्हटले की, मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे त्यांना वैयक्तिकरीत्या दुःख झाले असून विद्यार्थ्यांचे भविष्य कोणत्याही कायदेशीर किंवा राजकीय संघर्षात अडकू नये, हीच त्यांची भूमिका आहे. देशातील युवकांची शक्ती ही भारताची खरी ताकद असून त्यांना भ्रमित करण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजीनामा पत्रात त्यांनी पंतप्रधानांचे मार्गदर्शन, मंत्रिमंडळातील सहकारी, मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच भविष्यातही देशसेवा आणि युवकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित संघटनांनी या घडामोडीला "विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय" असे संबोधले असून, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्याची मागणी कायम ठेवली आहे.
व्हिएस न्युज | प्रतिनिधी | दिनांक ६ जून २०२५ - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना ‘ईद-उल-अज़हा’ अर्थात ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या असून, या पर्वाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, सलोखा, सौहार्द अधिक बळकट करण्याचे आवाहन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, “त्याग, श्रद्धा, समर्पण या उदात्त मूल्यांची शिकवण देणारा ‘ईद-उल-अज़हा’चा सण समाजात एकता, शांतता, बंधुता, सौहार्द वाढवणारा आहे.
हा सण एकमेकांशी प्रेम, सहकार्य, आपुलकीची भावना दृढ करणारा असून, समाजातील वंचित, गरजू, उपेक्षित घटकांप्रती आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा आहे. या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो,” अशी सदिच्छा व्यक्त करत, एकात्मता, सहिष्णुता आणि परस्पर सन्मानाच्या मूल्यांना अनुसरून सामाजिक सलोखा दृढ करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
व्हिएस न्युज | प्रतिनिधी | दिनांक ६ जून २०२५ - बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहाच्या पवित्र पर्वानिमित्त जनतेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण आपल्या जीवनात शांतता, समृद्धी, आणि बंधुभाव घेऊन येवो, असे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
आपले राज्य ही सर्वधर्मसमभावाची भूमी आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृतीचे लोक प्रेमाने आणि सौहार्दाने राहतात. अशा या राज्यात बकरी ईदच्या दिवशी आपण एकमेकांच्या आनंदात सहभागी व्हावे. सण म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नव्हे, तर सामाजिक सौहार्दाचे सशक्त माध्यम आहे. हा सण आपल्याला परस्पर प्रेम, समर्पण आणि समाजातील गरीब गरजू लोकांबद्धल सहानुभूती बाळगणे शिकवतो. बकरी ईदच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य अधिक दृढ करावे, हीच अपेक्षा आहे,असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात.
व्हिएस न्युज | प्रतिनिधी | दिनांक ६ जून २०२५ - भारतीय संस्कृती आणि संत वाङ्मयाचे वैभव आपल्या लेखनातून, व्याख्यानातून दृग्गोचर करणारा व्यासंगी परंपरेचा एक मोठा दुवा निखळला आहे, अशा शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत नरहरी विष्णूशास्री तथा दाजी पणशीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस शोकसंदेशात म्हणतात, आजन्म ग्रंथोपासक, सडेतोड मिमांसक अशा या व्रतस्थ विचारवंताचे निधन ही मोठी हानी आहे. त्यांच्या घरात अनेक पिढ्यांपासून व्यासंगाची परंपरा होती. ती त्यांनी वेदाभ्यास, सरस्वतीस्वरुप ग्रंथाचा अभ्यास यातून समर्थपणे पेलली. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण ग्रंथाच्या प्रकाशानात त्यांचे मोठे योगदान राहिले.
