व्हीएस न्यूज - आग लागण्याच्या दुर्घटनांमुळे दिवाळीत आकाशात सोडण्यात येणाऱ्या दिव्यांवर (फ्लाईंग लॅटर्न) पुणे व मुंबई पोलीस आयुक्तांनी बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने राज्यभरात ही बंदी कायम केली असून, आकाश कंदील उडविण्याबरोबरच विक्री व साठा करण्यावर बंदी घातली आहे. आकाशात दिवे उडविल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वात पेटविल्यानंतर पॅराशुटप्रमाणे हा आकाश कंदील उंच जातो. त्यानंतर पुन्हा दिवा जमिनीच्या दिशेने येतो. हा दिवा खाली झेपावताना तो घरांच्या छतांवर तसेच झाडांवर पडतात. त्यामुळे आग लागण्याच्या घटना दरवर्षी दिवाळीदरम्यान घडतात. दिवाळी पहाट कार्यक्रमांबरोबरच रात्री उशिरापर्यंत “फ्लाईंग लॅटर्न’ आकाशात झेपावताना दिसतात. अशाप्रकारे 17 जानेवारी 2015 मध्ये उडविलेला आकाश कंदील मालाडमधील इमारतीवर ठेवलेल्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी फळ्या व इतर बांधकाम साहित्यावर पडून मोठी आग लागली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस उपायुक्तांनी आकाशात सोडण्यात येणाऱ्या दिव्यांवर बंदी घातली आहे. आकाशात दिवे सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त,नगरपालिका मुख्याधिकारी व विशेष नियोजन प्राधिकरणांच्या अग्निशमन अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आकाश कंदीलाचा वापर करुन, दहशतवादी कृत्य घडण्याची शक्यता नाकारता येत नसून, या पार्श्वभूमीवर अमेरिका, थायलंडसारख्या देशांकडूनही “फ्लाईंग लॅटर्न’वर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय अग्निशमन सुरक्षा संस्थेने देखील अशाप्रकारच्या आकाश कंदीलवर बंदी घालण्याचे समर्थन केले आहे. यामुळे महापालिका व पोलीस प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002