व्हीएस न्यूज – निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपचे नेते उच्चारवाने आमचे सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारपेक्षा वेगळे असेल,असे सांगत असत आणि खरोखरच आघाडी सरकारपेक्षा हे सरकार वेगळे आहे. मंत्रालयाचे भाजप सरकारच्या काळात ‘आत्महत्यालय’बनले असल्याची घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा एका तरुणाने मंत्रालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. आपल्या शेतात आज शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि आत्महत्येसाठी ते आता मंत्रालयाच्या दारातही येत आहेत. मंत्रालयाच्या दारात गेल्या तीन वर्षांत आत्महत्या करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेतल्यास भाजप सरकार काँग्रेसपेक्षा कितीतरी भयानक म्हणावे लागेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
बेरोजगार तरुणांनी, शेतकऱ्यांनी तसेच अन्यायग्रस्त लोकांनी गेल्या तीन वर्षांत मंत्रालयामध्ये न्याय मिळण्यासाठी उंबरठे झिजवले. पण आपल्याला मंत्रालयाच्या दारातही न्याय मिळणार नसल्याचे दिसून आल्यानंतर अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मंत्रालयात धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर काँग्रेसच्या काळातील त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचे प्रकरण असल्याचे सांगण्याचा निर्लज्जपणा दाखविण्यात आला. भाजप गेले तीन वर्षे सत्तेत आहे मग धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला द्यायला भाजप सरकारमधील मंत्र्यांना कोणी रोखले होते, असा सवाल राज यांनी केला.
मंत्रालयाच्या दारात अधिवेशन सुरू असताना धर्मा पाटील यांच्या आत्महत्येपूर्वीही मार्च २०१६ मध्ये माधव कदम यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. राजू आंगळे या तरुणाने त्याच वर्षी नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अलीकडेच एका तरुणाने मंत्रालयात सहाव्या मजल्याच्या सज्जावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या सहाव्या मजल्यावर जागोजागी जाळ्या बसविण्याचा विचार सुरू झाला. जाळ्या बसविण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडवले तर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही, असे राज यांनी स्पष्ट केले.
व्हीएस न्यूज – गंभीर संकटात देश असताना पकोडे- भजी या चर्चेत सर्वांना गुंतवून ठेवायचे आणि जवानांनी काश्मीरात रोज शहीद व्हायचे. सत्तेत येऊन मोदी सरकारला चार वर्षे झाली असून उकळत्या तेलातच काश्मीर प्रश्नाचा पकोडा फुटला, अशा शब्दात शिवसेनेने भाजपला फटकारले आहे.
काश्मीर प्रश्नावरुन मोदी सरकारवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. जगात पाकिस्तानला एकाकी पाडल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. पण भारताची साडी पाकिस्तान व त्यांचे दहशतवादी काश्मीरमध्ये रोज सोडत असल्यामुळेच तिरंग्यास मान खाली घालावी लागते, असे शिवसेनेने म्हटले आहे.
हाताबाहेर जम्मू- काश्मीरमधील परिस्थिती गेली असून दिल्लीच्या धमक्या पोकळ ठरवल्या जात आहे. या बलाढ्य देशाला सीमेवरील घटना मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. पकोडे व भजी तळण्यावर देशात राजकीय चर्चा सुरु आहे. सरकारच्या वतीने पाकला चोख उत्तर देऊ असे रोज सांगितले जाते. मग सरकारला अजून उत्तर सापडत नाही का?, दहशतवाद्यांसमोर काँग्रेसने गुडघे टेकल्याचा आरोप करणाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत पाकड्यांचे गुडघे फोडले का?, दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले का?, असे प्रश्नच शिवसेनेने सरकारला विचारले आहेत. देशातील गंभीर प्रश्नांवरून लक्ष उडावे यासाठी वैचारिक पकोड्यांचे तळणे सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पाकिस्तानचा पराभव करून इंदिरा गांधी यांनी फाळणी केली. अमेरिका त्यावेळी भारताविरोधात पाकच्या बाजूने होती. आता अमेरिकेसह बहुसंख्य देश मोदींच्या तालावर नाचतात असे सांगितले जाते. पण परिस्थितीत अजूनही फरक पडलेला नाही, असे शिवसेनेने नमूद केले.
