व्हीएस न्यूज - परीक्षा संपल्या की सुट्टीच्या कालावधीत गावाकडे जाण्यासाठी बस-रेल्वेमधील तिकिटांचे आरक्षण करून प्रवासाची आखणी अंतिम टप्प्यात आणणाऱ्या पालकांना शिक्षण विभागाने तडाखा दिला आहे. यंदापासून परीक्षा संपली की शाळेचे वर्ष संपले हा वर्षांनुवर्षीचा प्रघात बंद होणार आहे. या वर्षी वार्षिक परीक्षा झाली तरीही शाळेला कागदोपत्री सुट्टी लागेपर्यंत मुलांना शाळेत जावे लागणार असल्यामुळे एप्रिलच्या मध्यावर दरवर्षी बंद होणाऱ्या शाळा चक्क १ मेपर्यंत मुलांसाठी सुरू राहणार आहेत.
दरवर्षी वार्षिक परीक्षा संपली की दुसऱ्या दिवसांपासून विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी सुरू होते. दहावीची परीक्षा झाली की शाळेच्या परीक्षा आणि त्यानंतर साधारण मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये मुलांना सुट्टी असते. त्यानंतर एप्रिल अखेर किंवा १ मे रोजी निकाल आणि मग महिनाभर शिक्षकांनाही सुट्टी असे शाळेचे वार्षिक वेळापत्रक असते. पण हे वेळापत्रक यंदापासून बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. १ मे पर्यंत पहिली ते नववीच्या राज्यमंडळाच्या शाळा सुरू ठेवाव्यात असे आदेश विद्या प्राधिकारणाने दिले आहेत. मुलांसाठी या कालावधीत विविध उपक्रम, उन्हाळी शिबिरे आयोजित करावीत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुलांनी शाळेत येणे अपेक्षित आहे.
व्हीएस न्यूज - आमिर खानचा महाकाव्य महाभारतावर आधारित चित्रपट साकारण्याचा ड्रीम प्रोजेक्ट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असून आमिर खान सुमारे १ हजार कोटींहून अधिक बजेट असलेल्या या चित्रपटात कृष्णाची भूमिका साकारत असल्याची चर्चा आहे. पण सध्या याच गोष्टीवरून ट्विटरवर ‘महाभारत’ सुरू झाले आहे. आमिर मुस्लिम असतानाही महाभारतावर आधारित चित्रपटात कृष्णाची भूमिका का साकारावी, असा प्रश्न फ्रॉन्सवा गॉटीयार या फ्रेंच पत्रकाराने उपस्थित केला. जावेद अख्तर यांनी त्याच्या या प्रश्नावर ट्विटरवर सडेतोड उत्तर दिलेच, पण त्याच्या ट्विटवर अनेकांनीच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
फ्रॉन्सवा गॉटीयारने आमिर मुस्लिम असतानाही त्याने पवित्र आणि प्राचीन अशा महाभारतावर आधारित चित्रपटात भूमिका का साकारावी? पुरोगामी विचारांच्या नावाखाली मोदींच्या भाजपचीही विचारसरणी काँग्रेसप्रमाणेच होत आहे का? कोणा हिंदू कलाकाराला मोहम्मद पैगंबरांच्या आयुष्यावर साकारणाऱ्या चित्रपटात मुस्लिम भूमिका साकारण्याची परवानगी देतील?, असा सवाल उपस्थित करत सर्वांचे लक्ष वेधले. जावेद अख्तर यांनी त्याच्या या ट्विटचे उत्तर देत लिहिले, बेशिस्त माणसा… पीटर ब्रूक्सच्या निर्मितीत फ्रान्समध्ये या महाकाव्यावर आधारित साकारलेली कलाकृती तू पाहिली नाहीस का? असे विकृत विचार पसरवण्यासाठी तुमच्या देशात कोणती विदेशी एजन्सी पैसे देते हे मला माहित करुन घ्यायचे आहे.
व्हीएस न्यूज - डॉक्टरांनी येत्या २ एप्रिलला देशव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला असून हा संप नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननेही या संपाला पाठिंबा दिला आहे. गरीब विद्यार्थ्यांना हे विधेयक त्रासदायक ठरणार असल्याचे मत डॉक्टरांचे आहे.
दिल्लीत नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात २५ मार्चला डॉक्टरांनी महापंचायत आयोजित केली होती. देशभरातून २५ हजार डॉक्टर आणि मेडिकलचे विद्यार्थी या मेळाव्याला आले होते. या महापंचायतीत संपाचा निर्णय घेण्यात आला. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक हे वैद्यकीय व्यवसायाच्या विरोधात असल्याची भावना डॉक्टरांची आहे. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातील डॉक्टरांच्या विरोधातील मुद्दे काढून टाकण्याची डॉक्टरांची मागणी आहे.
