आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे सर्व विभागांना निर्देश; गळती रोखण्यासह पुनर्वापराच्या पाण्याला प्राधान्य
व्हिएस न्युज - पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, पाणीगळतीच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे आणि पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. या कामात दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
शहराची अंदाजित लोकसंख्या सुमारे ३८ लाख असून, दररोज जवळपास ६५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. शहराला पवना धरणातून ६.५५ टीएमसी, भामा आसखेड धरणातून २.१५ टीएमसी आणि आंद्रा धरणातून १.२९ टीएमसी असे एकूण ९.९९ टीएमसी पाणी आरक्षण मंजूर आहे. सध्या वितरण व्यवस्थेनुसार शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पाण्याची गळती रोखणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर २०२६ अखेर पवना धरणात ९७.१७ टक्के, तर आंद्रा धरणात ९५.८० टक्के पाणीसाठा होता. सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस न झाल्याने उपलब्ध पाणीसाठा आणि मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या इमारतींमधील गळतीवर लक्ष
महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, क्षेत्रीय कार्यालये, रुग्णालये, शाळा, भाजी मंडई आणि अन्य आस्थापनांमधील नळ व पाणीपुरवठा यंत्रणांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. पाणीगळती आढळल्यास तातडीने दुरुस्ती करावी, तसेच दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत संबंधित विभागांनी पाठपुरावा करावा, अशा सूचना स्थापत्य आणि पाणीपुरवठा विभागांना देण्यात आल्या आहेत.
उद्याने, मैदाने आणि स्वच्छतागृहांसाठी विशेष सूचना
शिक्षण विभागाने शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीविषयी जनजागृती करावी, तर आरोग्य विभागाने सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि अन्य ठिकाणी गरजेपेक्षा अधिक पाणी वापरले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
क्रीडा विभागाने मैदानांवर पाणी फवारण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळून आवश्यकतेनुसार प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करावा. उद्यान विभागानेही झाडांना पाणी देण्यासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
जीपीएसद्वारे तक्रारींची सुविधा; उत्कृष्ट काम करणाऱ्या प्लंबरचा सत्कार
पाणीगळतीच्या तक्रारींचे निराकरण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या समन्वयाने भौगोलिक स्थानाच्या आधारे (जीपीएस) तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तक्रारी वेळेत निकाली काढण्यासोबतच दुरुस्तीनंतर पुन्हा गळती होणार नाही, यासाठी नियमित देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रभावी कामगिरी करणाऱ्या प्लंबरचा सत्कार करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
“पाणी बचतीसाठी प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात नियमित तपासणी करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर टाळणे, गळतीच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करणे आणि उपाययोजनांचा नियमित आढावा घेणे, अशा सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत,” असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
पाणी बचतीसाठी केवळ नागरिकांनीच नव्हे, तर महापालिकेच्या प्रत्येक विभागानेही जबाबदारीने काम करावे, हा या निर्देशांमागील मुख्य उद्देश आहे. आता या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते आणि पाणीगळती रोखण्यात प्रशासनाला कितपत यश मिळते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002