व्हीएस न्यूज - तलवारीसह घातक शस्त्रे घेवून वाहनांवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चौघांच्या दिघी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर त्यांचे दोन साथीदार पसार होण्यास यशस्वी झाले आहेत. ही कारवाई चऱ्होलीतील ताजणे मळा येथे बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास करण्यात आली.
प्रकाश राजेंद्र हळदे (वय-34, रा. महाजन वस्ती, शिरूर), गणेश श्रावण भंडारी (वय-23), असिफ इलियास शेख (वय-20), सागर पोपट हरिश्चंद्रे (वय-19, रा. बारगांव-नांदुर, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहे. तर त्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आरोपी तलवारीसह घातक शस्त्रे घेवून चऱ्होलीतील ताजणे मळा येथे थांबले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना आडवून दरोडा टाकण्याचा त्यांचा इरादा होता. दिघी पोलीसांनी चार आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून तलवारी, घातक शस्त्रे जप्त केली आहेत. त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. फौजदार भुजबळ अधिक तपास करत आहेत.