व्हीएस न्यूज - केंद्रात एकाधिकारशाही वाढीला लागली आहे. लोकांचे मूलभूत अधिकार आणि हक्क यावर गदा येते आहे. अत्यंत चिंताजनक वातावरण सध्या भारतात आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी देशाच्या जनतेला भरमसाठ आश्वासने देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात सरकारविरोधात नाराजीचा सूर आता निघतो आहे कारण एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही, अशी टीका करत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबीरात त्यांनी ही टीका केली.
वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. मागील तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रासह देशभरात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने या आत्महत्या होत आहेत आणि महागाईही वाढली आहे. शेतकरी आत्महत्यांचा आलेख उंचावतोय हे दुर्दैवी आहे, असेही पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले.
शेतकरी कर्जमाफीवरून तर सरकारने क्रूर थट्टा सुरु केली आहे. कर्जमाफी केल्याचे बॅनर पाहिले . पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती काहीही आले नाही. ‘मी लाभार्थी हे माझे सरकार, कामगिरी दमदार’ असल्या जाहिराती हे सरकार करताना दिसते आहे. वास्तव मात्र शेतकऱ्याची फसवणूक हेच आहे. आपण जाहिरात करायची ठरवली तर ‘मी अपमानित’ असे शेतकरी म्हणताना दाखवावा लागेल कारण या सरकारने शेतकऱ्याचा अपमानच केला आहे. जाहिरातीतले शेतकरी नाही तर सत्तेच्या खुर्चीवर बसलेले ‘लाभार्थी’ झाले आहेत, असाही टोला शरद पवारांनी लगावला.
महत्त्वाच्या सगळ्या वर्तमान पत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच जाहिराती दिसतात. वृत्तपत्र क्षेत्रालाही मंदीची झळ बसली आहे. माझ्या लहान भावाकडूनच मला या वृत्तपत्र व्यवसायातील मंदीबाबत समजत असते. मात्र पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती येत असल्यामुळे वृत्तपत्र व्यवसाय टिकला आहे असे पवारांनी म्हणताच एकच हशा पिकला. शेतकऱ्यांच्या हाती पैसा आलाच नाही त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली. मंदी आल्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यापारी वर्गालाही याचा मंदीचा फटका बसला अशीही टीका शरद पवारांनी केली.
वाढत्या रेल्वे अपघातांवरही शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. सुमारे ६५ लाख लोक मुंबईच्या लोकलमधून दररोज प्रवास करतात. दिवसाला १० लोकांचा जीव जातो आणि साधारण तितकेच लोक जखमी होतात. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी काय उपाय योजना करण्यात आल्या आहेत ? असाही प्रश्न शरद पवारांनी त्यांच्या भाषणात उपस्थित केला.
व्हीएस न्यूज - उत्तर भारतामध्ये मंगळवारची पहाट गडद धुक्यामध्ये उजाडली असून पंजाब, हरयाणा, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांना धुक्याने वेढा घातला. दिल्लीमध्ये धुरक्याचे प्रमाण इतके होते की त्यामुळे सर्व प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली.‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पर्यावरणीय आणीबाणी जाहीर करण्याची विनंती केली आहे. या संस्थेने सद्यस्थितीत घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. सुदृढ व्यक्तीला श्वास घेण्यासाठी वाईट असे वातावरण असल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही थंडी सुरू होताच राजधानी दिल्लीत काळे धुके दाटण्यास सुरुवात झाली असून हा वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे. त्यामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश व हरयाणा या राज्यांनी हवेचा दर्जा सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना का केल्या नाहीत अशा शब्दात राष्ट्रीय हरित लवादानेही या राज्यांच्या सरकारांना फटकारले आहे. मात्र दिल्लीमधील धुरक्याने आज धोक्याचीही पातळी ओलांडल्यामुळे सरकारला शाळांना सुट्टी करावी लागली. दिवसा नागरिक आणि शालेय विद्यार्थी मास्क घालून शहरांत फिरत होते.