व्हीएस न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी साराच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट उघडून आक्षेपार्ह ट्विट केल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आले होते. याप्रकरणी सायबर पोलिसांनी नितीन आत्माराम सिसोदे (वय ३९) याला अटक केली आहे. अंधेरी येथील लोकसरिता अर्पाटमेंटमधील फ्लॅटमधून नितीन सिसोदेला पोलिसांनी अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीनने सुमारे पाच महिन्यांपूर्वी गुगलवरून साराचा फोटो डाऊनलोड केला. त्यानंतर तिच्या नावाने एक बनावट ट्विटर अकाऊंटही सुरू केले. त्याचबरोबर याच बनावट अकाऊंटवरून त्याने ९ ऑक्टोबर २०१७ रोजी एक ट्विट केले,शरद पवार यांच्याविषयी यामध्ये आक्षेपार्ह लिहिले होते. दरम्यान, त्या कालावधीत सारा ही लंडनमध्ये होती, त्यामुळे सचिनच्या सचिवाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
ट्विटर अकाऊंट ज्या मोबाइलवरून काढण्यात आला होता, त्या मोबाइलचा आयएमइआय क्रमांक पोलिसांनी मंगळवारी शोधला. त्यांनी त्यावरून इंटरनेट पोट्रोकॉल (आयपी) अॅड्रेसही शोधला. पोलीस आयपी अॅड्रेसवरून नितीनच्या घरी पोहोचले. अटकेनंतर नितीनला किल्ला न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याला ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
व्हीएस न्यूज - बनावट परवान्याची समस्या दूर करण्यासाठी परवान्याला आधार क्रमांकाशी जोडण्याचे काम सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली. सर्व राज्यांचा यात समावेश करत एक नवीन सॉफ्टवेअर तयार केले जात आहे. न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या पीठाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. के एस राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील रस्ते सुरक्षा समितीने याची माहिती दिली. समितीने दिलेली ही माहिती महत्वाची आहे. कारण सध्या सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय संविधान पीठ आधार योजना आणि त्यासंबंधीत कायद्याचे संवैधानिकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी करत आहे.
समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मागील वर्षी २८ नोव्हेंबर रोजी रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांबरोबर बनावट परवान्याची समस्या आणि हा प्रकार संपुष्टात आणण्यासाठी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली होती. बनावट परवान्याविषयी संयुक्त सचिवांनी सूचित केले होते की, एनआयसीकडून सारथी- ४ सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सुरू असून नंतर ते आधार क्रमांकाशी जोडले जातील. सॉफ्टवेअर सुरू झाल्यानंतर देशात कुठूनही बनावट परवाना काढता येणार नाही.
समितीचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या वकिलाने सांगितले की, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय आणि दुसऱ्या प्राधिकाऱ्यांबरोबर २२-२३ फेब्रुवारीला समितीची बैठक होत आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचा विचार होईल. मंत्रालयाकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद पीठास म्हणाले की, २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये प्राणघातक रस्ते अपघातांची संख्या सुमारे ३ टक्क्यांनी कमी झाली आहे. यावर पीठाने समाधान व्यक्त केले.
व्हीएस न्यूज - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना बुधवारी लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे राज्यसभेतही काँग्रेसच्या खासदारांनी घोषणाबाजी करत मोदींच्या भाषणात व्यत्यत आणण्याचा प्रयत्न केला. मोदींच्या भाषणादरम्यान व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपरोधिक टीका केली ज्यामुळे विरोधक मोदींवर संतापले आहेत. मोदींनी रेणुका यांची तुलना रामायणातील राक्षसांच्या हसण्याशी केली.
पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांपैकी रेणुका चौधरी यादेखील होत्या. रेणुका यांच्या हसण्यावर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान बोलत असताना त्यांच्यावर हसणं हे चुकीचं असल्याचं नायडू यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. पण, या प्रकरणात हस्तक्षेप करत मोदींनी रेणुका चौधरी यांच्यावर उपरोधिक टिका केली. ‘सभापती महोदय माझी विनंती आहे रेणुका यांना तुम्ही काहीही बोलू नका. रामायण मालिकेनंतर बऱ्याच दिवसांनी अशा प्रकारचं हसू कानावर पडण्याचं सौभाग्य मला लाभलं आहे’. अशी उपहासात्मक प्रतिकिया देत मोदींनी चौधरी यांना शांत केलं. मोदींच्या या उपरोधिक बोलण्यामुळे आणि राक्षसांच्या हसण्याची तुलना करण्यानं भाजपच्या खासदारांमध्ये हशा पिकला आणि वरमलेल्या चौधरींचं हसणं बंद झालं.
