व्हीएस न्यूज – भांडणे करू देत नाही, मध्यस्थी करतो याचा राग मनात धरुन एका टोळक्याने मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर तलवार आणि कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 14) ताथवडे येथील एका महाविद्यालयाच्या आवारात घडली.
याप्रकरणी वाकड पोलिसांनी रोशन पवार (वय 24, रा. सर्व्हे नंबर 140/2, ताथवडे) व इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौरभ उर्फ आदिनाथ पवार असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सौरभच्या दोन मित्रांमध्ये जुनी भांडणे आहेत. त्यातील एकाने आपल्या इतर मित्रांना भांडणासाठी बोलावून घेतले. सौरभ मध्ये पडला आणि भांडणे सोडवू लागला याचा राग आल्याने महेश पवार याने तू आमच्या भांडणात मध्यस्थी करणारा कोण? थांब तुला संपवूनच टाकतो असे म्हणत सौरभवर प्राणघातक हल्ला केला. डोक्यात तलवारी आणि कोयत्याने वार केल्यामुळे सौरभ गंभीर जखमी झाला. पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी. एस. भोगम करत आहेत.
व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात सकाळी पोलीस पाटील पदासाठी रविवारी (दि. 19) अकरा ते दुपारी साडेबारा या वेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज केलेल्या 808 पैकी 25उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद ठरले आहेत. त्यानुसार पात्र उर्वरीत उमेदवारांची परीक्षा होणार आहे.
मावळ- मुळशी उप विभागीयमध्ये 271 रिक्त पदे भरण्याबाबत उपविभागीय अधिकारी सुभाष बागडे यांच्या कार्यालयाकडून जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानुसार मावळ तालुक्यातील 156 रिक्त पदासाठी तालुक्यातून808 उमेदवारांनी पोलीस पाटील पदासाठी अर्ज दाखल केले होते. यापैकी 25 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद ठरले आहेत. या परीक्षेसाठी तहसीलदार रणजित देसाई यांची केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील यांची उपकेंद्र प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षेसाठी 7 पर्यवेक्षक व 44 समावेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस पाटील परीक्षेचे प्रवेशपत्र हे संबंधित कामगार तलाठी यांच्यामार्फत उमेदवारांना वितरित करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र मिळाले नाहीत, अशा उमेदवारांनी तत्काळ तहसील कार्यालय मावळ किंवा उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी उपविभाग पुणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे.
व्हीएस न्यूज – शहरातील काळेवाडी फाटा ते आळंदी बीआरटी रस्त्यावरील कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. या मार्गावरील बीआरटी बस थांब्यांची प्रलंबित कामे करण्यासाठी आठ कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या.
पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी फाटा ते देहू आळंदी बीआरटी रस्ता कित्येक दिवसापासून रखडलेला प्रकल्प आहे. या मार्गावरील बीआरटी बसथांब्याची कामे अद्याप अपूर्ण आहेत. बसथांब्यांची उर्ववित कामे करण्यासाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा खर्च पालिका करणार आहे. हा काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता 10.70 किलोमीटर लांबीचा बीआरटीएस मार्ग आहे. सांगवी-किवळे बीआरटी मार्ग व देहू-आळंदी रस्ता या दोन प्रमुख रस्त्यांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने त्यावरील कामे तातडीने होणे अपेक्षित आहे. या मार्गासाठी तब्बल 257 कोटी रुपये एकूण खर्च केले जाणार आहेत. यापुर्वी पालिकेने सन 2010 पासून वेगवेगळ्या पाच टप्प्यात कामे सुरू झालेली आहेत. मात्र, मागील सात वर्षांपासून या बीआरटी मार्गाचे काम रखडलेले आहे. निगडी-दापोडीबरोबर हा बीआरटी मार्ग सुरू व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
दरम्यान, काळेवाडी फाट्यापासून काही अंतरापर्यंत, तर इकडे ऑटो क्लस्टरपासून पुढे कुदळवाडीपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. या मार्गावर एकूण 15 बीआरटी बस थांबे आहेत. त्यापैकी 8 बस थांबे उभारण्यात आले आहेत. अन्य बस थांबे नव्याने करावे लागणार आहेत. यापुर्वीच्या बस थांब्याची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे पालिका स्थापत्य बीआरटी विभागाने या बस थांब्याचे कामासाठी सुमारे 8 कोटी 47 लाख 18 हजार 814 रुपयांची निविदा काढली आहे. त्यामध्ये मे. बी. के. खोसे या ठेकेदाराने 7 कोटी 30 लाख 95 हजार 393 रुपयांमध्ये हे काम करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार बस थांब्याचे काम या ठेकेदाराला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मान्यता दिली आहे. यामुळे बीआरटीची प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचा दावा केला जात आहे.