हरित लवादाची टीका…
राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्रकुमार यांनी एका याचिकेवरून राज्य सरकारांवर टीका केली असून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून आधीच उपाययोजना करण्याची गरज होती असे म्हटले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्लीतील हवेची स्थिती अतिशय वाईट असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने सांगितले की, प्रदूषणाची पातळी एवढी जास्त आहे की मुलांना श्वास घेणे कठीण जात आहे. त्यामुळे आमच्या सूचनेनुसार तुम्ही हेलिकॉप्टरमधून पाण्याचे फवारे का सोडले नाहीत. राज्य सरकारांनी प्रदूषणाची स्थिती थंडीच्या दिवसात जास्त उग्र असते हे माहिती असताना आगाऊ उपाययोजना का केल्या नाहीत याचे उत्तर द्यावे असा आदेश लवादाने दिला आहे.
सीआयएसएफ जवानांना मास्क…
दिल्ली विमानतळावर काम करणाऱ्या औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना नऊ हजार मास्क पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षा दलाचे संचालक ओ. पी. सिंह यांनी विषारी धुक्यापासून जवानांचे रक्षण करण्यासाठी नऊ हजार मास्क मागवले आहेत. त्यातील २ हजार मास्क तातडीने मिळणार असून सात हजार मास्क नंतर ठिकठिकाणच्या सीआयएसएफ जवानांना दिले जातील, गेल्य वर्षी नोव्हेंबरमध्ये सीआयएसएफने अशाच प्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या.
झाले काय?
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १७, १८ व १९ ऑक्टोबरच्या अहवालानुसार दिल्लीतील हवेचा दर्जा भीषण झाला आहे. दिल्लीत मोटारींची संख्या अधिक असल्याने प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे, शिवाय कचरा जाळण्याने त्यात भर पडत आहे.
मंगळवार सकाळपासून दिल्ली आणि उत्तर भारतामधील हवेचा शुद्धता निर्देशांक घसरला. काही भागांतील दृश्यता २०० मीटपर्यंतचा परिसरापर्यंत घटली. पंजाब, हरयाणा आदी राज्यांतही अशीच स्थिती होती. लहान मुले प्रौढांहून अधिक वेगाने श्वास घेत असल्यामुळे त्यांच्यावर या धुरक्याचा तीव्र परिणाम होत असल्यामुळे दिल्लीतील अतिप्रदूषित वातावरणात शाळांना सुट्टी देण्यात यावी अशी मागणी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने सरकारकडे केली. त्यानंतर संध्याकाळी उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केली.
व्हीएस न्यूज - नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हिंदी शायरीचा आधार घेत राहुल गांधींनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘एक आँसू भी हुकूमत के लिए खतरा है, तुमने देखा नहीं आँखों का समुंदर होना’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
नोटाबंदीला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले असून काँग्रेसने या मुद्द्यावरुन सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे सरकारवर टीका केली. नोटाबंदी ही एक आपत्ती आहे. आम्ही या आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कोट्यवधी प्रामाणिक भारतीयांच्या पाठीशी आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणताही विचार न करता नोटाबंदीचा निर्णय घेतला, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राहुल गांधी यांनी एका हिंदी शायरीचा दाखला देत सरकारला इशाराच दिला. ‘एक आँसू भी हुकूमत के लिए खतरा है, तुमने देखा नहीं आँखों का समुंदर होना’ ही शायरी त्यांनी ट्विट केली. नोटाबंदीनंतर रांगेत थांबलेल्या आणि रडणाऱ्या वृद्धाचा फोटो त्यांनी या शायरीसोबत ट्विट केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी वर्षभूरापूर्वी रिझर्व्ह बँकेला डावलून आणि मंत्रिमंडळांनाखोलीत डांबून नोटाबंदीसारखा निर्णय जाहीर केला. यामुळे असंघटित कामगार आणि छोटे उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले, असा आरोप त्यांनी केला. एका इंग्रजी वृत्तपत्रात त्यांनी हा लेख लिहीला आहे.
व्हीएस न्यूज - नोटाबंदीमुळे काळा पैसा उजेडात आला, बनावट नोटांना आळा बसला, असे दावे मोदी सरकारकडून केले जात आहेत. मात्र नोटाबंदीनंतरच्या काळात रोजगार घटल्याचे दिसून आले आहे. नोटाबंदीनंतरच्या ४ महिन्यांमध्ये (जानेवारी ते एप्रिल २०१७) १५ लाख लोकांनी रोजगार गमावल्याची माहिती ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या (सीएमआयई)आकडेवारीतून समोर आली आहे. याशिवाय शेअर बाजारात नोंद असलेल्या कंपन्यांमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रोजगाराच्या संधी कमी झाल्याचे दिसून आले.
