व्हीएस न्यूज – अस्सल ग्रामीण मातीचा बाज असलेला रांगडा खेळ म्हणजे कुस्ती. ग्रामीण भागातील पैलवान व राष्ट्रीय पदक विजेता प्रसाद सस्ते याने लढतीत इराणच्या सईद महम्मद याला सहाव्या मिनिटातच निकाल डाव टाकून आस्मान दाखविले. यावर प्रेक्षकांनी अक्षरश: मैदान डोक्यावर घेतले. मोशी गावच्या सुपूत्राने मिळविलेल्या या विजयाने आकाशाला गवसणी घातली. दिवाळीच्या सुरुवातीलाच हे यश मिळविल्याने मोशीकरांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इराणचे मल्ल सहभागी होणार असल्याने कुस्तीप्रेमींना अटीतटीच्या लढती पाहण्याची संधी मिळणार होती. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून हिंद केसरी, भारत केसरी व कुस्तीप्रेमी मोशीत दाखल झाले होते. रविवारी सकाळी स्थानिक मल्लांच्या कुस्त्या झाल्या. त्यानंतर रात्री आठनंतर सुरु झालेल्या मुख्य लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातल्यात्यात इराणी मल्लांचे आकर्षण होते. आखाड्यात उतरण्यापुर्वी त्यांनी मैदानाला फेरी मारत प्रेक्षकांना अभिवादन केले. त्यांच्या या कृतीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर या लढतींपैकी मोशीगावचा सुपूत्र असलेल्या प्रसाद सस्ते आणि इराणच्या सईद महम्मद यांच्यातील लढतीकडे लागले होते. ही लढत सुरु होताच मैदानात शांतता पसरली. सर्वांचे लक्ष या लढतीमधील दोन्ही मल्लांच्या डावांच्या हालचाली टिपण्यावर होते. पहिली पाच मिनिटे या दोन्ही मल्लांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतला. सहाव्या मिनिटाला प्रसादने निकाल डाव टाकत सईदला अस्मान दाखवले. त्याचक्षणी मोशीकरांबरोबर उपस्थित कुस्ती शौकीनांनी मैदानात धाव घेत, प्रसादला उचलुन घेतले. मैदानाला फेरी मारत त्याने प्रेक्षकांच्या अभिनंदनाचा स्विकार केला.
कुस्ती मैदान मारल्यानंतर प्रसादला घरी पोचण्यास साडे नउ दहा वाजले. त्यावेळी कुटुंबियांनी त्याला औक्षण करुन ओवाळले. होमग्राऊंवर आंतरराष्ट्रीय मल्लाला चितपट केल्याचा आनंद प्रसादच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. यापेक्षाही चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेढ़ी प्रतिक्रिया त्याने यावेळी दिली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002