नरेंद्र मोदींच्या टोल्यावर रेणुका चौधरी यांनी तीव्र नापसंती दर्शवली. ‘मोदींकडून तुम्ही यापेक्षा जास्त काय अपेक्षा करू शकता? त्यांच्या टीकेवर मला काहीही बोलायचं नाही. त्यांच्या पातळीला उतरून मी टीका करू शकत नाही. मोदींच्या टोल्यानंतर भाजप महिलांच्या किती विरोधात आहे हे साफ दिसून येतं. मी हसले, हेच मोदींच्या जिव्हारी लागलं कारण माझ्या हसण्याला सत्याची धार होती’ अशी प्रतिक्रीया त्यांनी ‘एएनआय’या वृत्तसंस्थेला दिली. तर दुसरीकडे राहुल गांधीच्या ७० हजारांच्या जॅकेटवरूनही रेणुका यांनी भाजपवर टीका केली. शिलाँगमधल्या एका संगीत कार्यक्रमासाठी राहुल गांधींनी ७० हजारांचे जॅकेट परिधान केले असल्याचे ट्विट भाजपनं केलं होतं. मला भाजपनं जॅकेटच्या किंमतीबाबत केलेल्या दाव्याबद्दल हसू येत आहे असंच हुबेहुब जॅकेट मी ७०० रुपयांना मोदींना आणून देते, पण ५६ इंचाच्या छातीपलिकडे माझ्याकडे माप नाही’ असंही त्या म्हणाल्या.
व्हीएस न्यूज - राजस्थानमधील पोटनिवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर मुख्यमंत्री वसुंधरा राजेंविरोधातील भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी आता समोर येऊ लागली आहे. कोटा जिल्ह्याचे ओबीसी विंगचे प्रमुख अशोक चौधरी यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहून मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना हटवण्याची मागणी केली आहे. वसुंधरा राजे यांच्या कार्यशैलीवर राज्यातील जनता खूश नाही, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी पक्षाचे प्रदेश प्रमुख अशोक परनामी यांनाही पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
अशोक चौधरी म्हणाले की, सध्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसतोय. मी राजस्थान भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे माझ्या पत्रात मांडले आहे. पत्रातील प्रत्येक शब्द पक्ष कार्यकर्त्यांची हतबलता व्यक्त करतो, असेही ते म्हणाले. पत्र लिहिण्या मागचे कारण त्यांना विचारले असता ते म्हणाले, कार्यकर्त्यांच्या नाराजी नंतर मला वाईट वाटले. त्यामुळे असे पत्र लिहिण्यास मला नाईलाज झाला. राजस्थानमधील तीन जागांवर भाजपाला अपयश आल्यानंतर म्हणजे एक फेब्रुवारीनंतर हे पत्र लिहिण्यात आले होते. राज्यातील जनता वसुंधरा राजेंच्या कार्यपद्धतीवर खूश नाहीत. त्यांच्या काम करण्याच्या या शैलीमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढासळत आहे. त्याचा पक्ष संघटनेला फटका बसत आहे,असे म्हणत वसुंधरा राजे पक्षाला अशा मार्गावर नेत आहेत, जिथे पक्षाचा पराभव निश्चित आहे, असा दावाही त्यांनी केला. आगामी निवडणुकांपूर्वी पक्षात चैतन्य आणायचे असेल तर राज्याच्या नेतृत्वात बदल करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले.
व्हीएस न्यूज - सर्वसामान्यांना कारचं स्वप्न दाखवणारी टाटा मोटर्सची महत्त्वाकांक्षी नॅनो शेवटचे आचते देत असून कदाचित वर्षभरात तिचं उत्पादन बंद होण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सचे व्यवसथापकीय संचालक गुंटर बुशक यांच्याशी बोलताना नवीन सुरक्षेचे निकष लागू झाल्यामुळे नॅनोमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील. यामध्ये ती बंद करण्याचा व एकदम नवीन गाडी तयार करण्याचा प्रस्तावही असू शकतो. वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरू असल्याचे गुंटर यांनी सांगितले.
अजून कुठलाही निर्णय घेण्यात आला नसून जर सुरक्षा निकषांमध्ये बसायचं तर नॅनोच्या नूतनीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागेल असे ते म्हणाले. टाटा मोटर्स सध्या नवीन कार्स व एसयुव्ही लाँच करत आहे. तसेच कंपनीच्या ताफ्यात कुठल्या गाड्या आहेत, कशाची कमतरता आहे आदीबाबत एकूणच सर्वांगी विचार करण्यात येत आहे. नवीन सुरक्षा निकषांमुळे अनेक मॉडेल्सच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीला सुरक्षाविषयक कठोर नियम लागू होणार आहेत आणि सध्याची नॅनो व अनेक गाड्या त्यात बसणार नाहीत अशी स्थिती आहे.
