व्हीएस न्यूज – यंदा तब्बल १ लाख जागांसाठी रेल्वे मंत्रालयाने मेगा भरती काढली असून २ कोटीपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज या १ लाख जागांसाठी दाखल केले आहेत. ऑनलाइन अर्ज नोंदणीचे यासाठी अद्याप ५ दिवस बाकी असल्यामुळे आणखी अर्ज पुढील पाच दिवसांत येण्याची शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
९० हजार जागांसाठी रेल्वेने गट ‘क’ आणि गट ‘ड’ विभागात भरती काढली आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दलासाठी ९,५०० जागांसाठी भरती होणार आहे. यातील सहाय्यक लोको पायलट आणि तात्रिक पदांसाठी ५० लाख पेक्षा जास्त ऑनलाइन अर्ज भरण्यात आले आहेत. रेल्वेमध्ये लोको पायलट आणि तांत्रिक पदांसाठी २६,५०२ जागा रिक्त आहेत. तर गट ‘ड’ साठी ६२,९०७ जागांसाठी भरती होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या परीक्षेचे मोठे स्वरुप पाहता परीक्षा पूर्ण होवून त्याचा निकाल लागल्यानंतर पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या उत्तरांची तपासणी करण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाच्या वेबसाईटवर एक विंडो उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. योग्य संधी संपूर्ण भारतातील उमेदवारांना मिळावी यासाठी देशातील विविध १५ भाषांमधून प्रश्नपत्रिका छापण्यात येणार आहेत. हिंदी, इंग्रजी, ऊर्दू, बंगाली, पंजाबी, गुजराती, कन्नड, कोकणी, असामी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, ओडिया, तामिळ आणि तेलुगू या भाषांचा यामध्ये समावेश आहे.
या भरतीसाठी ५०० रुपये सर्वसाधारण गटासाठी तर २५० रुपये शुल्क आरक्षित जागेसाठी आकारण्यात आले आहे. यापूर्वी सर्वसाधारण गटासाठी १०० रुपये शुल्क तर आरक्षित जागांसाठी शुल्क आकारले जात नव्हते. पण रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी यंदा परिक्षा शुल्कात वाढ केली आहे. पण सर्वसाधारण गटासाठी ५०० पैकी ४०० रुपये शुल्क परत करण्यात येणार आहे. तर आरक्षित जागांसाठी संपूर्ण शुल्क परत केले जाणार आहे. या रिफंडसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरताना त्यांच्या बँक खात्यांची माहिती द्यावी लागणार आहे. रेल्वे परिक्षांबाबत गांभीर्य असणाऱ्यांनीच ही परिक्षा द्यावी यासाठी शुल्कवाढीचे हे नवे धोरण आखण्यात आले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002