व्हीएस न्यूज – शहरातील अनधिकृत बांधकामधारकांना मिळकत कराच्या दुपटीने शास्ती कर आकारला जातो. अनधिकृत बांधकामांना प्रभावी आळा बसविण्यासाठी शास्ती कराची सक्तीने वसुली करा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने कार्यवाही सुरू आहे, असे पालिका प्रशासनाने कळविले आहे.
शहरातील अनधिकृत बांधकांमाचा शास्तीकर रद्द केल्याचे सत्ताधारी भाजपच्या वतीने नागरिकांना सांगितले जात आहे; मात्र महापालिकेच्या करसंकलन कार्यालयाकडून थकीत व चालू शास्तीकर भरण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे नागरीक संताप व्यक्त करीत आहेत. या संदर्भात माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी कर संकलन कार्यालयाकडून याबाबत पत्राद्वारे चौकशी केली. त्यांना दिलेल्या उत्तरात शास्ती कर सक्तीने वसूल करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार शहरातील अनधिकृत बांधकाम धारकांकडून शास्तीकर वसुली केली जात आहे, असे त्यांनी उत्तरात म्हटले आहे.
महापालिकेने 4 जानेवारी 2008 नंतर अनधिकृत बांधकामधारकांना कलम 267 अ नुसार 2012-13 या आर्थिक वर्षापासून मिळकतकराच्या दुप्पट इतका शास्तीकर (दंड) लागू केला होता. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. राज्यातील सर्व महापालिकांमध्ये एक वाक्यता असावी. अल्प उत्पन्न घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून; तसेच अनधिकृत निवासी बांधकामांना प्रभावी आळा बसविण्यासाठी शास्तीकराची आकारणी करण्याचे आदेश राज्य शासनाने 11 जानेवारी 2017 ला दिले आहेत.
त्यानुसार 600 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी बांधकामांना शास्तीकर आकारू नये. 601 ते 1 हजार चौरस फुटांपर्यंतच्या निवासी बांधकामांना मिळकतकराच्या 50 टक्के शास्ती कर आकारावा. 1001 चौरस फुटांपुढील निवासी बांधकामांना मिळकतकराच्या दुप्पट दराने शास्ती आकारण्यात यावी, या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेने 1 एप्रिल 2017 पासून केली आहे. त्यानुसार थकीत व सध्याच्या शास्ती करासह मिळकत कर स्वीकारला जात आहे, असे उत्तरात नमूद केले आहे. अनधिकृत बांधकामधारकांकडून शास्ती कर वसूल करू नये, असे कोणतेही आदेश महापालिकेस प्राप्त झालेले नाहीत.
दरम्यान, शास्ती करासह मिळकत कर वसुली कायम आहे, असे त्यात म्हटले आहे. महापालिकेच्या या उत्तरामुळे सत्ताधारी भाजप नागरिकांची फसवणूक करीत असल्याचा आरोप भापकर यांनी केला आहे. एकीकडे पदाधिकारी शास्ती कर माफ केल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी सक्तीने शास्ती कर वसूल करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप भापकर यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
व्हीएस न्यूज – गुरू गणेश विद्या मंदिर ज्युनिअर कॉलेज येथे शालेय परिवहन समितीची सभा घेण्यात आली. यावेळी सभेस शाळेचे सचिव राजेंद्र मुथा, सहायक सचिव अनिल कांकरीया उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजनाने झाली. कार्तिकी एकादशीनिमित्त अभंग म्हणून जवाहरलाल नेहरूच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य नंदकुमार ठाकूर, पर्यवेक्षक डी. बी. हांडे, शालेय अध्यक्ष डी. एल. थोरात, शिक्षक बी. टी. नाळे,नगरसेविका शर्मिला बाबर, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार आदी उपस्थित होते.
यावेळी परिवहन समितीचे ब्रीदवाक्य स्वच्छता व सुरक्षितता हे ठेवण्यात आले. बस चालकांना कागदपत्रे सोबत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ओळखपत्र अनिवार्य असल्याचे सांगितले. शिक्षक ना. ल. तोत्रे यांनी सूत्रसंचालन केले.