टाटा नॅनो ही 2009 मध्ये झोकात सादर करण्यात आली. तत्कालिन अध्यक्ष रतन टाटा यांच्या कल्पनेतून या गाडीचा जन्म झाला आणि एक लाखाची गाडी अशी तिची ओळख झाली. कालौघात किंमत वाढली पण नॅनो सगळ्यात स्वस्त कारच राहिली. सिंगूर जमीन प्रकरणावरून झालेल्या विलंबानंतर अखेर गुजरातमधल्या साणंद येथून उत्पादन झालेली नॅनो बाजारात मात्र यश मिळवण्यास अपयशी ठरली. नॅनोला वर काढण्याचे कंपनीचे सगळे प्रयत्न फोल झाले असून रतन टाटांची महत्त्वाकांक्षी कार सध्या तरी विपन्नावस्थेत आहे. दिल्लीतल्या ऑटो एक्स्पोमध्ये टाटा मोटर्सने दोन कन्सेप्ट कार्स सादर केल्या आहेत. यामध्ये एका एसयुव्हीचा तर एका हॅचबॅकचा समावेश आहे.
व्हीएस न्यूज - - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार असलेल्या बहुचर्चित मुलाखतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. २१ फेब्रुवारीला ह्या बहुचर्चित मुलाखतीचा कार्यक्रम साकारला जाणार आहे. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ही जाहीर मुलाखत रंगणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील या दोन दिग्गज नेत्यांचा राजकारणासोबतच सामाजिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये वावर आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या मिश्किल टिप्पणी करण्याच्या हातोटीमुळे या मुलाखतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सुरवातीला ३ जानेवारीला ही मुलाखत होणार असे जाहीर करण्यात आले होते. पुण्यात जानेवारी महिन्यात जागतिक मराठी अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या शोध मराठी मनाचा या संमेलनात ही मुलाखत होणार होती. मात्र काही कारणामुळे ६ जानेवारीला मुलाखतीची तारीख ठरवण्यात आली. दरम्यान भीमा कोरेगाव प्रकरणामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बिघडली आणि हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. आता अखेर या लक्षवेधी मुलाखतीसाठी २१ फेब्रुवारीचा मुहूर्त सापडलाआहे. शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीची ५० वर्ष आणि शोध मराठी मनाचा या संमेलनाच्या निमित्ताने शरद पवारांची आगळी वेगळी मुलाखत घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता. मात्र या मुलाखतीसाठी मुलाखतकार म्हणून कोण असावे यावर मोठा खल झाला आणि अखेर राज ठाकरे यांचे नाव समोर आले. वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी हा योग जुळवून आणण्यासाठी प्रयत्न केले. सोबतच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही या मुलाखतीसाठी पुढाकार घेतला होता. मात्र तारीख जाहीर झाल्यानंतरही प्रत्यक्ष मुलाखतीचा योग जुळून आला नव्हता.
व्हीएस न्यूज - - संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला तेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आकांडतांडव करणा-या शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत मात्र मूग गिळून बसणे पसंत केले. या प्रकरणाचा मुख्य सचिवांकडून संपूर्ण अहवाल येणे अपेक्षित होते. मात्र त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही.
धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन केल्यानंतर त्यांचा जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष केले होते. ‘धर्मा पाटील प्रकरणावर मुख्यमंत्री का बोलत नाहीत’ असा सवाल रावते यांनी केला होता. त्यावेळी एक आठवडय़ात याबाबतचा अहवाल सादर करावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले होते. या घटनेची गंभीर दखल घेत आलेल्या माहितीवर कृती आराखडा तयार करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.
सरकारने आदेश देऊन आठवडा उलटून गेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा अपेक्षित होती. मात्र मंगळवारच्या बैठकीत कोणताही अहवाल आला नाही. गेल्या वेळी शेतकरी आणि धर्मा पाटील प्रकरणाबाबत मोठा कळवळा असल्याचा आव आणणा-या शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीत तोंडही उघडले नाही. याबाबत शिसेनेचे मंत्री रामदास कदम यांना विचारले असता, आज मंत्रिमंडळात खूप विषय असल्याने त्यावर चर्चा झाली नसल्याचे सांगून त्यांनी काढता पाय घेतला.
काय आहे प्रकरण?
धुळे जिल्ह्यात होणा-या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादीत करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची ६०० झाडे होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ ४ लाखांचा मोबदला देण्यात आला. इतर शेतक-यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरे मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केले. पाटलांच्या विषप्राशनानंतर जाग आलेल्या सरकारने पाटील यांच्या कुटुंबियांना १५ लाखाचे सानाुग्रह अनुदान देऊ केले. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी लावून पाटील कुटुंबाने धरली आहे.