महाभारतावरील त्यांचे भाष्य गाजले. वैविध्यपूर्ण व्याख्याने, विविध लेखमाला आणि विविध विषयांवरील विपुल लेखन संपदा अशी त्यांचा व्यासंग होता. त्यांच्या निधनामुळे चौफेर व्यासंग जोपासणाऱ्या परंपरेचा व्रतस्थ असा दुवा निखळला आहे. त्यांच्या निधनामुळे शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पहाणी
व्हिएस न्युज | प्रतिनिधी | दिनांक ६ जून २०२५ - संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाने सुक्ष्म नियोजन करावे. वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी बरड, फलटण, तरडगाव, लोणंद, निरा दत्त घाट पालखी तळांची पहाणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या पहाणी प्रसंगी आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपायुक्त तुषार ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सध्या पालखी मार्गावर पाऊस पडत आहे , या पावसापासून वारकऱ्यांचा बचाव व्हावा यासाठी दहा हजार क्षमतेचे वारकरी सेवा केंद्राची उभारणी करावी अशा सूचना करून ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले, वारकऱ्यांसाठी मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. पुरेशा प्रमाणात मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्ध करुन द्यावेत. जसजशी पालखी पुढच्या गावात जाईल तशी मागची गावे जिल्हा परिषदेने स्वच्छ करावीत. विद्युत वितरण कंपनीने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी तळावर हायमास्क दिवे लावावे. तसेच बेकायदा वीज कनेक्शन घेतले जावू नयेत यासाठी पोलीस व विद्युत वितरण कंपनीने पथक तयार करुन बेकायदा कनेक्शन कट करुन टाकावेत व कायदेशीर वीज कनेक्शन द्यावेत.
आरोग्य विभागाने पालखी मार्गात वैद्यकीय पथक तैनात करावेत. तसेच वारकऱ्यांसाठी गॅस व केरोसीन पुरविण्यात यावे. अन्न व औषध प्रशासनानेही अन्न पदार्थ तपासणीसाठी पथक तैनात करावे. वेळोवेळी वारकऱ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी करावी. ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत ती कामे ताडीने पूर्ण करावीत त्याचबरोबर जी कामे पूर्ण होणार नाहीत त्या ठिकाणी अपघात होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात.
पालखी सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने पालखी मार्गावर गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग करावा. आवश्यक तेथे निरीक्षण मनोरे उभे करावेत. चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक ते मनुष्यबळ पुरवावे. पार्किंगची व्यवस्था पुरेशी असेल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी केल्या.
व्हिएस न्युज -खेड तालुक्यातील रेटवडी गावातील पाच एकर जमीन स्वस्त दराने विकत घेऊन देतो असे ॲड.जैलेंदर राय(वाराणसी,उत्तरप्रदेश) यांना आमिष दाखवून १ कोटी पंधरा लाख रुपयेची फसुवणुक केल्या बद्दल कॅन्ट पोलिस स्टेशन उत्तरप्रदेश वाराणसी येथील दाखल गुन्ह्यात वाराणसी सत्र न्यायालयाने गुन्ह्यातील अटक आरोपी माणिक देवराम राऊत आणि त्याची मुलगी ह्यांचा जामीन फेटाळला. आरोपी यांच्यावर पुणे जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात विश्वासघात आणि फसवणूक केल्याबद्दल गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार विशाल माणिक राऊत अद्याप फरार आहे. आरोपींनी उत्तरप्रदेश वाराणसी येथील रहिवाशी ॲड.जैलेंदर कुमार राय यांना खेड तालुक्यातील रेटवडी गावातील शेत जमीन वाजवी दरात विकत घेऊन देतो असे आमिष दाखवले . जमिनीच्या व्यवहारा पोटी जैलेंदर कुमार राय यांच्या कडून एक कोटी पंधरा लाख रुपये घेतले आणि जमीन नावावर करण्यास टाळाटाळ केली . आरोपी जमीन नावावर करत नसल्याने फिर्यादी यांनी तगादा लावला असता आरोपींनी राय यांना फोन द्वारे धमकी देत म्हणाले की " जमीन नावावर करायची तर पुन्हा १ कोटी पंधरा लाख रुपये द्यावे लागतील आणि दिलेले पैसे आम्ही गुंडा टॅक्स म्हणून आपापसात वाटून घेतले आहेत ". आरोपींनी राय यांना शिवीगाळ केली आणि पुन्हा पैसे नाही दिले तर जिवे मारण्याची धमकी दिली. सदर घडलेल्या घटने संबंधी वाराणसी येथील पोलिसात गु.र.क्र ४८२/२०२३ प्रमाणे गुन्हे दाखल केला होतो. या वर आरोपींनी वाराणसी सत्र न्यायालयात जामिनीसाठी अर्ज केला होता तो अर्ज कोर्टाने फेटाळला.