व्हीएस न्यूज – शहरातील बीआरटीएस मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी राबविलेल्या बीआरटी पार्कींग संकल्पनेतून टीडीआर व एफएसआयचा गोरखधंदा झाला. मात्र, त्याचा हिशोब पालिकेकडे नसल्यामुळे हे पार्कींग नागरिकांसाठी असून नसल्यासारखे आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर खासगी जागेतील हे बीआरटी पार्कींगचा शोध घेऊन ते प्रवाशांना उपलब्ध करून देणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने औंध-रावेत, नाशिकफाटा-वाकड, निगडी- दापोडी, काळेवाडी फाटा- देहू आळंदी रस्ता या चार मार्गांवर बीआरटीएस बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी दोनच मार्ग पालिकेला सुरू करता आले असून आणखी दोन मार्गांची प्रतिक्षा आहे. या व्यतिरिक्त आणखी मार्गही बीआरटी अंतर्गंत विकसित केले जात आहेत. मात्र, बीआरटी प्रकल्प नियोजितपणे राबविणे पालिकेला जमले नसून अंमलबजावणीचाही घोळ सातत्यान पुढे येतो. त्याचेच एक उदाहरण म्हणजे बीआरटी पार्कींग आहे. बीआरटी मार्गाच्या बाजुला असणा-या व्यापारी संकुल व गृह संकुलांसाठी महापालिकेने ज्यादा टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) व एफएसआय (चटई निर्देशांक) देण्याचा निर्णय घेतला होता. ज्यादा टीडीआर व एफएसआयच्या बदल्यात संबधित इमारतीमध्ये बीआरटीएससाठी पार्कींग उपलब्ध करून देणे जागा मालकांना बंधनकारक होते. हे पार्कींग बीआरटीएसने प्रवास करणाऱ्या प्रवशांसाठी मोफत वापरता येणार होते.
दरम्यन, या संकल्पनेतून 2009 पासून ज्यादा टीडीआर व एफएसआय दिला गेला. पण, त्याचा कोणताही हिशोब नाही. त्यातून निव्वळ गोरखधंदा झाला असून संबधितांनी लाखो, कोट्यवधी रुपयांचा लाभ करून घेतला. मात्र, त्या मागील बीआरटी प्रवाशांची सोय होण्याचा मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला. त्याला पालिकाही प्रशासन जबाबदार आहे.
टीडीआर, एफएसआयचे वाटप व पार्किंग सोयीकडे बीआरटीएस व बांधकाम परवाना या दोन्ही विभागांनी लक्ष दिले नाही. पर्यायाने ही सुविधा उपलब्ध असूनही तिचा वापर प्रवाशांना करता येत नाही. ही बाब आयुक्त हर्डीकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी यामध्ये लक्ष घालणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, हे पार्कींग शोधून नागरिकांसाठी उपलब्ध केले जाईल.
व्हीएस न्यूज – गेल्या २० दिवसांपासून फरार असलेले पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक तुषार कामठे हे आज (गुरुवार) पोलिसांसमोर हजर झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.तुषार कामठे यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर रोजी हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. साठे हे महापालिका निवडणुकीत कामठे यांचे प्रतिस्पर्धी होते. बनावट दाखल्याच्या आधारे त्यांनी महापालिका निवडणुकीत खोटी शैक्षणिक माहिती सादर केल्याचा आरोप आहे.सत्र न्यायालय व नंतर मुंबई उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन फेटाळल्याने कामठे यांना सरेंडर होण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. त्यानुसार ते सकाळी हजर झाले, असे सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी सांगितले. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच त्यांची पोलिस कोठडीही मागणार असल्याचे चांदखेडे यांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्याने कबूल केले. तीन महिने महापालिका सभेला गैरहजर राहिले, तर नगरसेवकपद रद्द होते. त्यामुळे ते वाचविण्यासाठी कामठे हजर झाल्याचे समजते.
व्हीएस न्यूज – पिंपरी चिंचवड महानगर पालीकेच्या वतीने चिंचवड स्टेशन येथे थोर महापुरुष लहुजी वस्ताद साळवे व क्रांतीविर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्याची उभारणी केली परंतु लहुजी वस्ताद साळवे आणी वासूदेव बळवंत फडके यांचे अर्धे पुतळे हे जवळ जवळ आहेत त्या पुतळा परिसरात स्वच्छता करून त्यावर मेघडांबरी करण्याची मागणी आपना वतन संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांची जयंती साजरी करण्यासाठी जागा उपलब्द करून द्यावी व पुतळ्यावर मेघडंबरी बसवावी अशा मागणीचे निवेदन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कडे देऊन मागणी करण्यात आली या वेळी लहुजी सेनेचे सुनील म्हस्के,जिल्हा प्रमुख महेश गवारे,राजू आवळे, गणेश अडागळे,सचिन कांबळे आदी उपस्तित होते .
