व्हिएस न्यूज - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या संख्येने रस्ते, समुद्र किनारे यावर होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्त चोख ठेवला असून पोलिसांच्या सुट्टया रद्द केल्या आहेत. इतकेच नव्हे तर ३० हजार अतिरिक्त पोलिस रस्त्यांवर तैनात केले गेले आहेत. या दिवशी इसिस दहशतवाद्यांकडून हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता मरीन ड्राईव्ह, वरळी सीफेस, बँड स्ट्रँड या सारख्या अति गर्दीच्या ठिकाणी नो पार्किंग झोन तयार केले गेले असल्याचे समजते. या परिसरात फटाके वाजविण्यावरही बंदी घातली गेली आहे.
या दिवशी दरवर्षी चौपाट्या तसेच रस्त्यांमध्ये अतोनात गर्दी होते. लोक नव वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतात. लोकांनी स्वतःची वाहने रस्त्यावर आणून गर्दी करू नये म्हणून बेस्ट व रेल्वेने मध्यरात्री पासून विशेष सेवा देणार असल्याची घोषणा केली आहे. बेस्ट जादा बसेस सोडणार आहे तर पश्चिम मध्य रेल्वे मध्यरात्रीपासून विशेष लोकल्स चालविणार आहे.
व्हिएस न्यूज – लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंड परिसरातील एका इमारतीला गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली. १५ जणांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. तर, १४ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
रात्री साडेबाराच्या सुमारास कमला मिल कंपाऊंड परिसरातील हॉटेल मोजेसला आग लागली. या आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान,ही आग शर्तीच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. केईम रुग्णालयात या आगीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
आगीत मृत्यू झालेल्यांची नावे – जीत (४९), प्रिती (३६),तेजल, प्रमिला, विश्वा (२३), विणा (२८), कविता (३६),परोली (३०), धैर्या (२६), मनिषा (३०), यश (२६)
आगीत जखमी झालेल्यांची नावे – शेफाली, खुशबू,रोहन (२२), अभिषेक (२२), दीप (३१), उत्सव (२७),अंकिता (३०), सिद्धार्थ (२४), नेहा (२८), शंक्रा, जीत (२१), यश (२२)
यातील शेफाली व खुशबू या दोघींची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये १२ मुलींचा, ३ मुलांचा समावेश असून त्यांचे मृतदेह केईएम रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. भीषण आगीमुळे येथे असलेल्या ईटी नाऊ, मिरर नाऊ,झूम या वाहिन्यांची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. कमला मिल परिसरात असलेल्या टीव्ही ९ मराठी,झूम टिव्ही, ईटी नाऊ, मिरर नाऊ या वृत्त वाहिन्यांच्या कार्यालयांना झळा पोहोचल्या आहेत. पब ‘वन अबव्ह’च्या मालकावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिएस न्यूज - राज्यसभेच्या जागेवरून आम आदमी पक्षात सुंदोपसुंदी सुरू झाली असून गुरुवारी कार्यकर्त्यांनी या विषयावरून धरणे आंदोलन केले. कुमार विश्वास यांच्या समर्थकांनी आपच्या कार्यालयात येऊन तेथे तंबू लावले.
कुमार विश्वास यांना राज्यसभेवर पाठवावे, अशी या कार्यकर्त्यांची मागणी आहे. दिल्लीतील वेगवेगळ्या विधानसभांसोबतच उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान येथूनही कार्यकर्ते आले असल्याचे अविनाश त्रिपाठी नावाच्या समर्थकाने नवभारत टाईम्स वृत्तपत्राला सांगितले.
विश्वास यांचे पाठिराखे गुरुवारी सकाळी 10वाजल्यापासूनच पक्षाच्या कार्यालयात गोळा व्हायला सुरूवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियातून कार्यकर्ता आणि विश्वास समर्थकांना मेसेज पाठवून कार्यालयात येण्यास सांगण्यात आले होते.
या संदर्भात आपकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली. याच्या उत्तरादाखल विश्वास यांच्या पाठिराख्यांनाही पोलिसांना लिहून दिले, की आम्ही पक्षाचे कार्यकर्ते असून पक्षाच्या आंतरिक स्वराजाच्या अंतर्गत शांततेने कार्यकर्ता संमेलन करत आहोत. मात्र पोलिसांनी पक्षाच्या लेटरहेडवर हे निवेदन नाही, असे सांगून ते घेण्यास नकार दिला तसेच विश्वास यांच्या समर्थकांना कार्यालयातून जाण्यास सांगितले.
