शास्त्रीय, सुगम व चित्रपट गीतांनी रंगली सुरेल संगीत मैफल
व्हीएस न्यूज - उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर निनाद’ या सुरेल संगीत मैफिलीला पिंपळे सौदागर परिसरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवार, दि. २० रोजी सायंकाळी उन्नतीच्या प्रांगणात रंगलेल्या या मैफिलीत शास्त्रीय, सुगम तसेच चित्रपट गीतांच्या बहारदार सादरीकरणाने वातावरण संगीतमय झाले.
गीतकार, संगीतकार व गायिका म्हणून परिचित असलेल्या भारती न्यायाधीश आणि त्यांच्या शिष्य कलावंतांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली. विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका विधी समिती सदस्या तथा प्रभागातील नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे यांनी संत तुकाराम महाराजांची रचना ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ सादर केली. त्यांच्या गायनातून त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वासोबतच कलाप्रेमी व्यक्तिमत्त्वाचीही झलक रसिकांना अनुभवता आली.
मैफिलीची सुरुवात ‘आले रे गणपती आज दारी रे’ या गणेशस्तवनाने झाली. त्यानंतर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील यमन, भूप, बिहाग, काफी आणि भीमपलास या रागांतील बंदिशी सादर करण्यात आल्या. अभिजात संगीताच्या सुरेल स्वराविष्कारानंतर सुगम आणि चित्रपट गीतांच्या सादरीकरणाने मैफिलीला उत्तरोत्तर रंगत आली.
अखेरीस भारती न्यायाधीश यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताने मैफिलीचा भावपूर्ण समारोप झाला. या मैफिलीत इरा, शौर्यवी, राघवी, ध्वनी, अथर्व, आस्मी, ओजस्वी, पयोधी, सौम्या, गार्गी आणि श्रीयान या बालकलावंतांसह सुलभा माने, प्रभा बसवंते, रेखा देवपूरकर, सुचिता सिदनाळे आणि सुनीता सावळे या ज्येष्ठ महिला शिष्य कलावंतांनी विविध गीतांचे सादरीकरण केले. सर्व कलावंतांना तबल्यावर चैतन्य डांगे, तर संवादिनीवर भारती न्यायाधीश यांनी समर्पक साथसंगत केली.
मैफिलीच्या निवेदनाची धुरा भामिनी महाले यांनी समर्थपणे सांभाळली. कार्यक्रमाच्या अखेरीस उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे, पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे आणि उद्योजक धनंजय भिसे यांच्या हस्ते सहभागी कलावंतांचा सत्कार करण्यात आला. रसिकांच्या उत्स्फूर्त दाद आणि टाळ्यांच्या कडकडाटात ‘स्वर निनाद’ मैफिलीची सांगता झाली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002