व्हीएस न्यूज – जुन्या रचनेनुसार अ, ब, क, ड, इ आणि फ या सहा क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील रस्ते आणि गटर्स साफ-सफाईचे काम पूर्वीच्याच 68 स्वयंरोजगार व बेरोजगार सेवा संस्थांना महापालिकेचा आरोग्य विभाग पुन्हा 3महिन्यांची मुदतवाढ देणार आहे. कामाची ठेका देण्याची पद्धत बदलता येत नसल्याने महापालिका प्रशासनाला नाईलाजास्तव 4 कोटी 60 लाख 90 हजार 920 रुपये खर्चाला उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मुदतवाढ द्यावी लागत आहे. स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, बेरोजगार सहकारी सेवा संस्था आणि मजूर सहकारी संस्था यांना किमान वेतन दराने सदर काम देण्यात येते. दोन वर्षे कालावधीत या कामासाठी 87 पैकी 68 संस्था पात्र ठरल्या. त्यांनी एकूण925 कामगार किमान वेतन दराने पुरवले. या कामाची मुदत 31 मार्च 2017 ला संपली.
सदर कामाची नवीन निविदा प्रसिद्ध केल्याने पिंपरी-चिंचवड शहर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन व श्रीसंत गाडगेबाबा महाराज बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2017 पर्यंतचे कामास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. आदेश मिळेपर्यंत निविदा कार्यवाही सुरू ठेवावी, मात्र कामाचा अंतीम आदेश देऊ नये, असे 2 नोव्हेंबरच्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले आहे.
शहरातील रस्ते व गटर्स यांची दैनंदिन साफ-सफाई होणे हे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने संबंधित 68 ठेकेदार संस्थांना मुदतवाढ न देता काम बंद ठेवणे उचित नसल्याचे महापालिका प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या संस्थांना 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबरपर्यंत 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. कामगार कल्याण विभागाने 1 जुलै 2017 पासून सफाई कामगारांना किमान वेतन 16 हजार 609 रुपये 34 पैसे असल्याचे कळवले आहे. त्यानुसार 915 कामगारांचा मासिक खर्च 1 कोटी 53 लाख 63 हजार 640 रुपये आहे. तीन महिन्यांसाठी 4 कोटी 60 लाख 90 हजार 920 रुपये एकूण खर्च आहे. येत्या बुधवार दि. 15 ला या खर्चास मान्यता देण्याचा विषय स्थायी समितीसमोर येणार आहे.
व्हीएस न्यूज - अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार एक ते दीड गुंठ्यातील बांधकामांना चार ते पाच लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे नियमित केल्यास या दंडाच्या रकमेपोटी पालिकेला दीड ते दोन हजार कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्यांना दिलासा देणारा नसून, त्यातून शहरातील सर्वसामान्य गरीब माणसाची लूट होणार असल्याचा, गंभीर आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. बांधकाम व्यावसायिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अटीमध्ये अनधिकृत मिळकत धारकांना शास्तीकर पूर्णतः भरावा लागणार असून त्या नंतरच अनधिकृत बांधकाम धारकांचा अर्ज स्वीकारला जाणार आहे. त्यामुळे 500 कोटी पेक्षा जास्त रक्कम महापालिका शास्तीकारापोटी गरीब नागरिकांकडून वसूल करणार आहे. आजपर्यंत एकही नागरिकांनी या निर्णयाद्वारे बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज केला नाही. शहरामध्ये हजारो अनधिकृत बांधकामे असूनही पन्नास पेक्षा जास्त नागरिकांनी साधी विचारपूस महापालिकेच्या कक्षाकडे केली नसल्याचे, बारणे म्हणाले. त्यामुळे अनधिकृत बांधकाम निर्णयाचे श्रेय घेणा-यांनी प्रथम शास्तीकार पूर्ण माफ करून द्यावा व दंडाची आकारण्यात आलेली रक्कम कमी करण्यात यावी.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सर्वसामान्य नागरिकांना कमी किमतीमध्ये घरे उपलब्ध करून दिली असती तर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली नसती. प्राधिकरणाने सर्वसामान्य शेतक-यांच्या जमिनी कवडीमोल किंमतीत घेऊन धनिकांना विकल्या व सर्वसामान्य नागरिकांना वा-यावर सोडले. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न जटील झाला. याला पूर्णतःहा शासनच जबाबदार असून आत्ता राज्य शासन अनधिकृत बांधकाम धारकांकडून शास्तीकाराच्या नावाने जुलमी दंड वसुली करत असून हा भुर्दंड अन्यायकारक असल्याचे, बारणे यांनी निवेदनात म्हटले म्हणाले.
