व्हीएस न्यूज - किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री ताथवडे परिसरात घडला. याबाबत पोलीस शिपाई एम. पी. जाधव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका दुचाकीस्वारासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई जाधव ताथवडे गावात रात्री आठच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. संबंधित दुचाकीवरील तरुणावर संशय आल्याने जाधव यांनी दुचाकीस्वारांकडे कागदपत्रे मागितली. आम्ही गाववाले आहोत, आम्हाला कागदपत्रे मागायची नाहीत, असे म्हणत त्यांनी जाधव यांच्या अंगावर धावून जात कॉलर पकडली. जोरात मागे ढकलून देत हात-पाय तोडण्याची धमकी दिली. तर गोंधळ पाहून जमा झालेल्या एका टपरी चालकाने व अन्य एक जण जाधव यांच्या अंगावर धावून गेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.