देशातील असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची अचूक नोंद उपलब्ध नसल्याने रोजगार निर्मितीबद्दलची आकडेवारी गोळा करण्यात अडचणी येतात. मात्र लेबर ब्युरो एम्प्लॉयमेंटने केलेल्या सर्वेक्षणातून असंघटित क्षेत्राला नोटाबंदीचा फटका बसल्याचे अधोरेखित झाले आहे. लेबर ब्युरो एम्प्लॉयमेंटच्या तिमाही सर्वेक्षणातूनही रोजगाराचे प्रमाण घटल्याची आकडेवारी समोर आली आहे. पंतप्रधान मोदींनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. यामुळे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) आकडेवारीनुसार, जानेवारी ते एप्रिल २०१७ मध्ये रोजगार असलेल्यांची संख्या ४० कोटी ५० लाख इतकी होती. तर २०१६ मधील सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत देशातील ४० कोटी ६५ लाख लोकांकडे रोजगार होता. नोटाबंदीनंतरच्या काळात सर्वेक्षण करुन ही आकडेवारी गोळा करण्यात आली. १ लाख ६१ हजार १६७ कुटुंबामधील ५ लाख १९ हजार २८५ लोकांशी संवाद साधून हे सर्वेक्षण करण्यात आले. नोटाबंदीनंतरच्या जानेवारी ते एप्रिल २०१७ या कालावधीत रोजगार गमावलेल्या लोकांची संख्या १५ लाख असली, तरी स्वत: बेरोजगार असल्याची माहिती देणाऱ्या लोकांची संख्या ९६ लाख इतकी असल्याचे सीएमआयईचे सर्वेक्षण सांगते.
नोटाबंदीआधी मोदी सरकार रोजगाराच्या आघाडीवर अपयशी ठरले होते. नोटाबंदीनंतर ही परिस्थिती आणखी बिघडल्याचे सीएमआयईच्या सर्वेक्षणातून अधोरेखित झाले आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या आकडेवारीतूनही हे दिसून आले आहे. जुलै २०१७ पर्यंत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून ३० लाख ६७ हजार तरुणांनी प्रशिक्षण घेतले. मात्र यातील केवळ २ लाख ९ हजार तरुणांनाच रोजगार मिळाला आहे. कौशल्य विकास मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
व्हीएस न्यूज - मुंबई येथील इंदू मिल परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असता त्यांनी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे विनाकारण अधूनमधून उठणाऱ्या वावटळीवर विश्वास ठेवू नका, ज्यादिवशी आरक्षण बदलेल त्यादिवशी सरकार बदलेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. त्यावेळी मी तुमच्यासोबत राहीन, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले Ramdas Athawale यांनी आंबेडकरी जनतेला दिली.
‘आज आले आमचे भरून मन’, ‘भंडाऱ्यात होत आहे आंबेडकरी संमेलन’ असे म्हणत भाषणाला सुरुवात करीत आठवले म्हणाले, या संमेलनात पक्षभेद विसरून सर्वजण एकत्र आल्याचा आनंद होत आहे. मी आंबेडकरी कार्यकर्ता असून एका कार्यकर्त्यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आयोजकांचा आभारी आहे. गावागावांत जाऊन प्रचार करा, असेही त्यांनी सांगितले.
आंबेडकरी विचार जागृती समितीच्यावतीने भंडारा येथे आयोजित राज्यस्तरीय आंबेडकरी विचार संमेलनात ते उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राज्य अनुसूचित जातीजमाती आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती सी.एल. थुल होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, समता सैनिक दलाचे अध्यक्ष डी.एफ. कोचे, निमंत्रक अमृत बन्सोड, अध्यक्ष जयप्रकाश भवसागर, कार्याध्यक्ष महादेव मेश्राम, संघटन सचिव रूपचंद रामटेके, कोषाध्यक्ष प्रभाकर भोयर उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - खासगी जाहिरातींमध्ये पंतप्रधान, राष्ट्रपतींचे छायाचित्र का वापरले जाते, असा प्रश्न विचारत दिल्ली हायकोर्टाने माहिती व प्रसारण मंत्रालय तसेच प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाला नोटीस बजावली आहे.
