किवळेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गोळीबाराचा प्रयत्न
देहूरोड
2018-02-10
गोळी झाडताना पिस्तूल लॉक झाल्याने अनर्थ टळला
व्हीएस न्यूज - फार्महाउसवर मित्रांसोबत गप्पा मारत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. सुदैवाने गोळी झाडताना पिस्तूल लॉक झाले व गोळ्या पिस्तूलमधून जागेवर खाली पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. गोरख ऊर्फ दादा लक्ष्मण तरस (वय-42) असे हल्ला झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरूण मोरे यांनी माहिती दिली. गोरख तरस हे राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीकडून महापालिकेची निवडणूक देखील लढविली आहे. यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. सद्या त्यांचा शेतीसह हॉटेलचा व्यवसाय आहे. ते शनिवारी किवळे, उत्तमनगर येथील फार्म हाउसवर चार मित्रांसोबत सकाळी साडे अकराच्या सुमारास गप्पा मारत बसले होते. अचानक एका चारचाकी वाहनातून आलेल्या दोघांनी फार्महाउसमध्ये प्रवेश केला. तोंडाला कापड बांधलेल्या दोघांनी जवळून तरस यांच्यावर गोळीबार केला. मात्र सुदैवाने पिस्तूल लॉक झाल्याने गोळी सुटली नाही. अचानक झालेल्या या प्रकारामुळे तरस घाबरून पळून गेले. तरस यांच्या मित्रांनी आरडा-ओरडा केल्याने हल्लेखोर तेथून पसार झाले. घटनास्थळावरून दोन जीवंत काडतुसे पोलीसांनी जप्त केली आहेत. फार्महाऊस व परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला असून पोलीस त्याआधारे हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.