व्हीएस न्यूज - पंजाब विधानसभेतील कामकाजाचे थेट प्रक्षेपण फेसबुक लाईव्हद्वारे करणाऱ्या आमदारांची आता चौकशी करण्याचे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राणा के. पी. सिंग यांनी दिले आहेत. खुद्द मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता.
मुख्यमंत्री सिंग यांनी विधानसभेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली, तर तंत्रशिक्षण मंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर अध्यक्षांनीही या मागणीला सहमती दर्शवली.
या विषयावर चर्चा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, विधानसभेच्या सदस्यांनी फेसबुकवर थेट प्रक्षेपण करणे हा गंभीर विषय आहे. सदस्यांनी सभागृहाचे नियम पाळावेत आणि सभागृहाचा मान कायम राखावा, यासाठी अध्यक्षांनी सदस्यांना निर्देश द्यावे, अशी विनंती त्यांनी केली होती.
विरोधी पक्षाच्या एका सदस्याने २१ मार्च रोजी विधानसभेच्या कामकाजाचे फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण केल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सभागृहाला सांगितले. मात्र या सदस्याचे नाव त्यांनी घेतले नाही. लोक इन्साफ पार्टीचे आमदार सिमरजीत सिंग बेन्स यांनी हा प्रकार केल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी प्रकाशित केले होते.
व्हीएस न्यूज – सध्या भाजपचे कामगार कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आर्थिक प्रकरणी ‘सीबीआय’च्या कचाट्यात सापडले असून त्यांना या प्रकरणातून वाचवण्यासाठी २ बँका मेहरबान झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांना महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक या २ बँकांनी वन टाईम सेटलमेंट अंतर्गत तब्बल ५१ कोटी रुपयांची माफी दिली आहे.
कर्जाच्या परतफेडीसाठी सर्व सामान्य खातेदार ग्राहक आणि शेतकरी वर्गाच्या मागे तगादा लावणाऱ्या या राष्ट्रीयकृत बँका उद्योगपती आणि राजकारण्यांसमोर कशा पायघड्या घालतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्र बँक आणि युनियन बँकेने राज्याचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या मद्यार्क निर्मिती करणाऱ्या व्हिक्टोरिया अॅग्रो फूड प्रोसेसिंग कंपनीला २००९ मध्ये प्रत्येकी २० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. निलंगेकर जामीनदार असलेल्या कंपनीने दोन वर्षे या कर्जाच्या व्याजाची रक्कम नियमित परत केली. पण कंपनीने २०११ पासून व्याज आणि मुद्दलाचे पैसे भरणे बंद केले. तेव्हा त्यांचे खाते एनपीएमध्ये गेले.
दरम्यान, आपल्या आजोबांचीच जमीन त्यांना माहिती न देता संभाजी पाटलांनी बँकेकडे गहाण ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला तेव्हा सीबीआयकडे बँकेने फसवणुकीची तक्रार केली. संभाजी पाटील आणि कंपनीची ‘सीबीआय’ने चौकशी करून ३ हजार २७ पानांचे आरोपपत्र लातूरच्या न्यायालयात दाखल केले. त्यावर अजून सुनावणी झालेली नाही. पण आता महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक मंत्री महोदयावर मेहेरबान झाली आहे. त्यांनी मुद्दल कमी करून आणि व्याजमाफी देऊन वन टाईम सेटलमेंट केली. या सेलटमेंटनुसार ३१ मार्चपर्यंत १२ कोटी ७५ लाख भरून संपूर्ण बेबाकी देण्याची तयारी बँकेने दाखवली. अशी सूट देताना सीबीआयच्या प्रकरणात कोणतीही मदत होणार नाही, अशी अट जरी घातलेली असली तरी याचा ‘सीबीआय’च्या तावडीतून सुटण्यासाठी मदत होईल, असे अर्थ क्षेत्रातील विश्लेषक सांगतात.
व्हीएस न्यूज - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले असून ४० लाख रुपये किमतीचे घड्याळ घालणारे सिद्धरामय्या एकमेव समाजवादी नेते असून त्यांचा भ्रष्टाचार यावरून दिसून येत असल्याची टीका शहा यांनी केली.
अमित शहा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. भाजपला राज्यात अनुकूल स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत. त्यांनी सोमवारी लिंगायत धर्मगुरूंची देखील भेट घेतली होती. कर्नाटक सरकारने लिंगायत समाजाला दिलेल्या स्वतंत्र धर्माच्या दर्जावरून राजकारण तापले आहे. यावेळी अमित शहा यांनी बोलताना लिंगायत स्वतंत्र धर्माच्या मुद्द्यावरून सिद्धरामय्या सरकारला लक्ष्य केले.
सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदत असलेली बाग असे कुवेम्पू या प्रख्यात कन्नड साहित्यकाने कर्नाटक राज्याचे वर्णन केले होते. पण आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सिद्धरामय्या दोन समाजांत वितुष्ट निर्माण करत आहेत. त्यांना याची किंमत भविष्यात चुकवावी लागेल, असा इशारा शहा यांनी यावेळी बोलताना दिला.
व्हीएस न्यूज – लिकर किंग विजय माल्ल्याची संपत्ती जप्त करायला मंगळवारपासून अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) सुरुवात केली जाणार आहे. ही कारवाई कलम ८३ नुसार केली जाणार आहे.
फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यासंदर्भातील कलम ८३ नुसार फरार झालेल्या गुन्हेगारीची संपत्ती जप्त केली जाते. दिल्ली न्यायालयाने तत्पूर्वी समन्सची दखल न घेतल्याने माल्ल्याला गुन्हेगार घोषित केले होते. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, माल्ल्याने १९९६, १९९७ आणि १९९८ मध्ये ब्रिटीश कंपनीला आणि काही देशांना फॉर्म्यूला वन वर्ल्ड चॅम्पियनशीमध्ये किंगफिशरचा लोगो दाखवण्यासाठी २ लाख डॉलर दिल्याचा आरोप केला आहे. तपास संस्थेने म्हटले आहे, की मल्याने हे पैसे देताना रिझर्व बँक ऑफ इंडीयाची परवानगी घेतलेली नाही. तथापी त्याने एपईआरएच्या नियमांचेही उल्लंघन केले आहे.
व्हीएस न्यूज - भगतसिंग यांना पाकिस्तानातील एका ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येसाठी फाशी देण्यात आली होती. या स्वातंत्र्य सेनानीच्या फाशी देण्यासंदर्भातील फाईलमधील काही रेकॉर्ड सुमारे ८७ वर्षानंतर प्रथमच उपलब्ध करण्यात आले आहे.
२३ वर्षांचे असताना भगतसिंग यांना २३ मार्च १९३१ ला ब्रिटीश सरकारने लाहोरमध्ये फासावर लटकाविले होते. त्यांच्यावर यावेळी ब्रिटीश सरकारविरोधात कट रचणे व अधिकारी जोन पी सँडर्स यांची हत्या करणे असे आरोप ठेवण्यात आले होते. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भगतसिंग यांच्या फाईलचे संपूर्ण रेकॉर्ड पंजाब अभिलेखागार विभागातर्फे प्रदर्शित होऊ शकले नाही, कारण तो अहवाल पूर्णपणे तयार नव्हता. या संदर्भातील आणखी काही कागदपत्रे दोन दिवसात उपलब्ध करत असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली.
व्हीएस न्यूज – निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत कर्नाटक निवडणुकांची कार्यक्रम पत्रिका जाहीर केला असून कर्नाटक विधानसभेसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे, तर १२ मे रोजी मतमोजणी होणार आहे. एकाच टप्प्यात ही निवडणूक होईल. २४ एप्रिल अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, तर २५ एप्रिल आर्ज मागे घेण्याची तारीख आहे.
कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ २८ मे रोजी संपत आहे. सध्या कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे आणि त्यांना प्रमुख आव्हान भाजपकडून आहे. या वर्षातील ही महत्त्वाची निवडणूक आहे. सर्वच नेत्यांनी कर्नाटकात मुक्काम ठोकायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे अमित शहांच्या कर्नाटक दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे.
व्हीएस न्यूज – यंदा तब्बल १ लाख जागांसाठी रेल्वे मंत्रालयाने मेगा भरती काढली असून २ कोटीपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज या १ लाख जागांसाठी दाखल केले आहेत. ऑनलाइन अर्ज नोंदणीचे यासाठी अद्याप ५ दिवस बाकी असल्यामुळे आणखी अर्ज पुढील पाच दिवसांत येण्याची शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
९० हजार जागांसाठी रेल्वेने गट ‘क’ आणि गट ‘ड’ विभागात भरती काढली आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दलासाठी ९,५०० जागांसाठी भरती होणार आहे. यातील सहाय्यक लोको पायलट आणि तात्रिक पदांसाठी ५० लाख पेक्षा जास्त ऑनलाइन अर्ज भरण्यात आले आहेत. रेल्वेमध्ये लोको पायलट आणि तांत्रिक पदांसाठी २६,५०२ जागा रिक्त आहेत. तर गट ‘ड’ साठी ६२,९०७ जागांसाठी भरती होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या परीक्षेचे मोठे स्वरुप पाहता परीक्षा पूर्ण होवून त्याचा निकाल लागल्यानंतर पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या उत्तरांची तपासणी करण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाच्या वेबसाईटवर एक विंडो उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. योग्य संधी संपूर्ण भारतातील उमेदवारांना मिळावी यासाठी देशातील विविध १५ भाषांमधून प्रश्नपत्रिका छापण्यात येणार आहेत. हिंदी, इंग्रजी, ऊर्दू, बंगाली, पंजाबी, गुजराती, कन्नड, कोकणी, असामी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, ओडिया, तामिळ आणि तेलुगू या भाषांचा यामध्ये समावेश आहे.
