व्हीएस न्यूज - पुण्याच्या भूगाव येथे खेळवण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली आहे. अंतिम फेरीत अभिजीतने साताऱ्याच्या किरण भगतवर १०-७ अशी मात केली. सामना जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते मानाची चांदीची गदा देऊन अभिजीतचा सत्कार करण्यात आला.
सामना सुरु झाल्यानंतर, सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये अभिजीतकडे चांगली आघाडी होती. मात्र किरण भगतने जोरदार पुनरागमन करत सामन्यात ३-३ अशी बरोबरी साधली. यानंतर किरण भगतने काही खास डावपेच आखत अभिजीतला चांगलीच टक्कर दिली. यावेळी किरणला गुण न दिल्यामुळे काहीकाळ किरणच्या प्रशिक्षकांनी आक्षेपही नोंदवला, यावेळी काहीकाळासाठी सामना थांबलेला पहायला मिळाला.
मात्र यानंतर अभिजीत कटकेने सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करत किरण भगतला वरचढ होण्याची संधी दिली नाही. किरण भगतच्या तुलनेत अभिजीत हा उंची आणि वजनाने उजवा खेळाडू आहे. याचा फायदा घेत अभिजीतने किरणला चितपट देत अखेर महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावावर केला. अंतिम सामन्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही हजेरी लावली होती.
व्हीएस न्यूज - आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन वर्षामध्ये आणखी एका गोष्टीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहेत. जगभरातले टॉप सीईओ आणि सत्ताधीश एकत्र येणाऱ्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मोदी सहभागी होणार आहेत. गेल्या २० वर्षांमधील या परिषदेत भारतीय पंतप्रधानांनी सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतकंच नाही तर मोदी या परिषदेत मुख्य पाहुणे म्हणून सन्मानिले जाणार असून हा मान मिळणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.
दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताचा वरचश्मा राहील अशी चिन्हे आहेत, कारण यात सहभागी होणाऱ्या भारतीय उद्योजकांची व सरकारी अधिकाऱ्यांची संख्या शंभरावर असणार आहे. भारताची आर्थिक स्थिती व भारतामधील गुंतवणुकीच्या संधी या विषयांभोवती अनेक चर्चासत्रे आयोजित करण्यात आली असून भारतामध्ये परकीय गुंतवणूक आणण्यासाठी मोदी या परिषदेचा चांगला उपयोग करतील असे तज्ज्ञांचे मत आहे.
जानेवारी महिन्यात ही परिषद होत असून प्रजासत्ताक दिनही याच महिन्यात असल्याने भारतीय पंतप्रधान परिषदेला जाण्याचे टाळत आले आहेत. मात्र, अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून २३ ते २६ जानेवारी असा स्वित्झर्लंडचा हा दौरा करण्याचे मोदींनी ठरवले आहे. ते २६ जानेवारी रोजीच परततील आणि भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आसियानच्या नेत्यांचे स्वागत नवी दिल्लीत करतील.
याआधी केवळ दोन पंतप्रधानांनी पी. व्ही. नरसिंह राव व एच डी देवेगौडा या दोघा पंतप्रधानांनी दावोसच्या या परिषदेत सहभाग घेतला होता. त्यातली शेवटची भेट १९९७ ची असून या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणारे नरेंद्र मोदी हे २० वर्षांतील पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत.
मोदींच्या बरोबर ३० ते ४० सरकारी अधिकारी या परिषदेत सहभागी होणार आहेत. तसेच मोठ्या संख्येने भारतीय उद्योजकही या परिषदेत सहभागी होणार आहेत. भारतामध्ये असलेल्या गुंतवणुकीच्या संधी विदेशी गुंतवणूकदारांसमोर मांडण्यासाठी ही परिषद म्हणजे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. २०१९ च्या निवडणुकांपूर्वी भारतामध्ये तेजीचे चित्र आणायचे असेल आणि अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल तर विदेशी गुंतवणूक येणं गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर दावोसची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
व्हीएस न्यूज - देशातील १६ राज्यातील ५० हजारांहून अधिक मदरसा शिक्षकांना मागील दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडून वेतन देण्यात आलेले नाही. वेतन नसल्यामुळे अनेकजण आपले काम सोडण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, मध्य प्रदेश आदी राज्यांचाही समावेश असून येथील मदरसा शिक्षकांना स्कीम फॉर प्रोव्हायडिंग क्वॉलिटी एज्युकेशन (एसपीक्यूएम) अंतर्गत देण्यात येणाऱ्या वेतनाचा हिस्सा मिळालेला नाही.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २००८-०९ मध्ये मदरसांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी एसपीक्यूएमची सुरूवात केली होती. त्याअतंर्गत मदरसा शिक्षकांच्या वेतनातील मोठा हिस्सा केंद्र सरकारकडून देण्यात येणार होता. पदवीधर शिक्षकांना दरमहा ६ हजार तर पदव्युत्तर शिक्षकांना दरमहा १२ हजार रूपये देण्यात येणार होते. त्यांच्या वेतनातील हा क्रमश: ७५ आणि ८० टक्के हिस्सा होतो. वेतनाचा उर्वरित हिस्सा राज्य सरकारकडून दिला जातो, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.