खासगी कंपनी किंवा संस्थेच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रांचा वापर सर्रास केला जातो. याविरोधात दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली असता हायकोर्टाने प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाला नोटीस बजावली. आता याप्रकरणी दोन्ही यंत्रणांना हायकोर्टात उत्तर द्यावे लागणार आहे.
मे २०१५ मध्ये सरकारी जाहिरातींमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान व सरन्यायाधीश यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणाचीही छायाचित्रे असू नयेत, असा नवा दंडक सुप्रीम कोर्टाने जारी केला होता. मात्र, मार्च २०१६ मध्ये सुप्रीम कोर्टाने आधीच्या निकालात सुधारणा केली होती. पंतप्रधान, राष्ट्रपती संबंधित खात्यांचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्यांचे मंत्री यांची छायाचित्रे जाहिरातीत वापरता येतील, असे कोर्टाने स्पष्ट केले. पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर कोर्टाने हा निकाल दिला होता.
व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचे मोठेपणाने कबूल करावे आणि अर्थव्यवस्थेच्या पुनर्उभारणीसाठी पाठिंबा मागावा, असे आवाहन देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केले. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. वर्षपूर्तीचा हा दिवस सरकारकडून ‘काळा पैसा विरोधी दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल. तर विरोधकांकडून ८ नोव्हेंबरला देशभरात‘काळा दिवस’ पाळण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘ब्लुममर्ग क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या निर्णयाविषयी पुन्हा एकदा भाष्य केले. त्यांनी म्हटले की, नोटाबंदीचे राजकारण आता पुरे झाले, असे मला प्रकर्षाने वाटते. नोटाबंदीचा निर्णय हा खूप मोठा घोळ होता, हे पंतप्रधानांनी मान्य करायची ही वेळ आहे. जेणेकरून त्यानंतर अर्थव्यवस्थेची पुनर्उभारणी करण्यासाठी सरकारला सर्वांचा पाठिंबा मागता येईल, असे मनमोहन सिंग यांनी सांगितले.
यावेळी मनमोहन सिंह यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर यापूर्वी केलेल्या टीकेचा पुनरूच्चार केला. नोटाबंदीचा विपरीत परिणाम विविध स्तरांवर झाला. याचा सगळ्यात मोठा फटका समाजातील निम्न स्तराला बसला. केवळ एखादा आर्थिक निर्देशांक पाहून या परिस्थितीची कल्पना येणार नाही. नोटाबंदीमुळे आर्थिक धोरणांचे खूप मोठे नुकसान झाल्याची बाब सिद्ध झाली आहे. आर्थिक, सामाजिक, देशाची पत आणि संस्थात्मक अशा विविध स्तरावर मोठे नुकसान झाले आहे. देशाचा विकासदर खालावणे हा या सगळ्या व्यापक परिस्थितीचा केवळ एकच कंगोरा होता. विकासदराच्या निर्देशकांपेक्षा नोटाबंदीचा व्यापक असा विपरीत परिणाम हा देशातील निम्न स्तरावर आणि उद्योगांवर झाला आहे. याशिवाय, देशातील लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रावरही याचे त्वरीत परिणाम दिसून आल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटले.
तसेच नोटाबंदीनंतर आर्थिक विषमता आणखीनच वाढली. नजीकच्या काळातील निच्चांकी कामगिरीनंतर सध्याचा विकासदर हा उजवा वाटू शकतो. मात्र, समाजात सातत्याने वाढत असलेली आर्थिक विषमता हा आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या स्वरूपासाठी धोकादायक आहे. भविष्यात ही विषमता पुन्हा भरून न निघण्याच्या पातळीला पोहोचली आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशातील ही विषमता सामाजिकदृष्ट्या अस्वस्थ करणारी बाब आहे. त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय विचारहीन आणि घोडचूक असल्याचेही मनमोहन सिंग यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) ज्या व्यापारी, ग्राहक आणि अन्य घटकांना फटका बसला आहे त्यांना २०१९ मध्ये आपले सरकार केंद्रात आल्यावर दिलासा मिळेल असे बदल आम्ही या करप्रणालीत करणार असल्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.
