पीसीयू येथे ‘इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन
व्हिएस न्युज - भविष्यातील तंत्रज्ञानाशी समन्वय साधणाऱ्या ‘इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स’सारख्या अत्याधुनिक सुविधा पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (पीसीयू) परिसरात उपलब्ध करून देणे हा आनंदाचा क्षण आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवोन्मेष, संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी या उच्च तंत्रज्ञान सुविधांचा पुरेपूर उपयोग करून आपले कौशल्य सिद्ध करावे, असे आवाहन पीसीयूचे कुलपती व पीसीइटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी केले.
दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये ‘इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील आणि ज्येष्ठ उद्योजक पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयू व्यवस्थापन समितीचे सदस्य अजिंक्य काळभोर व नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, आयटी आणि आयटीईएस प्रमुख डॉ. रामकृष्ण वडाली, पीसीयू फोर्ब्स मार्शल प्रमुख राजेश पाटील, डिजिटेक रोबोटिक इंडिया प्रा. लि.चे सीईओ व संस्थापक अजित गटे, लि.आम, गजानन पाटील आदी उपस्थित होते.
पद्मश्री प्रतापराव पवार म्हणाले, “एआय, रोबोटिक्स, ऑटोमेशन, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक व्हेईकल यांसारखी क्षेत्रे भविष्यातील उद्योगविश्वात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ संस्था आणि विद्यापीठ यांच्यातील सहकार्यामुळे शिक्षण अधिक परिणामकारक होऊन रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल.” भविष्यातील गरजा ओळखून पीसीयूने सुरू केलेले हे सेंटर ऑफ एक्सलन्स विद्यार्थ्यांसह उद्योग क्षेत्राच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी सांगितले.
पीसीयू-टाटा मोटर्स डिप्लोमा प्रमुख डॉ. उमेश पोतदार यांनी सांगितले की, या केंद्राचा उपयोग पीसीयू-टाटा मोटर्सच्या मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा कार्यक्रमासाठी तसेच केनिया आणि झांझिबार येथील विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित कौशल्य विकास कार्यक्रमासाठी होणार आहे.
डॉ. रामकृष्ण वडाली यांनी सांगितले की, सी-डॅक पुणे, डिजिटेक रोबोटिक इंडिया प्रा. लि. आणि एएमडी यांच्या सहकार्याने १६ अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. या सुविधांचा लाभ विद्यार्थी, संशोधक तसेच उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना घेता येणार आहे. या सेंटरमध्ये इंडस्ट्रियल ऑटोमेशन, इंडस्ट्रियल मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल रोबोटिक्स, स्मार्ट फॅक्टरी ऑटोमेशन विथ आयआयओटी, इंडस्ट्रियल व्हर्च्युअल फॅक्टरी ऑटोमेशन अँड डिजिटल ट्विन, एआय रोबोटिक्स अँड मशीन लर्निंग, इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी, ड्रोन टेक्नॉलॉजी, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल डिझाइन, ॲडव्हान्स्ड एम्बेडेड आयओटी व एआयओटी, इंडस्ट्रियल कॉम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग, हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग, एआय अँड ॲडॅप्टिव्ह कॉम्प्युटिंग तसेच संशोधन व विकास प्रयोगशाळेचा समावेश आहे.
या अत्याधुनिक केंद्रामुळे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक शिक्षण न घेता प्रत्यक्ष तंत्रज्ञानावर काम करण्याची, संशोधन करण्याची आणि उद्योगाच्या गरजांनुसार कौशल्य विकसित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पीसीयूच्या विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्य विकासाचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002