प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत मिळकत धारकांना चालू बाजार भावाने विकास शुल्क व दंड भरावा लागणार असल्याने एक एक मिळकतीला लाखोच्या घरात पैसे मोजावे लागणार आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयाचे बळी अनेक नागरिक ठरणार आहे. आजपर्यंत एकाही अनधिकृत मिळकत धारकाने अर्ज दाखल केला नाही. शासनाच्या या निर्णयामुळे या पुढे किती बांधकामे नियमित होतील तो काळच ठरवेल. परंतु राज्य शासनाचा अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचा निर्णय हा सर्व सामान्य माणसाला परवडणार नसून गरीब नागरिकांकडून कोट्यावधी रुपये उकळण्याचा हा निर्णय आहे, असा आरोपही खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.
व्हीएस न्यूज – पोलीस मित्र संघ पिंपरी-चिंचवड शहर विभागाच्या वतीने समन्वय कुटुंब सल्ला केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक राहुल जाधव, अश्विनी जाधव, संतोष काळे, सुधीर सोनवणे, डॉ. चंदन दिघावकर, मनिषा कदम, महेश दादा लांडगे युवा मंचचे अध्यक्ष दिनेश यादव, सुनील कड, रवींद्र देवरे, राजश्री जायभाय विजय कोटगोंड आदी उपस्थित होते. या केंद्राव्दारे वैवाहिक समस्या, स्त्रियांवर होणारे अत्याचार, मालमत्ता विषयक फसवणूक, विद्यार्थ्यांचे वर्तन, अभ्यास, करिअर विषयक समस्या आदींबाबत समुपदेशन व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येईल.
व्हीएस न्यूज – बालचमूंसाठी विविध उपक्रम घेत पिंपरी-चिंचवड शहरात भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस व नेहरुनगर येथील त्यांच्या पुतळ्यास उपमहापौर शैलजा मोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. नगरसेविका अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी, उद्यान विभागाचे जोपा पवार, संजय शिंदे, विद्युत विभागाचे रामदास कटके, सुखदेव जाधव, राजेंद्र कुंभार आदींनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्यासही उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर हनुमंतराव भोसले, नगरसदस्य राहुल भोसले,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, सहाय्यक आरोग्याधिकारी बी. बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरिक्षक रमेश भोसले, माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी, प्रवीण बगलाने, उद्यान विभागाचे जोपा पवार, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण रुपनर, माऊली इंगळे, सोन्याबापू तरटे, संजय धाडगे आदी उपस्थित होते.
काळेवाडीत बालचमूंचा फॅशन शो…
शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित कै. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालय काळेवाडी येथे पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून बाल दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर उपस्थित होते. यानिमित्त बालचमूंच्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बालचमूंनी संत, राष्ट्रपुरुष यांच्यासह फुलपाखरु, परी, मिस इंडिया, शेतकरी अशा विविध वेषभूषा सादर करत उपस्थितांची कौतुकाची थाप मिळवली.
विद्यानंद शाळेत बालजत्रा…
निगडी येथील विद्यानंद भवन हायस्कूलमध्ये बाल दिनानिमित्त आयोजित केलेल्या बालजत्रेचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. जत्रेचे उद्घाटन शाळेचे अध्यक्ष भरत चव्हाण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे कार्यकारी संचालक डॉ. जे. जी. पाटील, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका छाया हब्बू, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका अरुणा अंथोनी आदी उपस्थित होते. यावेळी एकपात्री कलाकार अवधूत कुलकर्णी व साहेबराव जाधव यांनी हास्ययोगाचे महत्त्व ही दोन पात्री लघुनाटीका सादर केली. पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाळणा, मिकी माउस अशी खेळणी व गंमतीदार खेळ होते. तसेच खाद्य पदार्थांचे 16 स्टॉल लावले होते. माध्यमिक शाळेत बॉल उचलणे, पाण्याने भरलेल्या बादलीत नाणेफेक,चॉकलेट चक्र असे गमतीशीर खेळ होते. सुमारे साडेचारशे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002