व्हीएस न्यूज - भोसरी पोलीसांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना संशयावरून पडकलेले तिघे सराईत दुचाकी चोर असल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले. त्यांच्याकडून 4लाखांच्या तब्बल 20 दुचाकी जप्त केल्या आहेत. प्रदिप ऊर्फ फंट्या दत्तात्रय करवंदे (वय-23, रा. कान्हेवाडी, खेड), गणेश गोपाळ मेदगे (वय-22, रा. अवदर, खेड), गोट्या ऊर्फ कैलास बबन पारधी (वय-36, रा. ठाकरवाडी, कडूस, खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
भोसरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फौजदार चामले यांच्यासह एक पथक आळंदी रोड परिसरात गस्त घालत होते. दोन स्लेंडर प्लस दुचाकीवरून तिघे संशयीतरित्या फिरताना पोलीस पथकाच्या निदर्शनास आले. फौजदार चामले यांनी आरोपींना हटकताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पळून जाणाऱ्या आरोपीला पोलीसांनी पाठलाग करून पकडले. दुचाकींची कागदपत्रे मागितल्यानंतर आरोपींनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलीसांचा संशय बळावला. आरोपींना ताब्यात घेवून कसून चौकशी केल्यानंतर दोन्ही दुचाकी चोरीच्या असल्याचे कबूल करत शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरलेल्या तब्बल 20 दुचाकी जप्त केल्या.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गिरीश चामले, सचिन चव्हाण, संदिप गवारी आदी पथकाने केली.
व्हीएस न्युज - उच्चन्यायालयाच्या आदेशा नुसार पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवर पिंपरी चिंचवड अनधिकृत बांधकाम विभागाच्या वतीने धडक कारवाई करताना निदर्शनात येत आहे. परंतु एकीकडे कारवाई करताना अधिकारी दिसतात तर पिंपरी कॅम्प सारख्या ठिकाणी आर्थिक हितसंबंध जोपासून अनधिकृत बांधकामांना अभय देतानाचे निदर्शनात येत आहे. असे आरोप मातृभूमी महिला सेवाभावी सहकारी संस्थेचे अध्यक्षा सायराबानु शेख यांनी केला आहे.
व्हीएस न्युजचे प्रतिनिधी भानुदास गायकवाड यांच्याशी बोलताना त्या म्हणाल्या की, पिंपरी कॅम्प मध्ये अनधिकृत बांधकामाविषयी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या व्हाट्स अँप व पि. सी . एम .सी . तक्रार निवारण टोल फ्री क्रमांकावर मे.नंदा टेक्सटाईल (पिंपरी कॅम्प ,साई ड्रायफ्रूट च्या समोर 'बि' ब्लॉक १०/११ च्या समोर )त्याचप्रमाणे इंद्रायणी बँकेच्या शेजारील पाच गुंठ्या मध्ये अनधिकृत बांधलेल्या पत्र्याचे शेड विषयी संबंधीत अधिकाऱ्यांना वेळोवेळी निदर्शनात आणून देऊन देखील कुठलीच ठोस कारवाई केली जात नाही .उलट त्यांची पाठ राखण केल्याचे निदर्शनात येते अश्या शब्दांत सायराबानु शेख यांनी कडव्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
https://www.youtube.com/watch?v=Bo2p1eefN9w&t=1s
व्हीएस न्यूज - बेकायदेशीररित्या गावठी कट्टे बाळगणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तूल, सहा जिवंत काडतूसे आणि दोन दुचाकी असा साडेतीन लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चिंचवड येथील चिंतामणी चौकात करण्यात आली. दत्ता विठ्ठल आगलावे (वय-25, वंदावन कॉलनी, चिंचवड), विकास भाऊ कदम (वय-25, रा. औंढे खुर्द, लोणावळा) आणि किरण दत्तात्रय येवले (वय-25, रा. वाकसाई, बेहरगाव, मावळ), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सहायक पोलिस निरीक्षक सतिश कांबळे यांनी याबाबतची माहिती दिली. गुरुवारी रात्री गस्त घालत असताना त्यांना दगडोबा चौक, चिंचवडे नगर येथे नामचीन गुंड येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार तिथे सापळा रचण्यात आला. रात्री साडेदहाच्या सुमारास दोन दुचाकीवरुन आलेल्या दत्ता आगलावे आणि त्याचे साथीदार विकास कदम, किरण येवले यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे प्रत्येकी 1 गावठी पिस्तुल आणि प्रत्येकी दोन जिवंत काडतुसे सापडली. त्यांच्याकडून दोन दुचाकींसह 3पिस्तुल, 6 जिवंत काडतुसे असा साडेतीन लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हे तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.
चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुधाकर आवताडे, ऋषीकेश पाटील,विजयकुमार आखाडे, शिपाई चंद्रकांत गडदे, देवा राऊत, पंकज भदाणे, सचिन वर्णेकर, अमोल माने, गोविंद डोके यांनी ही कामगिरी केली.
व्हीएस न्यूज - टिव्ही, मोबाईलमुळे कुटूंबात संवाद दिवसेंदिवस कमी होत आहे. कुटूंबात वादावादी, गैरसमज निर्माण होण्याचे प्रमाण वाढले असून कौटुंबिक समस्यांवर मानसोपचारतज्ञ उत्तम मार्गदर्शक ठरत आहेत, असे मत मानसोपचारतज्ञ डॉ. भारत सरोदे यांनी व्यक्त केले.
मोरवाडी म्हाडा सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित महात्मा गांधी व्याख्यानमालेमध्ये 'कौटुंबिक स्नेहबंध' या विषयावर डॉ. सरोदे पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. याप्रसंगी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस सरोदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. व्याख्यानमालेचे आयोजक बी. आर. माडगुळकर, आर. आर आपटे उपस्थित होते. प्रिती देशपांडे,सिंधु खंडीशळे यांनी 'साबरमती के संत तूने कर दिया कमाल' हे गीत सादर केले. लोकरंजन, लोकप्रबोधन आणि लोकप्रतिवर्तन या हेतून महात्मा गांधी व्याख्यानमालेचे गेल्या सात वर्षांपासून आयोजन करण्यात येत असल्याचे बी. आर माडूगळकर यांनी सांगितले. उल्हास झिरपे यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - मुळा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याने खडकी बोपोडी व दापोडी परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर अखेर महिनाभरापासुन झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग आली असून जलपर्णी काढण्याच्या कामास अखेर प्रारंभ झाला आहे.
खडकी कॅंन्टोन्मेंट हद्दीतील महादेव वाडी येथिल मुळा नदीपात्रात तसेच साप्रस जुना होळकर पुला खालील नदीपात्रात व बोपोडी हॅंरीश पुलाखालील तसेच औंधरोड, शांता आपटे घाटा शेजारील नदीपात्रात आणि दापोडी बॉंम्बे कॉंलनी आणि स्मशानभुमी शेजारील नदीपात्रात मागिल अनेक महिन्यांपासुन मोठ्या प्रमाणात जलपर्णीत वाढ झाली आहे. नदी किनारील व आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढत असून दुपारच्या वेळेसही डास प्रतिबंधक अगरबत्ती किंवा फवारणीचा वापर करण्याची वेळ येथिल नागरिकांवर आली आहे. डासांमुळे मलेरीया, हिवताप यासारख्या आजारांची लागण वाढली आहे. नागरीकांनी या प्रकरणी स्थानिक प्रशासन व संबधीत विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र याप्रकरणी दखल घेतली गेली नाही. महिनाभराच्या कालावधीनंतर झोपी गेलेले हे प्रशासन खडबडुन जागे झाले. नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामास प्रारंभ केला. यावेळी नगरसेविका सुनिता वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोर, विजय शेवाळे, पिंपरीचे नगरसेवक रोहित काटे आदी उपस्थित होते.
