तीन वर्षांनंतर सर्वसाधारण सभा; SC/ST, OBC आणि अल्पसंख्याक घटकांना प्रतिनिधित्व देण्यावर भर
व्हिएस न्युज - पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या विशेष सर्वसाधारण सभेत महिला सक्षमीकरण, सामाजिक समावेशकता आणि संघटनेच्या प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. महिला वकिलांसाठी कार्यकारिणीत ३० टक्के आरक्षण, विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व आणि बार असोसिएशनच्या घटनेत आवश्यक बदल करण्यास सभेने मान्यता दिली.
तब्बल तीन वर्षांनंतर सर्वसाधारण सभा आयोजित झाल्याने वकील सभासदांनी समाधान व्यक्त केले. सभेच्या अध्यक्षपदी ॲड. गौरव वाळुंज यांची निवड झाल्याची घोषणा बार असोसिएशनचे सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी केली. त्यानंतर विविध विषयांवर चर्चा करून सभासदांच्या सहमतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
महिला वकिलांना संघटनेच्या निर्णयप्रक्रियेत अधिक संधी मिळावी, यासाठी कार्यकारिणीत ३० टक्के आरक्षण देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच अनुसूचित जाती-जमाती (SC/ST), इतर मागासवर्गीय (OBC) आणि अल्पसंख्याक समाजातील प्रत्येकी किमान एका सभासदाला कार्यकारिणीत प्रतिनिधित्व देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. दर तीन वर्षांनी बार असोसिएशनचे अध्यक्षपद महिला वकिलांसाठी राखीव ठेवण्याचाही महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
संघटनेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी नियमावली आणि घटनेत आवश्यक सुधारणा करण्यासह नवीन बोधचिन्ह स्वीकारण्यास सभेने मान्यता दिली. मोशी न्यायालयाच्या संदर्भात ‘वन कोर्ट, वन बार’ ही संकल्पना स्वीकारण्याबाबतही ठराव करण्यात आला. सभेत मंजूर झालेले ठराव पुढील माहितीसाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सभेदरम्यान बार असोसिएशनच्या आर्थिक व्यवहारांचा आढावा, आतापर्यंत करण्यात आलेली कामे, सभासदांचे प्रश्न आणि संघटनेच्या आगामी वाटचालीवर चर्चा झाली. सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी असोसिएशनच्या जमा रकमेची तसेच केलेल्या कामांची माहिती सभासदांसमोर मांडली. ज्येष्ठ वकिलांनी सर्वसाधारण सभेचे महत्त्व अधोरेखित करत संघटनेच्या कामकाजात सभासदांचा सहभाग आणि पारदर्शकता आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटील, ॲड. एस. बी. चांडक, ॲड. सुशील मंचरकर, ॲड. दिनकर बारणे, ॲड. सचिन थोपटे, ॲड. राजेश पुणेकर, ॲड. सुनील कडुस्कर, ॲड. विलास कुटे, ॲड. किरण पवार, ॲड. सुदाम साने आणि ॲड. गोरक्षनाथ झोळ यांच्यासह अनेक ज्येष्ठ, महिला आणि युवा वकील उपस्थित होते.
ॲड. एस. बी. चांडक यांनी सर्वसाधारण सभेची गरज आणि महत्त्व स्पष्ट केले. ॲड. सुशील मंचरकर, ॲड. राजेश पुणेकर आणि ॲड. विलास कुटे यांनीही आपली मते मांडली. सभेच्या आयोजनासाठी महिला सचिव ॲड. रिना मगदूम, माजी सचिव ॲड. धनंजय कोकणे, ॲड. संकेत सरोदे, ॲड. राकेश जैद, ॲड. राजेश राजपुरोहित, ॲड. विकास शर्मा आणि ॲड. सीमा शर्मा यांनी सहकार्य केले.
“महिला वकिलांना नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देणे, विविध सामाजिक घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळवून देणे, आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणे आणि प्रत्येक सभासदाच्या हिताला प्राधान्य देणे, ही आमची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या दिशेने विशेष सर्वसाधारण सभा महत्त्वपूर्ण ठरली आहे. सर्व वकील सभासदांच्या एकजुटीच्या बळावर पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन अधिक सक्षम, प्रगतिशील आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
— ॲड. उमेश खंदारे सचिव, पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन
सभेच्या शेवटी महिला सचिव ॲड. रिना मगदूम यांनी उपस्थित सर्व वकील सभासदांचे आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002