व्हीएस न्यूज - स्त्री जातीचे एक महिन्याचे अर्भक पिंपरी रेल्वे स्टेशन येथे सापडले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलम गायकवाड या कामावर जाण्यासाठी सकाळी सव्वा नऊ वाजता पिंपरी रेल्वे स्टेशन येथे आल्या असता त्यांना एक महिन्याचे स्त्री जातीचे बाळ रेल्वे स्टेशनवर आढळले. बाळाजवळ दुधाची बाटली, स्वेटर आणि कपड्याचा जोड आढळून आला. गायकवाड यांनी मातेबाबत चौकशी केली असता आई मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी बाळाला पिंपरी रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द केले. हिंजवडी येथे मंगळवारी अशाच प्रकारे स्त्री जातीचे अर्भक मिळून आले होते. शहरातील पाच दिवसामध्ये अशाप्रकारेे स्त्री जातीचे अर्भक सापडणे ही चिंतेची बाब आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.