व्हीएस न्युज- पुण्यात बीटी कवडे रोडवर काही दिवसांपूर्वी रात्री दुकान बंद करुन घरी जाणाऱ्या सराफावर भररस्त्यात गोळीबार करून फरार झालेल्या दिल्लीतील तीन आरोपीना पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडीही सुनावण्यात आली आहे. आरोपी हल्ला करून दिल्ली येथे पळून गेले होते. परंतु, पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी या आदी तीन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपी पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगार असल्याचे समोर आले आहे. आत्ता पर्यंत ह्या गुन्ह्यात एकूण सहा आरोपींनी अटक करण्यात आली आहे.
अहमद असदली त्यागी (वय ३४ रा. सिलमपुर, उत्तर पूर्व दिल्ली मुळ रा. हंडीया मोहल्ला, मुजफ्फरनगर, उत्तरप्रदेश), हनी जीते वाल्मिकी (वय २६ रा. आंबेडकर वस्ती, साऊथ वेस्ट दिल्ली) आणि सागर राज कुमार (वय २६, रा. वाल्मीकी मुहल्ला, नॉर्थ वेस्ट दिल्ली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सर्फराज शेख (वय-२३), लखन अंकोशी (वय-३५ दोघे रा. रामटेकडी, हडपसर), रफीक शब्बीर शेख (वय-३० रा. घोरपडी) यांना यापूर्वीच अटक केली आहे. पोलिसांनी भादवी कलम ३९७, ३४१, ३४ , शस्त्र अधिनियम,महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वानवडी पोलिस स्टेशनच्या पथकाने दिल्लीतून तीन आरोपींना अटक केली.
अटक केलेल्या आरोपींमध्ये शूटर बिलाल अहमद असदली त्यागी , हनी वाल्मिकी आणि सागर राज कुमार यांचा समावेश आहे. यापैकी त्यागीने सराफावर गोळी झाडली होती. सविस्तर माहिती अशी, की मदनलाल ओसवाल (वय ७१, रा. बीटी कवाडे रोड) आणि त्यांचा मुलगा प्रतीक ओसवाल (वय ३५) यांचे हडपसर येथे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे.बी.टी.कवडे रोडवरील जयसिंग ससाणे गार्डन जवळ दिनांक ८ नोव्हेंबर रोजी रात्री दुकान बंद करून ते घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्याकडे असलेल्या बॅगेत रोख रक्कम दहा हजार आणि दोन तोळ्याचे दागिने हिसकवण्याच्या प्रयत्न दरोडेखोरांनी केला असता प्रतिक याने त्यांना विरोध केला. यावेळी आरोपी त्यागी याने प्रतिकच्या दोन्ही पायावर आणि गालावर गावठी पिस्टलने गोळ्या झाडल्या. यामध्ये प्रतीक गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर इनामदार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, याप्रकरणी प्रतीकचे वडील मदनलाल ओसवाल यांनी एफआयआर दाखल केला.