काँग्रेसशासित हिमाचल प्रदेशमध्ये भ्रष्टाचार बोकाळला असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला त्यावरही राहुल गांधी यांनी हल्ला चढविला. हिमाचल प्रदेशमध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत भ्रष्टाचाराचे प्रमाण खूप कमी असल्याचे निती आयोगाच्या अहवालांत म्हटले असल्याचा दावा गांधी यांनी केला. विकासाच्या निकषांवर हिमाचल प्रदेश गुजरातपेक्षाही अधिक उत्तम असल्याचेही ते म्हणाले.जीएसटीचा फटका बसलेल्या घटकांना दिलासा देण्यासाठी आम्ही सत्तेवर आल्यानंतर या करप्रणालीत संपूर्ण बदल करणार आहोत, असे गांधी यांनी पाओंता साहिब, चंबा आणि नागरोटा येथील प्रचार सभांमध्ये स्पष्ट केले.
काँग्रेसच्या पाठिंब्याने ही करप्रणाली मंजूर करण्यात आल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला त्याबद्दल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने ज्या जीएसटीची अंमलबजावणी केली आहे ती आपल्या पक्षाने प्रस्तावित केलेली नाही. सरकारने घाईने जीएसटीची अंमलबजावणी केली, असेही ते म्हणाले.
व्हीएस न्यूज - एटीएममधून बोगस नोट आल्याचे प्रकार वारंवार समोर येत असतात. पण दिल्लीतील एका एटीएममधून चक्क दोन हजार रुपयाची अर्धी नोट एका तरुणाच्या हाती पडली.
दिल्लीतील जामिया परिसरात राहणाऱ्या शादाब चौधरी डीसीबी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. त्याने ज्यावेळी पैसे काढले तेव्हा त्याला एक विचित्र प्रकाराची दोन हजार रुपयांची नोट मिळाली. ही नोट अर्धीच छापलेली होती तर तिचा अर्धा भाग कोरा कागद होता. कोणीतरी फाटलेल्या नोटेला कागद जोडल्याचे शादाबला दिसून आले.
शादाबने या प्रकरणाची बँक तसेच स्थानिक पोलrस स्थानकामध्ये तक्रार केली आहे. पोलिसांनी आयपीसी कलम ४२० म्हणजेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे शादाबने एटीएममधून दहा हजार रुपये काढले. ज्यामध्ये दोन हजार, ५०० आणि १००च्या नोटांचा समावेश होता. मात्र त्याने नोटा मोजल्या त्यावेळी त्याला ही कागद जोडलेली नोट आढळून आली. त्याने लगेचच बँककडे या संबंधात तक्रार केली. बँकेने नोटा न तपासताच एटीएममध्ये टाकल्या का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करुन घेतल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
व्हीएस न्यूज - पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी भारताशी युद्ध हा पर्याय योग्य नसून, काश्मीर आणि इतर प्रश्न केवळ चर्चेच्या माध्यमातून सोडवता येतील, असे मत व्यक्त केले आहे. ‘लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स’च्या दक्षिण आशिया केंद्रामध्ये ‘फ्यूचर ऑफ पाकिस्तान २०१७’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. काश्मीर प्रश्न हा गंभीर मुद्दा असून त्यावरील तोडगा निघेपर्यंत भारताबरोबर तणावपूर्ण संबंध कायम राहतील, असे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्वतंत्र काश्मीरच्या विचाराला आपले समर्थन नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. काश्मीरबद्दल बोलताना अब्बासी यांनी मागील पाकिस्तानी पंतप्रधानांप्रमाणेच आडमुठी भूमिका घेतल्याचे दिसून आले. ‘काश्मीर हा भारत पाकिस्तान चर्चेतील मूळ मुद्दा असून तो प्रश्न सुटेपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्णच राहतील. आम्ही नेहमीच काश्मीर प्रश्नावर चर्चेसाठी तयार असतो. कारण चर्चेमधूनच हा प्रश्न सुटू शकतो. भारताबरोबर युद्ध हे या प्रश्नावरील उत्तर नाही’, असे मत अब्बासी यांनी मांडले.