कॅंटोन्मेंट बोर्डातील आरोग्य अधिक्षक बी. एस. नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलपर्णी दुर करण्याचे काम सुरु केले आहे. सर्व परिसरात डास प्रतिबंधक औषध फवारणीही करण्यात येत आहे. बोपोडी हॅंरीश पुला खालील तसेच औंधरोड शांता आपटे घाट येथिल नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामासही प्रारंभ करण्यात आला आहे. औंध क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य प्रमुख गोविंद सातपुते, मुकादम बाळु भागे, सुरेश कोकाटे, नामदेव जोशी, कैलास कंदारे, दामु दामसे, सुरेश जाधव आदी पथकाच्यावतीने जलपर्णी काढण्याची काम केले जात आहे.
व्हीएस न्यूज - जुन्या भांडणाचा राग मनात धरून दुचाकीवरून आलेल्या आठ जणांच्या टोळक्याने एका तरूणाला दुचाकीवरून धक्का देत कोयत्याने वार केले. सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास सांगवी फाटा उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. सुनिल मोनाप्पा सुतार (वय-24, रा. वैदवस्ती, पिंपळे-गुरव) असे गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ आलोक सुतार (वय-27) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोन्या क्षिरसागर याच्यासह त्याच्या 7 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सुनील व आरोपी यांच्यात पुर्वी भांडणे झाली होती. सुनिल सोमवारी पावणे बारा वाजता त्याच्या भावाची हातगाडी बंद करून दुचाकीवरून घराकडे जात होता. सांगवी फाटा येथे रक्षक चौकाच्या विरूध्द दिशेने आलेल्या चार मोटारीवरील आठ जणांनी सुनिलच्या दुचाकीला धक्का मारून खाली पाडले. शिवीगाळ करत कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री ताथवडे परिसरात घडला. याबाबत पोलीस शिपाई एम. पी. जाधव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका दुचाकीस्वारासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई जाधव ताथवडे गावात रात्री आठच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. संबंधित दुचाकीवरील तरुणावर संशय आल्याने जाधव यांनी दुचाकीस्वारांकडे कागदपत्रे मागितली. आम्ही गाववाले आहोत, आम्हाला कागदपत्रे मागायची नाहीत, असे म्हणत त्यांनी जाधव यांच्या अंगावर धावून जात कॉलर पकडली. जोरात मागे ढकलून देत हात-पाय तोडण्याची धमकी दिली. तर गोंधळ पाहून जमा झालेल्या एका टपरी चालकाने व अन्य एक जण जाधव यांच्या अंगावर धावून गेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - सासरची मंडळी पत्नीला नांदायला पाठवित नसल्याच्या नैराश्यातून जावयाने सासू, सासरा आणि बायकोचे फोटो अंगाला चिकटवून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री मोशीतील खंडेवस्तीत घडली. रुपेश उत्तम जाधव (वय- 26, रा. खंडेवस्ती, मोशी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाने आपल्या मृत्यूला पत्नी व सासरचे मंडळी जबाबदार असल्याची चित्रफीत मोबाईलमध्ये तयार केली आहे.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे यांनी माहिती दिली. रुपेश हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील आहे. त्याचे आई-वडील गावी असतात. तीन वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले. पाच महिन्यांपूर्वी त्याची पत्नी एका कार्यक्रमानिमित्त माहेरी गेली होती. ती परत आली नाही. रुपेश पत्नीला आणण्यासाठी सासरी गेला होता. सासरच्या मंडळींनी पत्नीला रुपेश सोबत पाठवले नाही. त्यातून आलेल्या नैराश्यातून सोमवारी रात्री स्वतःच्या अंगाला सासू-सासरे आणि बायकोचा फोटो चिकटवून गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी रुपेशचा मोबाईल सापडला. त्यामध्ये 'माझ्या मृत्यूस पत्नी, सासू-सासरे जबाबदार असल्याचे' त्याने एका चित्रफितीतून म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - सतत संघर्ष, तिरस्कार, कटूता असेल तर पक्षाची वाढ होत नाही. झालेल्या चुका पोटात घालून पक्ष वाढीसाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांनी केले आहे. दि. ११ रोजी कामशेत येथे होणाऱ्या हल्लाबोल सभेच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी कॉंगेस पक्ष मावळ तालुका व तळेगाव शहराची पूर्व नियोजन बैठक येथील योगीराज हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बाफना बोलत होते.