या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि प्रतीकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी दिल्ली येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वानवडी पोलिसांचे एक पथक तातडीने दिल्ली येथे रवाना करण्यात आले. पथकाने तांत्रिक विश्लेषण व स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यातील तीन आरोपींना शिताफीने पकडले. त्यांना न्यायालयात हजर केले असता २० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान गुन्हे शाखा युनिट-५ ने केलेल्या तपासात गुन्ह्यातील आरोपी सर्फराज हनिफ शेख (वय-२३ रा. रामटेकडी) याच्यावर दुचाकी चोरीचा गुन्हा असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याच्या ठिकाणी बसवलेल्या अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि हल्लेखोरांनी पळून जाण्यासाठी वापरलेला मार्ग तपासला. तपासानुसार हल्लेखोरांनी पुण्यात एक खोली भाड्याने घेतली होती. तपासाच्या आधारे, वानवडी पोलिसांच्या पथकाने दिल्लीतील आरके पुरम परिसरातून तीन आरोपींना अटक केली.
व्हिएस न्युज - घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत चोर राजेश अरविंद राजभर याला पकडण्यात मानपाडा पोलिसांना यश मिळाले आहे. राजेश राजभर याला मानपाडा पोलिसांनी उत्तरप्रदेश आझमगड कंजहीत रायपूर येथून अटक केली. राजभर याच्यावर याआधी घरफोडीचे २२ गुन्हे दाखल असून पोलिसांच्या तपासात आणखीन ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून २१ लाख २६ हजार ६०० रूपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष बाब म्हणजे अनेक पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या राजभरला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशात त्याच्या गावी जाऊन मानपाडा पोलिसांनी वीटभट्टीवर मजूर असल्याचे भासावत राजभर ला सापळा रचून पकडले.
डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा परिसरात राहणाऱ्या ओमकार भाटकर रक्षाबंधन ला गावाला गेले असता त्यांचे बंद घर फोडून सोने चांदिचे दागिने लंपास केल्याची घटना भरदिवसा ३० ऑगस्टला घडली होती. दरम्यान या गुन्ह्याच्या तपासकामी डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे आणि मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके नेमली होती.
गुप्त बातमीदाराने दिलेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला अट्टल घरफोडया चो-या करणारा आरोपी राजेश राजभर यानेच हा गुन्हा केल्याचे समोर आले. त्याच्या ठावठिकाणाबाबत गोपनीय माहीती मिळवली असता सध्या अंबरनाथ येथे राहणारा राजेश हा त्याच्या मुळगावी उत्तरप्रदेशमधील आझमगड जिल्ह्यातील कंजहित रायपूर याठिकाणी आपले अस्तित्व लपवून राहत असल्याचे समजले.
पोलिसांची पथके त्याठिकाणी मार्गस्थ झाली. राजेशच्या येण्याजाण्याच्या मार्गाची माहिती काढुन त्यामार्गावर असलेल्या वीटभट्टीच्या ठिकाणी पोलिसांनी तेथील मजूरांचा वेश परिधान करून सापळा लावला. आरोपी राजेश दुचाकीवरून येताना दिसताच मजूरांचा वेश पेहराव केलेल्या पोलिसांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याला थांबविले आणि ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत मानपाडा हद्दीतील चार, महात्मा फुले चौक, पनवेल आणि अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक असे सात घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. राजेशचा त्याच्या गावी आलिशान बंगला आणि महागडया गाडया असल्याची माहीती देखील तपासात समोर आली आहे.
व्हीएस न्युज - सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत नई जिंदगी पोलीस चौकीत दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी दहा हजार रुपये लाच स्वीकारताना पोलीस हवालदारासह झिरो पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.१३) सायंकाळी करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार प्रमोद कांबळे व झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे अशी लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोन गटात तक्रार झाली होती या तक्रारीचा तपास पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे होता. त्यातील एका गटाला सहकार्य करण्याच्या अटीवर कांबळे याने वीस हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते.
तक्रारदार याने यासंदर्भात सोलापूर एसीबीकडे तक्रार केली. पथकाने सोमवारी पडताळणी करुन सायंकाळी सापळा लावला.पोलीस हवालदार कांबळे यांच्यावतीने तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये लाच घेताना झिरो पोलीस अलकुंटे याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलीस हवालदार कांबळे याला ताब्यात घेतले.दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हीएस न्युज -कल्याण-बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही अशी सबब कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनाकडून सांगितली जाते. मात्र बेकायदा बांधकामाकरीता पुरविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तापोटी २६ कोटी रुपये खर्च झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. मग हा खर्च कसा काय झाला असा सवाल बेकायदा बांधकाम प्रकरणातील याचिकाकर्ते कौस्तूभ गोखले आणि श्रीनिवास घाणेकर यांनी उपस्थित केला आहे.