पुढील काही वर्षांमध्ये दोन्ही देशांदरम्यान या प्रश्नावर चर्चेमध्ये काही विशेष प्रगती होणार नाही, असे मतही अब्बासी यांनी व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये २०१९ साली सार्वत्रिक निवडणुका असल्याने या प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. या काळात कोणताही देश या प्रश्नाबद्दल पुढाकार घेईल, असेही वाटत नसल्याचे सांगितले.
व्हीएस न्यूज – भारताच्या पुरुष संघापाठोपाठ महिला संघानेही आशिया चषक स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये चीनवर ५-४ ने मात करत आशिया चषकावर नाव कोरले. या विजयासह भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
जपानमधील काकामिगाहारा येथे रविवारी महिला आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला. नवजोत कौरने पहिल्या हाफमध्ये गोल मारत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र दुसऱ्या हाफमध्ये चीनच्या तिआन लुओने गोल मारत संघाला बरोबरी मिळवून दिली. त्यामुळे शेवटी सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला.
शूटआऊटमध्ये दोन्ही संघांचा स्कोअर ४-४ असा होता. त्यामुळे पाचवा प्रयत्न दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. प्रेक्षकांसाठीही हा क्षण रोमहर्षक होता. भारतातर्फे राणीने पाचव्या प्रयत्नात गोल करण्यात यश मिळवले. तर चीनची खेळाडू गोल करण्यात अपयश ठरली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. भारताच्या महिला संघाने यापूर्वी २००४ मध्ये आशिया चषक ही स्पर्धा जिंकली होती. अंतिम लढतीत भारताने जपानवर १- ० अशी मात केली होती. तर २००९ साली थायलंडमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत चीनने भारतावर ५ – ३ असा विजय मिळवला होता. या पराभवाचा वचपाही भारतीय संघाने रविवारी काढला.
व्हीएस न्यूज – - नारायण राणे यांनी मुलांच्या भविष्यासाठी काँग्रेस पक्ष सोडला असे खळबळजनक विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. डॉ. पतंगराव कदम यांनी केले. तसेच राष्ट्रवादीला काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असे सूचक विधान आ. कदम यांनी केले. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.
माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम हे रविवारी एका खासगी कार्यक्रमानिमित्त पंढरपूरला आले होते. येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे कल्याण काळे, शहराध्यक्ष अॅड. राजेश भादुले आदी उपस्थित होते. आ. कदम यांना राणे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी राणे यांना लक्ष्य केले. राणे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री झाले तरीही सत्तेचा मोह काही सुटला नाही. मुलांच्या भविष्यासाठी राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडला, असे खळबळजनक विधान कदम यांनी केले. चांगले काम केले तर बाजारात किंमत मिळते. नाहीतर कुत्रेदेखील विचारत नाही, असा टोला लगावत एकदाच मंत्री व्हावे, आयुष्यभर मंत्रिपदाची इच्छा बाळगणे योग्य नाही, असे कदम म्हणाले.
कॉंग्रेस पक्ष आक्रोश मेळावे घेत आहे. राष्ट्रवादीला सोबत का घेतले नाही असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यावर कदम यांनी सूचक विधान केले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळे नाही. पवार साहेब हे काँग्रेसच्या मुशीत तयार झाले आहेत. विधानसभा निवडणुका एकत्र लढलो असतो तर सत्ता गेली नसती. राष्ट्रवादीला काँग्रेसशिवाय पर्याय नाही असे विधान कदम यांनी केले. मुंबईतील फेरीवाले यांच्याबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, असा सल्ला कदम यांनी दिला. सरकारला जाहिरातीवर खर्च करायला पसे आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पसे नाही, अशी टीका कदम यांनी केली.
मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक…
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्यक्तिगत चांगले आहेत. त्यांचे विचार सकारात्मक आहेत. त्यांची काम करण्याची ऊर्जा आहे, असे तोंडभरून मुख्यमंत्र्यांचे कौतुक माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी केले, मात्र त्यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही. मंत्रिमंडळातील टीम मात्र चांगली नाही, त्यामुळे सरकारची अडचण होत आहे, असे मत कदम यांनी व्यक्त केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002