१७ सप्टेंबरच्या स्मरणासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा; अरुण पवार यांची मागणी
व्हीएस न्युज - मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असलेल्या १७ सप्टेंबरचे स्मरण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अपेक्षित स्वरूपात पुढाकार घेतला नसल्याची नाराजी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी व्यक्त केली आहे. हुतात्म्यांना अभिवादन, इतिहास प्रदर्शन, व्याख्याने तसेच विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर उपक्रम महापालिकेने आयोजित करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
भारत सरकारने १२ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत राजपत्रात हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीचा इतिहास नमूद करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला असला, तरी हैदराबाद संस्थानातील जनता निजामाच्या राजवटीखाली होती. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले आणि मराठवाड्यासह संबंधित भाग निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. या संघर्षात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण व्हावे, यासाठी १७ सप्टेंबरचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने मराठवाड्यातील नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे शहरासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करण्यासाठी महापालिकेने विशेष कार्यक्रम आयोजित करणे अपेक्षित असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
महापालिका स्तरावर विविध राष्ट्रीय दिन, महापुरुषांच्या जयंती तसेच स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम घेतले जातात. त्याच धर्तीवर १७ सप्टेंबरनिमित्त हुतात्म्यांना अभिवादन, व्याख्यानमाला, इतिहास प्रदर्शन, चित्रफिती तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेता येऊ शकतात. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांच्या आठवणी नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
“१७ सप्टेंबर हा केवळ एका प्रदेशाचा दिवस नसून, भारताच्या एकात्मतेच्या आणि स्वातंत्र्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्यायाचे स्मरण करणारा दिवस आहे. या दिवसाकडे कोणत्याही राजकीय चौकटीतून न पाहता इतिहास, हुतात्म्यांचे बलिदान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवस म्हणून त्याचे स्मरण व्हावे,” असे अरुण पवार यांनी सांगितले.
महापालिकेने पुढाकार घेतल्यास पिंपरी-चिंचवडमधील मराठवाडावासीयांसह सर्व नागरिकांना या इतिहासाची माहिती मिळण्यास मदत होईल. इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही पवार यांनी नमूद केले.
– अरुण पवार, संस्थापक अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ, पिंपरी-चिंचवड
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002