स्थायीच्या दोन जागांसाठी राष्ट्रवादीचे 21 नगरसेवक इच्छूक
पिंपरी चिंचवड
2018-02-18
दोन माजी महापौर, एक माजी स्थायी समिती सभापतींचा समावेश
व्हीएस न्यूज - महापालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या स्थायी समितीमध्ये रिक्त झालेल्या दोन जागांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 38 नगरसेवकांपैकी तब्बल 21 जण इच्छूक आहेत. दोन माजी महापौर, एक माजी स्थायी सभापतीनेही अर्ज केला असून यामधून दोन जणांची निवड करणे राष्ट्रवादीपुढे आव्हान ठरले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये नुकतेच आठ सदस्य चिठ्ठीव्दारे बाहेर पडले आहेत. यामध्ये भाजपाचे सहा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन सदस्यांचा समावेश आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने स्थायी समित सदस्यांसाठी इच्छूकांडून अर्ज मागविले होते. स्थायीच्या आठ सदस्यांची येत्या मंगळवारी पालिकेच्या सर्व साधारण सभेत निवड होणार आहे. राष्ट्रवादीकडून दोन जागांसाठी माजी महापौर वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, माजी स्थायी समिती सभापती सुमन पवळे यांच्यासह नगरसेविका गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर, सुलक्षणा धर, पौर्णिमा सोनवणे, निकीता कदम, स्वाती काटे, विनया तापकीर, उषा काळे, संगिता ताम्हाणे, नगरसेवक शाम लांडे, राजू बनसोडे, जावेद शेख, विनोद नढे, संतोष कोकणे, रोहित काटे, पंकज भालेकर, प्रविण भालेकर, राहूल भोसले यांचा समावेश आहे. स्थायी समितीमध्ये प्रत्येक सदस्याला विकास कामात टक्का मिळतो, त्यामुळे या समितीमध्ये येण्याची प्रत्येक नगरसेवकांची इच्छा असते. तथापि, महापालिकेत राष्ट्रवादीच्या 38 नगरसेवकांपैकी तब्बल 21 नगरसेवकांनी स्थायी समिती सदस्यांसाठी पक्षाकडे अर्ज केले आहेत. यामधून कोणत्या दोन सदस्यांना राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार संधी देणार हे पाहणे औत्सक्यचे ठरणार आहे.