या भरतीसाठी ५०० रुपये सर्वसाधारण गटासाठी तर २५० रुपये शुल्क आरक्षित जागेसाठी आकारण्यात आले आहे. यापूर्वी सर्वसाधारण गटासाठी १०० रुपये शुल्क तर आरक्षित जागांसाठी शुल्क आकारले जात नव्हते. पण रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी यंदा परिक्षा शुल्कात वाढ केली आहे. पण सर्वसाधारण गटासाठी ५०० पैकी ४०० रुपये शुल्क परत करण्यात येणार आहे. तर आरक्षित जागांसाठी संपूर्ण शुल्क परत केले जाणार आहे. या रिफंडसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरताना त्यांच्या बँक खात्यांची माहिती द्यावी लागणार आहे. रेल्वे परिक्षांबाबत गांभीर्य असणाऱ्यांनीच ही परिक्षा द्यावी यासाठी शुल्कवाढीचे हे नवे धोरण आखण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज – एचडीएफसी बँकेने मुंबईच्या फोर्ट शाखेच्या दारात रात्रीच्या वेळी झोपणाऱ्या बेघर लोकांना हटवण्यासाठी अघोरी उपाय केला असून बँकेने यासाठी कार्यालयाच्या शटरच्या बाहेर टोकदार खिळ्यांची पट्टी बसवली आहे. सोशल मीडियात या प्रकाराचे फोटो व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी यावरुन बँकेवर प्रचंड टीका केली आहे.
हा अघोरी उपाय एचडीएफसीच्या फोर्ट शाखेने केला असून सिमॉन मुंडे या व्यक्तीने याचे फोटो २६ मार्च रोजी आपल्या ट्विटरवर अपलोड केले होते. अनेक ट्विटर युजर्सने या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या असून खडे बोल बँकेला सुनावले आहेत. त्यांनी म्हटले आहे, बँकेने बेघरांसाठी केलेल्या या प्रतापामुळे एखादी व्यक्ती जर चुकून त्यावर पडली तर त्याचा जीव जाऊ शकतो किंवा तो गंभीर जखमी होऊ शकतो. एचडीएफसीने केलेला हा जगातला पहिलाच प्रकार नव्हे कारण, ब्रिस्टोल आणि इंग्लंडमध्ये डिसेंबर २०१७ मध्ये अशा प्रकारचे खिळ्यांची पट्टी झाडांवर लावण्यात आली होती. पक्षांनी फांद्यांवर बसू नये यासाठी तो उपाय करण्यात आला होता.
व्हीएस न्युज - फेसबुकवरची मैत्री नाशकातील एका विवाहितेला चांगलीच महागात पडली. महिलेचे अश्लील व्हिडिओ काढून दिल्लीच्या तरुणाने तिच्यावर सलग चार वर्ष बलात्कार केल्याचा आरोप आहे. दिल्लीत राहणाऱ्या अमित जाजूसोबत पीडित महिलेची फेसबुकवरुन ओळख झाली होती. दोघांमध्ये चॅटिंगला सुरुवात झाली. अमित 14 जानेवारी 2014 रोजी तिला भेटण्यासाठी नाशिकच्या एका हॉटेलमध्ये आला. त्यावेळी त्याने पाण्यातून महिलेला गुंगीचं औषध पाजलं आणि तिचे अश्लील व्हिडिओ मोबाईलवर रेकोर्ड केले. हे व्हिडिओ पती आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांना दाखवण्याची धमकी देत अमितने सलग चार वर्ष अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. जानेवारी 2014 ते जानेवारी 2018 या चार वर्षांच्या काळात गुजरातमधील वापी, तसंच मुंबईतील बोरिवली, दादर, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेत त्याने अत्याचार केल्याचं पीडितेने सांगितलं आहे. इतकंच नाही, तर आपल्याकडे तीन लाख रुपयांची मागणी करत 20 हजार रुपये उकळल्याचा दावाही तिने केला आहे. या सर्व प्रकारात अमित जाजूची आईसुद्धा सहभागी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे दोघांवरही नाशकातील सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे महिलांनी फेसबुकवर अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करताना काळजी घेण्याचं आवाहन पोलिस करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002