आंदोलनाच्या पवित्र्यात मदरसा शिक्षक
अखिल भारतीय मदरसा आधुनिकीकरण शिक्षक संघाचे (एबीएमएएसएस) मुस्लिम राजा खान म्हणाले की, भारतातील अर्ध्याहून अधिक मदरसे उत्तर प्रदेशात आहेत. यूपीत २५ हजार मदरसे शिक्षक आहेत. सोळा राज्यातील शिक्षकांना केंद्र सरकारने वेतन दिलेले नाही. काही राज्यांमध्ये तर तीन वर्षांपासून वेतन देण्यात आलेले नाही. आम्ही ८ जानेवारी रोजी लखनऊ येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेश मदरसा बोर्डचे अधिकारी राहुल गुप्ता यांनी म्हणाले की, २०१६-१७ मध्ये २९६.३१ कोटी रूपये केंद्र सरकारने दिलेले नाहीत. २०१७-१८ मध्ये अद्यापतरी निधी जारी करण्यात आलेला नाही.
व्हीएस न्यूज - राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ रामेश्वर मुंडे यांच्या गाडीचा रविवारी रात्री अंबेजोगाई शहाराजवळील अंबासाखर रोडवरील वळणावर अपघात झाला. या अपघातात एकजण ठार झाला असून चौघे जखमी झाले आहेत.
रामेश्वर मुंडे त्यांच्या त्यांच्या कारमधून अंबेजोगाईच्या दिशेने जात होते. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. या अपघातात कारमधील धनराज कचरू बिडगर यांचा मृत्यू झाला. तर रामेश्वर व्यंकटराव मुंडे ज्ञानोबा नाथराव कराड, विलास सोपान जाधव आणि परमेश्वर दवणे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर रामेश्वर मुंडे पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमाच्या नावाखाली अनेक राज्यांमध्ये सामान्य लोकांची फसवणूक सुरू असल्याची बाब समोर आली आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याकडे आलेल्या एकूण अर्जांपैकी ३० लाख अर्ज बोगस निघाले आहेत. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये अनेकजण या योजनेविषयीचा खोटा प्रचार करत आहेत. तुम्ही ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेचा फक्त अर्ज भरलात तरी सरकार तुमच्या खात्यात २ लाख रूपये जमा करेल, असे सांगून लोकांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. या प्रत्येक अर्जासाठी लोकांकडून २० ते ५० रूपयांची रक्कम उकळण्याचा गोरखधंदा काहीजणांनी सुरू केलाय. त्यामुळे आता महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी चांगलेच चिंतेत पडले आहेत.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यापासून केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याकडे उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधून असे अर्ज येण्यास सुरूवात झाली. त्यानंतर पंजाबमधूनही मोठ्याप्रमाणावर बोगस अर्ज आले आहेत. महिला व बालकल्याण खात्याच्या दिल्लीतील गोदामात सध्या अशा बोगस अर्जांचा खच पडला आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाची केंद्र सरकारने अनेक माध्यमांमधून मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली होती. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमातंर्गत कोणतीही रोख रक्कम मिळणार नाही, असे वारंवार या जाहिरातींमधून सांगण्यात आले होते. मात्र, तरीही ही गोष्ट मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचली नसल्याची बाब यानिमित्ताने सिद्ध झाली आहे.
या पार्श्वभूमीवर गेल्याच महिन्यात केंद्रीय महिला व बालकल्याण खाते, गृह मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जे बोगस अर्ज संबंधित राज्यांकडे परत पाठवण्यात आले होते, ते आता परस्पर नष्ट करण्यात येतील. संबंधित लोकांना याची माहिती देण्यापेक्षा लोकांमध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाविषयी आणखी जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमातंर्गत कोणतेही वैयक्तिक लाभ मिळत नाहीत किंवा कोणताही थेट रक्कम बँक खात्यांमध्ये वळती केली जात नाही, हे पुन्हा एकदा जाहिरातींच्या माध्यमातून बिंबवण्याचा प्रयत्न होईल.
केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याने यापूर्वीच केंद्रीय अन्वेषण खात्याला (सीबीआय) या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केली होती. मात्र, तरीही मंत्रालयाकडे अशाप्रकारचे बोगस अर्ज येण्याचे प्रमाण कमी झाले नाही. यापैकी बहुतांश अर्ज हे पोस्टाने येत असल्याने आता सरकारने स्थानिक टपाल कार्यालयांना याबद्दल कळवण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हीएस न्यूज - चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आरजेडीचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांची रवानगी आता बिरसा मुंडा तुरूंगात करण्यात आली आहे. दरम्यान, तुरूंगात लालूप्रसाद यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे सांगण्यात येते. तुंरूग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लालूप्रसाद यांना वृत्तपत्रे, टीव्ही पुरवण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लालूप्रसाद सध्या तुरूंगात न्यायालयीन कारवाईशी संबंधित माहिती घेत आहेत. बिरसा मुंडा तुरूंगाचे अधीक्षक अशोककुमार चौधरी यांनी सांगितल्याप्रमाणे, तुरूंग नियमावलीनुसार लालूप्रसाद यांना आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी सकाळी आठ ते दुपारी १२ दरम्यान ते कोणालाही भेटू शकतात.
