निष्ठावंत शिवसैनिक गणेश आहेर यांची शिवसेना पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुखपदी निवड
पिंपरी
2026-09-23
व्हिएसन्युज – युवा उद्योजक आणि कडवट शिवसैनिक गणेशशेठ आहेर यांची शिवसेना पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गणेशशेठ आहेर हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी निष्ठेने जोडलेले असून, पक्षाची ध्येयधोरणे आणि विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. सर्वसामान्य नागरिक, युवा वर्ग तसेच स्थानिक सामाजिक प्रश्नांबाबत त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या एका निष्ठावंत शिवसैनिकाला पक्षाने शहरातील महत्त्वाची जबाबदारी दिल्याने शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवसैनिक, युवा कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तसेच नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे गणेशशेठ आहेर यांनी सांगितले.