व्हिएस न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या दृष्टीने अन्यायकारक अशी मुस्लीम समाजातील ‘ट्रिपल तलाक’ची प्रथा अवैध ठरविल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने गुरुवारी असा तलाक देणे हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तुरुंगात पाठविण्याची तरतूद असलेले विधेयक बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले.
या विधेयकाला काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचा विरोध व दुरुस्त्या नाकारून मंजुरी मिळाली असली तरी सत्ताधा-यांचे बहुमत नसलेल्या राज्यसभेत ते मंजूर करून घेण्यात सरकारचा कस लागेल. काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षाने विधेयकावरील चर्चेच्या वेळी या विधेयकाच्या स्वरूपावर आक्षेप घेतला. ‘ट्रिपल तलाक’ची प्रथा बंद व्हायला हवी, या बाजूचे काँग्रेस,अण्णाद्रमुक, डावे पक्ष, सपा, आरएसपी, राजद, बीजेडी यांच्यासह अन्य पक्ष दिसले. पण त्यांचा हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यावर आक्षेप होता. विधेयक सविस्तर विचार विनिमयासाठी संसदीय समितीकडे पाठविले जावे व नंतर ते एकमताने मंजूर करता येईल, असे त्यांचे म्हणणे होते.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही जर असे तलाक दिले जात असतील तर त्यावर काय कारवाई करावी यासाठी प्रचलित कायद्यात कोणतीही तरतूद नसल्यामुळे हे विधेयक संसदेने मंजूर करुन त्याला कायदेशीर स्वरुप द्यावे. त्यामुळे महिलांची मुस्लिम पुरुषांच्या अत्याचारापासून सुटका होऊ शकेल.
सरकार घाईघाईने हा निर्णय घेत आहे. त्याऐवजी सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करुन एक परिपूर्ण विधेयक सभागृहात मांडायला हवे असे काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, सुष्मिता देव, आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन,एमआयएमचे सदस्य असद्दुद्दीन ओवैसी, सपाचे धर्मेंद्र यादव, आरजेडीचे जयप्रकाश यादव या सदस्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले. या सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला की,ऐवढी काय घाई आहे की, हे विधेयक सरकार आजच मंजूर करु इच्छिते.
व्हिएस न्यूज - समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार नरेश अग्रवाल यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर सध्या बरेच अडचणीत आले आहेत. अलाहाबादमध्ये त्यांच्याविरोधात राष्ट्रीय हिंदू संघटनने जोरदार आंदोलन केले. त्यांच्या पुतळ्याचे दहनही यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर त्यांची जीभ कापून जो कोणी आणेल त्याला १० लाखांचा पुरस्कार देण्यात येईल अशीही घोषणा या संघटनेने केली आहे.
दहशतवादी म्हणून कुलभूषण जाधव यांचा उल्लेख करणे ही अतिशय शरमेची बाब असून त्यांनी यापुढे अशाप्रकारची वादग्रस्त विधाने करु नयेत यासाठी त्यांची जीभ कापली गेली पाहिजे. असे वक्तव्य या संघटनेचे संयोजक सत्येंद्र सिंह यांनी केले आहे. त्यांनी याचवेळी नरेश अग्रवाल यांची जीभ कापून आणणाऱ्याला १० लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे. तसेच या आंदोलनावेळी नरेश अग्रवाल यांचे राज्यसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप
व्हिएस न्यूज – राजकीय फायद्यासाठी भाजप खोटे बोलत असून त्यांच्यामुळे आज देशाला धोका निर्माण झाला आहे, शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका आहे. घटना बदलण्यासाठी भाजप गुपचूप कारस्थान करत असल्याचा आरोप कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
काँग्रेस पक्षाला १३३ र्वष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. अध्यक्ष म्हणून पक्षाच्या स्थापना सोहळ्याला राहुल यांनी पहिल्यांदाच संबोधित केलं. आपल्या देशाची पायाभरणी करणा-या घटनेलाच आज भाजपपासून धोका निर्माण झाला आहे. भाजपचे नेतेही त्यावर उघडपणे प्रतिक्रिया देत आहेत. घटना बदलण्यासाठी गुपचूप कारस्थानं सुरू असून घटनेला वाचविण्याची आपल्यावरच जबाबदारी असल्याचंही राहुल यांनी सांगितलं. ह्यआज देशाशी धोकेबाजी केली जात आहे.
भाजप राजकीय फायद्यासाठी खोटं बोलत असून त्यांच्यात आणि आपल्यात हाच फरक आहे. आपण भलेही काही चांगलं केलं नसेल, भलेही आपण निवडणुकांमध्ये पराभूत झालो असू. पण आपण सत्याची कास सोडता कामा नये, असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान, राहुल यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना ह्यजेटलाइ ( जेट असत्य) असं संबोधून त्यांची संभावना केली होती.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002