बेकायदा बांधकाम प्रकरणी याचिकाकर्ते गा्ेखले आणि घाणेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या दोन्ही याचिकाकर्त्यानी माहिती अधिकारात एक माहिती उघड केली आहे. २००७ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत महापालिकेस बेकायदा बांधकामे तोडण्याकरीता पोलीस खात्यातील पोलीस आणि अधिकारी वर्ग करण्यात आले होते. त्याचे आदेश न्यायालयाने २००४ साली दिले होते. पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वेतन आणि भत्ते यावर २५ कोटी ७१ लाख ९२ हजार १०७ रुपये खर्च झाला आहे. एकीकडे महापालिकेकडे कडून प्रत्येक प्रभाग क्षेत्र कार्यालया अंतर्गत येणारी बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण सांगून बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई पुढे ढकलली जाते. त्यात चाल ढकल केली जाते. केवळ बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी पोलीस उपलब्ध होत नाही. तसेच फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करीताही पोलीस बंदोबस्त उपलब्ध होत नाही हे देखील कारण सांगितले जाते.
डोंबिवली गावदेवी मंदिरानजीक असलेल्या आरक्षित जागेवरील बेकायदा इमारत पाडण्यासठी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात या प्रकरणात याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी न्यायालयात ही बाब सांगितली तेव्हा न्यायालयाने महापालिकेस पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिल्यावर ही इमारत पाडण्याची कारवाई झाली होती. तर दुसरीकडे पोलीस बंदोबस्तावर २६ कोटी रुपयांचा खर्च केला गेला आहे. ही एक प्रकारे जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशाची उधळपट्टी आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण सांगणे प्रशासनाने बंद करुन बेकायदा बांधकामे पाडण्याची आणि फेरीवाले हटविण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्ते गोखले आणि घाणेकर यांनी केली आहे. बेकायदा बांधकामे अशा शिक्का असलेल्या मालमत्तांकडून मालमत्ता कराची वसूली कमी आणि अधिकृत बांधकामे असलेल्या मालमत्ता धारकांकडून होणारी मालमत्ता कराची वसूली जास्त आहे.
बेकायदा बांधकामे असलेल्या मालमत्ताच्या कर वसूलीत ३०० कोटीचा तोटा महापालिकेस सहन करावा लागतो अशी बाब माहिती अधिकारात याचिकाकर्ते गोखले यांनी उघडकीस आणली होती. बेकायदा बांधकाम प्रकरणाची चौकशी करण्यासाठी २००७ साली राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अग्यार समिती नेमली होती. या समितीवर सात कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. तसेच बेकायदा बांधकामे पाडण्याकरीता हैद्राबाद येथील एका संस्थेकडून महापालिका हद्दीतील गुगल इमेज घेण्यात आली होती.
त्यासाठी महापालिकेने तीन कोटी रुपये खर्च केले होते. आधीची आणि नंतरची इमेज जुळवून आधीच्या इमेज मध्ये नसलेले बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केली जाणार होती. तशी कारवाईच झाली नाही. ३ कोटीची गुगल इमेज धूळ खात पडून आहे.
