व्हीएस न्यूज - पंजाब विधानसभेतील कामकाजाचे थेट प्रक्षेपण फेसबुक लाईव्हद्वारे करणाऱ्या आमदारांची आता चौकशी करण्याचे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राणा के. पी. सिंग यांनी दिले आहेत. खुद्द मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता.
मुख्यमंत्री सिंग यांनी विधानसभेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली, तर तंत्रशिक्षण मंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर अध्यक्षांनीही या मागणीला सहमती दर्शवली.
या विषयावर चर्चा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, विधानसभेच्या सदस्यांनी फेसबुकवर थेट प्रक्षेपण करणे हा गंभीर विषय आहे. सदस्यांनी सभागृहाचे नियम पाळावेत आणि सभागृहाचा मान कायम राखावा, यासाठी अध्यक्षांनी सदस्यांना निर्देश द्यावे, अशी विनंती त्यांनी केली होती.
विरोधी पक्षाच्या एका सदस्याने २१ मार्च रोजी विधानसभेच्या कामकाजाचे फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण केल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सभागृहाला सांगितले. मात्र या सदस्याचे नाव त्यांनी घेतले नाही. लोक इन्साफ पार्टीचे आमदार सिमरजीत सिंग बेन्स यांनी हा प्रकार केल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी प्रकाशित केले होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002