माजी आमदार कृष्णराव भेगडे, पुणे पीपल्स बॅंकेचे अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, शोभा कदम, देहूरोड राष्ट्रवादीचे अध्यक्ष कृष्णा दाभोळे, तळेगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश काकडे, पुणे जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, सुरेश चौधरी, माया भेगडे, राजाराम राक्षे, दत्तात्रय पडवळ, देहूचे माजी सरपंच अशोक मोरे, पंचायत समिती सदस्या हेमलता काळोखे, कैलास गायकवाड, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर, नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे, अरुण माने, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, तानाजी दाभाडे, शबनम खान, मंगल मुऱ्हे, रमेश घोजागे, सुनील दाभाडे, संतोष मुऱ्हे, तुकाराम आसवले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
प्रसंगी, तानाजी दाभाडे, दत्तात्रय पडवळ, सुरेश चौधरी, अशोक मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. बाबुराव वायकर म्हणाले की, भाजपकडून कोणतीही विकास कामे होत नाही. यासाठी हल्लाबोल आवश्यक आहे. अर्चना घारे यांनी पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी हल्लाबोल कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. बापूसाहेब भेगडे यांनी माणसाची उंची त्याने केलेल्या कामातून होते. सध्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील कामाबाबत तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा यावर शासनाकडून होत असलेला अन्याय याबाबत आवाज उठविला पाहिजे. कृष्णराव भेगडे म्हणाले की, कार्यकर्त्याच्या मनातील संभ्रम दूर केला पाहिजे. कामगार, शेतकरी, आर्थिक दृष्ट्या मागास यांचे प्रश्न कार्यकर्त्यांनी दूत होऊन सोडविले पाहिजे.
बाफना म्हणाले, पुणे शहर हि शरद पवार साहेबांची कर्मभूमी आहे. मावळातून हल्लाबोल कार्यक्रमाच्याव्दारे सर्व घटकांना एकत्र करून तालुक्याची ताकत दाखवू. सर्वांना एकत्र आणण्याची जबाबदारी मी स्वतः पार पडतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश भेगडे, रामभाऊ मराठे यांनी केले.
व्हीएस न्यूज – सोशल मिडीयावर महिलेसंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी दोघांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली आहे. रवींद्र शिंदे (रा. पिंपरी) आणि दिगंबर पडवळ (रा. कार्ला, लोणावळा) असे आरोपींचे नाव असून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, आरोपी शिंदेला पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी माहिती दिली. संबंधित महिलेने कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली दिली होती. या महिलेविरोधात रवींद्र आणि दिगंबर यांनी रविवारी 28 मार्च रोजी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण तयार झाल्याने मंगळवारी आरोपींवर गुन्हा दाखल करून शिंदेला अटक केली आहे. तसेच पोस्ट टाकणारे तरुण कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत का ? याबाबत वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - वाल्हेकरवाडी चिंचवड येथे बेकायदेशीरपणे सिलेंडर विक्री करणाऱ्या दुकानावर अन्न पुरवठा विभागाने बुधवारी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा आढळून आला असून अन्न पुरवठा विभागाने चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी परिसरात पवना नदीच्या किनारी एक पत्र्याचे शेड तयार केले आहे. त्यामध्ये नामांकित कंपनीच्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून लहान गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरला केला जात होता. याबाबत अन्न पुरवठा विभागाला माहिती मिळताच विभागाच्या सहा अधिकाऱ्यांनी बुधवारी या दुकानावर छापा मारला. यावेळी दुकानात सुमारे 250 गॅस सिलेंडर आढळून आले. त्यापैकी दोन सिलेंडर लिकेज सापडले. लिकेज असलेले सिलेंडर अग्निशमन विभागाचे विकास नाईक, विशाल बाणेकर, विठ्ठल तपकाळ आणि संजय महाडिक यांनी तात्काळ दुरुस्त केले. झोपडपट्टीतील मुलांच्या मार्फत ही बेकायदा सिलेंडर विक्री केली जाते. आरोपी नामांकित गॅस कंपन्यांच्या गॅस सिलेंडर मधून गॅस काढून लहान गॅसमध्ये भरून त्याची विक्री करीत होते. छापा मारल्या वेळी बेकायदा सिलेंडरचा मोठा साठा पकडण्यात आला आहे. अन्न पुरवठा विभागाने चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले आहे.