व्हीएस न्युज - राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे. आता या नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी होत आहे. या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एका वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये म्हणजेच प्रति टन 133 रुपये दराने वाळू मिळणार आहे. वाळू मिळण्यासाठी ग्राहकांना महाखनिज या वेबपोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणे आवश्यक आहे. एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत वाळूचे लिलाव वेळेवर होत नसल्याने वाळूचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी सर्वसामान्यांना प्रति ब्रास वाळूसाठी जास्त पैसे मोजावे लागत होते. वाळूचा तुटवडा, वाळूसाठी अधिकचे पैसे, अवैध वाळू उपसा याला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे. या धोरणानुसार ज्या ग्राहकांना वाळू हवी आहे, त्यांनी महाखनिज या वेबपोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणे आवश्यक आहे. ज्यांना हे शक्य नाही, त्यांना सेतू केंद्रामार्फत ही मागणी नोंद करावी लागणार असून यासाठी लागणारे शुल्क जिल्हाधिकारी ठरविणार आहेत. येणाऱ्या काळात मोबाईल ॲपच्या माध्यमातून वाळूची मागणी नोंदविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार आहे.
अधिक वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतर पुन्हा वाळूची मागणी करता येईल. वाळूची मागणी नोंदवल्यानंतर 15 दिवसांच्या आत वाळू डेपोमधून ग्राहकांना नेता येणार असून यासाठीचा खर्च ग्राहकास करावा लागेल. वाळू डेपोतून वाळू नेताना ग्राहकांना आधार क्रमांक देणे आवश्यक असेल. आता वाळू 600 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे वाळूचे लिलाव बंद होणार असून डेपोतूनच वाळू विक्री करण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किमती आवाक्यात येण्यास मदत होईल, असेही मंत्री श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.
मूकबधिर शेतकरी आणि पत्नीची ३१ लाखाची फसवणूक आणि १४५ गुंठे जमीन बळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप लेकावर म्हाळुंगे एमआयडीसी आणि खेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल मुख्य आरोपी विशाल माणिक राऊत फरार व माणिक देवराम राऊत अटक.
व्हिएस न्युज - फिर्यादी शेतकरी महिला आणि तिचे मूकबधिर शेतकरी पती नवनाथ गाडे यांची भांबोली गावातील वडिलोपार्जित ३४ गुंठे शेत जमीन असल्याने सदरची जमीन विकून देतो असे सांगून आरोपी विशाल माणिक राऊत आणि माणिक देवराम राऊत (दोघे राहणार - बालाजी नगर मेदनकरवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे) यांनी विश्वासघात करून शेतकरी कुटुंबाची ३१ लाखाची फसवणूक केली आणि त्याच शेतकरी कुटुंबाची भांबोली येथील गट क्रमांक ६२/१ मधील १४५ गुंठे जमीन विशाल राऊत आणि त्याचे वडील माणिक राऊत यांनी इतर साथीदार आणि साक्षीदार काळुराम पंडित मोहिते आणि मयूर सुनील मोहिते (दोघे राहणार - मोहितेवाडी शेळ पिंपळगाव खेड) यांनी संगणमत करून शेतकरी कुटुंबाची मालकी हक्काची जमीन विक्री करण्यासाठी विश्वासाने विशाल माणिक राऊत यांनी कबुली जबाबाचे कुलमुखत्यार पत्र करून घेतले व त्याच्या आधारे शेतकरी मूकबधिर आणि अडाणी असल्याचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीर रित्या जमीन बळकवण्याचा दृष्ट उद्देशाने फसवणूक करून दिनांक १०/०४/२०२३ रोजी शेतकरी कुटुंब उपस्थित नसताना कोऱ्या कागदावर घेतलेल्या सह्या व अंगठ्याच्या ठशांचा वापर करून विशाल माणिक राऊत याने बनावट दस्त अस्तित्वात आणून त्या दस्ताच्या आधारे वडील माणिक देवराम राऊत यांच्या नावे सदर जमिनीचे साठेखत दस्त केला व बँकेतील खात्यात ७५ लाख रुपये शेतकऱ्याला दिल्याचे भासवून बनावट दस्त तयार करून फसवणूक केली सदर आरोपी विशाल राऊत आणि माणिक राऊत आणि त्यांचे साथीदार यांनी एकत्रितपणे संगणमत करून शेतकऱ्यांची फसवणूक केली व सदर विषयी खेड पोलीस ठाण्यात ४२०, ४६७, ४६८,४७१ व ३४ प्रमाणे दिनांक १७/०५/२०२३ रोजी गुन्हा दाखल झाला.
