युवा गायक महेश काळे यांच्या गायनाने स्वरसागर महोत्सवाचा समारोप
पिंपरी चिंचवड
2018-02-06
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवात रविवारी स्थानिक कलाकारांचे नृत्य व गायन सादर करण्यात आले. या महोत्सवाचा समारोप सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या रंगतदार गायनाने झाला.
पूर्णानगर येथील शनिमंदिराशेजारील पटांगणावर गुरुवारपासून चार दिवसीय स्वरसागर महोत्सवाला प्रारंभ झाला असून त्याअंतर्गत रविवारी गायक महेश काळे यांनी आपल्या रंगतदार गायनाने रसिकांना अक्षरश: खिळवून ठेवले. मोठ्या संख्येने जमलेल्या रसिकांच्या मनावर महेशने आपल्या सुरांचे गारुड घालून त्यांना मंत्रमुग्ध केले. महेश यांनी आपल्या गायनाची सुरुवात शुद्धकल्याण रागातील ला दे ला दे सैंया चुनरिया कुसुम रंग की या बंदिशीने केली. त्यानंतर त्यांनी द्रुत लयीतील नींद न आवत आली मैं रचना सादर केली. त्यानंतर तराणा पेश केला. नंतर सादर केलेल्या घेई छंद या नाट्यगीताच्या गायनात उपस्थित रसिकांना सहभागी करुन त्यांना आपल्या साथीने गायला लावले. रसिकांनी देखील महेश यांच्या सुरात सूर मिळवून हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले. याच गाण्यात महेश यांच्या साथीला असलेल्या ड्रम, गिटार, पखवाज व तबलावादकांनी आपापली कला सादर करुन एक अप्रतिम फ्युजन सादर केले. आपल्या गायनाचा समारोप महेश यांनी 'सूर निरागस हो' या सध्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या गाण्याने केला. त्यांना यावेळी संवादिनीची साथ राजीव तांबे यांनी, तबलासाथ निखिल फाटक यांनी, पखवाजाची साथ प्रसाद जोशी यांनी, गिटारची साथ नितीन कुलकर्णी, ड्रमची साथ अभिजीत भदे व साईड रिदमची साथ सूर्यकांत सुर्वे यांनी केली. या आधीच्या सत्रात गुरु गीता शर्मा यांच्या शिष्या मैथिली निसर्गे, ऋतुजा जोशी, प्रतिभा नायर व श्रुती अय्यर यांचे सुंदर भरतनाट्यम नृत्य सादर झाले. तसेच गुरु वैशाली पळसुले-धोंगडे यांची शिष्या राजश्री धोंगडे हिचे कथ्थक नृत्य सादर झाले. अंबारी रेगे-नाईक व सानिया गोडबोले यांनी भरतनाट्य सादर केले. गुरु तेजश्री अडिगे यांच्या कलावर्धिनी नृत्यकला संस्थेच्या सुमारे तीस विद्यार्थिनीनी भरतनाट्यम नृत्य सादर केले. सकाळच्या सत्रात स्थानिक कलाकार सार्थक भोसले, बीना जैन, सतीश काळे, प्रशांत पवार, मिलाफ राणे यांचे गायन सादर झाले. पिंपरी चिंचवड संगीत अकादमीतील विविध भागांमधील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. हा कार्यक्रम सायन्स पार्क येथील सभागृहात झाला.