व्हीएस न्यूज - भाजपच्या मुंबईतील स्थापना दिन मेळाव्यासाठी पिंपरीतून शुक्रवारी दि. 6 रोजी पक्षाचे 15 हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी जाणार आहेत. त्यासाठी शहरातील पक्षाचे एक खासदार आणि दोन आमदार यांना प्रत्येकी दहा बसेसचे टार्गेट देण्यात आले आहे. तर, पक्षाच्या प्रत्येक नगरसेवक आणि कोअर कमिटी सदस्याला एकेका बसचे लक्ष्य देण्यात आले आहे.
दरम्यान, मंत्रिपदासाठी शहरातील दोन्ही आमदारांचे नाव घेतले जात असल्याने त्यासाठी चालून आलेल्या या संधीचा ते उपयोग करून घेण्याच्या तयारीला लागले आहेत. मुंबईतील वांद्रे येथील "बीकेसी'वर सकाळी 11 वाजता हा मेळावा होत आहे. त्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संबोधित करणार आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने "एकला चलो रे'ची घोषणा नुकतीच केली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा दसरा मेळावाही नुकताच नेहमीसारखा जोरदार झाला. त्यामुळे आपली ताकद दाखविण्यासाठी भाजपला स्थापना दिनाची संधी चालून आलेली आहे. त्यात लोकसभा निवडणूक सव्वावर्षावर आली आहे. मात्र, ती पाच महिने अगोदर म्हणजे या वर्षअखेरीसही होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील तयारी म्हणूनही या मेळाव्याकडे पाहिले जात आहे. या मेळाव्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात शहराला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सहयोगी आमदार महेश लांडगे यांची नावे त्यासाठी घेतली जात आहेत. त्यामुळे ते यानिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन दाखवून देणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच हा पक्ष पालिकेत सत्तेत आला आहे. त्यामुळे या मेळाव्याकरिता जाण्याकरिता पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. काल शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी एका मंगल कार्यालयात मेळाव्याच्या तयारीची बैठक घेतली. त्यात वरील टार्गेट देण्यात आले. सर्व बस सकाळीच मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधी हे आदल्या दिवशीच जाणार आहेत. पक्षाचे 77 व सहयोगी अपक्ष पाच असे 82 नगरसेवक भाजपचे पिंपरीत आहेत. 21 कोअर कमिटी मेंबर आहेत. त्या प्रत्येकाने एकेक पन्नास सीटर बस करून त्यातून कार्यकर्त्यांना मुंबईला न्यायचे आहे. दोन्ही आमदारांच्या जोडीने पक्षाचे राज्यसभा सदस्य अमर साबळे यांनासुद्धा दहा बस नेण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. पक्षाचा युवा मोर्चा या मेळाव्याला ज्योत घेऊन जाणार आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002