पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ दाम्पत्याला लुटले
पिंपरी चिंचवड
2018-02-09
व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या ज्येष्ठ दाम्पत्याला दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करत 'पुढे खून झाला आहे, दागिने काढून बॅंगेत ठेवा' असे सांगून पावणे तीन लाखांच्या दागिन्याची बॅग हिसकावून नेली. ही घटना गुरूवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास बिजलनीनगर येथील गिरीराज सोसायटी समोर घडली. याप्रकरणी 65 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व त्यांचे पती गुरूवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास बिजलीनगर येथील गिरीराज सोसायटी समोरून पायी जात होते. त्यांच्याजवळ दोन अनोळखी इसम आले. 'आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झाला असून दागिने बॅगेत काढून ठेवा' असे त्यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला सांगितले. दागिने बॅगेत ठेवताच भामट्यांनी दोन लाख 70 हजार रूपये किंमतीचे दागिने असलेली बॅग हिसकावून पळ काढला. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. देवताळे अधिक तपास करत आहेत.