व्हीएस न्यूज - यंदा केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद ही २६ टक्क्यांनी वाढली असल्यामुळे हा अर्थसंकल्प चांगला आहे. पण अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी अनेक योजना तसेच त्यासाठी निधीची तरतुदी केली जाते, पण तो निधी खर्च का केला जात नाही ? असा सवाल शिवसेनेच्या नेत्या तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला.
डॉ. गोऱ्हे यांनी महिलांसाठी असलेल्या अनेक योजना या तळागाळापर्यंत पोहचत नाहीत याविषयी मुंबई मराठी पत्रकार संघात ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आपली खंत व्यक्त केली. त्यांनी केंद्र सरकारच्या काही योजनांचे स्वागत करत अनेक योजनांवर जोरदार टीका केली.
मागील अर्थसंकल्पात महिलांसाठी महत्वाची असलेली मनोधैर्य योजनेत करण्यात आलेली तरतूद खर्च झाली नाही. तसेच यावेळी गोऱ्हे यांनी त्यात आणि निर्भया योजनेत निधीची कपात केल्याने नाराजी व्यक्त केली. सौभाग्य योजना आणि महिलांना वीज पूरविणाऱ्या केंद्र सरकारच्या योजनावर टीका केली. ग्रामीण विकास आणि त्यासाठीच्या योजनांत महिलांना कुठेही स्थान नाही. सुकन्या योजना, मागास मुलींना शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रयोगशाळा, वाचनालय आणि प्रत्येक दिवसाच्या हजेरीसाठीचा निधी कसा मिळत नाही हे पुणे जिल्ह्यातील उदाहरण देऊन सांगितले. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी स्त्री-पुरुष समानतेचे सक्षमीकरण होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
व्हीएस न्यूज – उत्तर प्रदेशातील लोकांना एका बोगस डॉक्टरकडून स्वस्तात उपचार करुन घेणे चांगलेच महागात पडले असून एकाच वेळी ४६ लोकांना बोगस डॉक्टरच्या अक्षम्य चुकीमुळे एचआयव्हीची लागण झाली आहे. त्या सगळ्या रुग्णांना उपचारादरम्यान सर्व रुग्णांसाठी एकाच सुईचा वापर केल्याने एचआयव्हीची लागण झाल्याचा धक्कादायक प्रक्रार समोर आला आहे. उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊमध्ये घडलेल्या या घटनेमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
त्या बोगस डॉक्टरचे नाव राजेंद्र कुमार असे असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ बांगरमऊ गावात एप्रिल ते जुलै महिन्यात १२ लोक एचआयव्ही बाधित आढळून आले आहेत. एका एनजीओने बांगरमऊच्या गावांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी तपासात काही लोकांमध्ये एचआयव्हीची लक्षणे दिसली. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे ते लोक एचआयव्ही बाधीत असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणावर चीफ मेडिकल ऑफीसर डॉ. एसपी चौधरी म्हणाले, हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने चौकशीसाठी २ सदस्यीय समित्यांची स्थापना केली आहे. या घटनेतील पीडितांना एआरटी सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. या समितीच्या सादर केलेल्या अहवालात म्हटले की, सुईचे पैसे वाचवण्यासाठी एकाच सुईने अनेकांना इंजेक्शन देण्यात आले होते. २४,२५ आणि २७ जानेवारी २०१७ रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात जवळच्या गावातील राजेंद्र कुमार याने पैसे वाचवण्यासाठी एकाच सुईचा वापर केला. त्यामुळे इतके लोक एचआयव्ही बाधित झाले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह म्हणाले, आरोग्य शिबिरांमुळे अशी एड्सची प्रकरणे समोर आली आहेत. या घटनेतील दोषींवर कारवाई केली जाईल.
व्हीएस न्यूज - – एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत भारतीय मुस्लिमांना ‘पाकिस्तानी’ म्हणून संबोधण्याला दंडणीय गुन्हा ठरवणारा कायदा केंद्र सरकारने करावा, अशी मागणी केली.
अशा प्रकारचा कायदा करुन केंद्राने या गुन्ह्यात ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी ओवेसी यांनी लोकसभेत बोलताना केली. पण अशा प्रकारचे विधेयक संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार मांडणार नाही, असेही ओवेसी म्हणाले. ओवेसींनी यावेळी ट्रीपल तलाक हे महिला विरोधी असल्याचा पुनरुच्चारही बोलताना केला आहे. भारतातील मुस्लिमांनी मोहम्मद अली जिना यांचा द्विराष्ट्रीय सिद्धांतही नाकारला आहे. मात्र तरीही त्यांना बाहेरच्यांप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचेही ओवेसी म्हणाले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002