व्हीएस न्यूज - प्रात्यक्षिक परिक्षा अवघड गेल्याने बारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार बोपखेल येथे बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.
अपेक्षा अनिल ठुबे (वय 18, रा. गणेशनगर, बोपखेल, पुणे) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत होती. तर तिचे वडील जबलपूर येथे सैन्य दलात कार्यरत आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपेक्षा ही आपल्या आई व लहान भावासोबत बोपखेल येेथे भाड्याच्या घरामध्ये राहतात. अपेक्षाची बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु आहेत. अपेक्षाला एक प्रात्यक्षिक परीक्षा अवघड गेली, त्यामुळे तिला नैराश्य आले. याबाबत तिने वडीलांना सांगितले होते. बुधवारी घरातील सदस्य बाहेर गेल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास तिने घरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.