२०१८ मध्ये विशाल माणिक राऊत यांनी शेतकऱ्याचा विश्वास संपादन करून अगोदर भांबोली येथील शेतकऱ्याची ३४ गुंठे जमीन व्यवसायिक जयवीर यादव यांना विकू असे सांगितले आणि व्यवहार ठरला व विसार पावती म्हणून जयवीर यादव यांनी फिर्यादी शेतकरी यांचे नावे एक लाख रुपयांचा चेक दिला व आरोपी विशाल राऊत याने चेक वटवून सदरची रक्कम फिर्यादी शेतकरी यांचे ताब्यात देऊन त्यांचा विश्वास संपादन करून दिनांक २७/०३/२०१९ रोजी फिर्यादी महिला शेतकरी व त्यांचे पती नवनाथ गाडे व जयवीर यादव यांचे दुय्यम निबंधक कार्यालय, खेड येथे साठेखत वरून खरेदीखत करून दिले व ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे जयवीर यादव यांनी फिर्यादी शेतकरी यांचे बँक खातेवर ३४ गुंठे व्यवहाराचे ३३ लाख रुपये चेक द्वारे दिले असताना विशाल राऊत यांनी फिर्यादी महिला शेतकरी यांचा अडाणीपणाचा व त्यांचे पती मूकबधिर असल्याचा फायदा घेऊन त्यांना सदरची जागा विकून पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर, चेकवर आणि आर.टी.जी.एस फॉर्मवर सह्या घेऊन तसेच आधार कार्ड , पॅन कार्ड, डेबिट कार्ड स्वतःच्या ताब्यात ठेवून त्यांचा मौल्यवान दस्त बनवून सदर जागेच्या व्यवहारातील ३३ लाख रुपये हे शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा असताना आरोपी विशाल राऊत याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी शेतकरी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या परस्पर बँक खात्यातील २१ लाख रुपये हे स्वतःच्या बँकेमध्ये वळून घेतले आणि स्वतःच्या वडिल माणिक राऊत यांच्याशी संगणमत करून त्यांच्या खात्यावर पाच लाख रुपये वळून घेतले आणि फिर्यादी यांचे मूकबधिर पती यांना सोबत बँकेत घेऊन जाऊन पाच लाख रुपये काढून ते स्वतःकडे ठेवून फिर्यादी यांना वेळोवेळी तुमची १४५ गुंठे जमीन विकल्यानंतर व तुमचे नाव सात बाऱ्यावर चढल्यानंतर तुमचे पैसे जयवीर यादव हे देणार आहेत असे आश्वासन देऊन फिर्यादी शेतकरी पत्नी व त्यांचे मूकबधिर पती यांचा विश्वासघात करून त्यांची ३१ लाखांची फसवणूक केली व सदर विषयी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिनांक २२/०४/२०२३ रोजी भादवी कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल आहे.
म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपी विशाल माणिक राऊत आणि माणिक राऊत यांच्यातील माणिक राऊत यांना जामीन मंजूर झाला असून विशाल राऊत हा आरोपी अजूनही फरार आहे.
खेड पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपी माणिक राऊत यांना पोलिसांनी अटक केली व न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर २२/०५/२०२३ रोजी पोलिसांनी आरोपी माणिक राऊत यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.विशाल माणिक राऊत, काळुराम मोहिते, मयूर मोहिते हे अद्याप फरार आहेत.
दोन्ही गुन्ह्यातील मास्टरमाईंड विशाल राऊत पोलिसांना चकवा देत फरार आहे, का पोलीस शोध घेत नाहीत असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. सदर आरोपीला पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घ्यावे आणि सदर आरोपीने इतर कोणाची फसवणूक केली असल्यास पोलिसांशी संपर्क करावा असे आव्हान करावे असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002