वर्ष २०१४ मध्ये लालूप्रसाद यांच्यावर ह्दयशस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या आहारावर खूप बंधने आहेत. ते सध्या शाकाहरी जेवण करत आहेत. लालूप्रसाद यांना पहिल्या दिवशी तुंरूगातील जेवण देण्यात आल्याचे पक्षाच्या झारखंड राज्याच्या अध्यक्षा अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत त्यांना घरचं जेवणही दिले जाऊ शके, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनी पक्षाच्या १०० हून अधिक नेत्यांसह बिरसा मुंडा तुरूंगाबाहेर आंदोलन केले. हे सर्वांना नियमबाह्य पद्धतीने लालूप्रसाद यांना भेटायचे होते. पण नियमानुसार कामकाजाच्या दिवशीच तुरूंगातील कैद्यांची भेट घेता येते.
भेटण्यास परवानगी नाकारल्यानंतर नेत्यांनी घोषणा देत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. जेल का फाटक टूटेगा, लालू यादव छूटेगा, या घोषणेसह ‘दम है कितना दमन में तेरे देख लिया है देखेंगे, जगह है कितनी जेल में तेरे देख लिया है देखेंगे, कितनी लंबी जेल है तेरी देख लिया है देखेंगे’ अशा घोषणा आंदोलनकर्त्या नेत्यांनी दिल्या. त्यानंतर पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर महत्प्रयासाने आंदोलनकर्ते शांत झाले.
व्हीएस न्यूज – राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबविलेला स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्रम कौतुकास्पद असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःबरोबरच मित्र परिवार, नातेवाईक यांनाही स्वच्छ सर्वेक्षण ॲप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन सह आयुक्त दिलीप गावडे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना व डॉ. डी. वाय. पाटील आर्टस, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय संत तुकाराम नगर, पिंपरी यांच्या सहकार्याने स्वच्छ महाराष्ट्र (नागरी) स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ जनजागृतीपर रॅलीतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी नगरसदस्या सुलक्षणा धर, डॉ. डी. वाय पाटील प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, प्रभाग अधिकारी आशा राऊत, प्राचार्या डॉ. स्नेहल अग्निहोत्री, उपप्राचार्य डॉ. रणजीत पाटील, प्राध्यापिका डॉ, मानसी कुर्तकोटी, इंदीरा अवसरे, निता मोहिते, डॉ. किशोर निकम, प्रा. जयवंत बाबर, कार्यालयीन अधिक्षक डी. डी. गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सह आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, या रॅलीमध्ये विद्यार्थीनींचा मोठ्या प्रामाणात सहभाग असून महिलाच ख-या अर्थाने स्वच्छतेची काळजी घेत असतात. ओला कचरा व सुका कचरा विलगिकरण करण्याची महिलांनी जबाबदारी घ्यावी. केंद्रशासनाने विकसीत केलेला स्वच्छ सर्वेक्षण ॲपचा वापर करुन अस्वच्छतेबाबतच्या तक्रारी महानगरपालिकेला ॲप द्वारे कळवाव्यात. स्वच्छ सर्वेक्षण ॲप मुळे शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी फार मोठी मदत होईल व शहरातील नागरिक पर्यावरण पुरक श्वास घेईल. शहरातील रोगराई व साथिचे आजार कमी होतील असेही ते म्हणाले. स्वच्छता विषयक घोषणा देत रॅलीची सुरुवात डॉ. डी. वाय पाटील महाविद्यालयापासूनझाली. या रॅलीचा मार्ग शनि मंदिर, विरंगुळा केंद्र, संततुकाराम महाराज पुतळा, एच.ए.मैदान चौपाटी, रोहन हाईट्स, डॉ. डी. वाय पाटील मेडिकल कॉलेज, वाय.सी.एम. हॉस्पिटल, शनि मंदिरा मार्गे पुन्हा महाविद्यालय असा होता. या रॅली मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. विद्यार्थ्याँनी स्वच्छते बाबत जनजागृतीपर विविध घोषणा दिल्या. नगरसदस्या सुलक्षणा धर म्हणाल्या, डॉ. डी. वाय पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या, सर्व प्राध्यापक व प्रशासन आणि विद्यार्थी व विद्यार्थीनी नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेत असतात. शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी आपण तरुण पिढीने घेतली पाहिजे. तरुणांच्या सहभागा शिवाय शहर स्वच्छ व सुंदर होणे शक्य नाही. आपण सर्वांनी मिळून या राष्ट्रीय कामामध्ये सक्रीय व्हावे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉ. डी. वाय पाटील प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील व प्रभाग अधिकारी आशा राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले यांनी केले. तर आभार प्राचार्या डॉ. स्नेहल अग्निहोत्री यांनी मानले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002