व्हीएस न्यूज - तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातून उग्र वास आल्याने मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली. तरूणाने तीन-चार दिवसांपुर्वी आत्महत्या केल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.
रमाकर फुलचंद राजभर (रा.कुदळवाडी, चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमाकर यांचे घर गेल्या तीन-चार दिवसापासून बंद होते. मंगळवारी त्यांच्या घरातून उग्र वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी दरवाजा तोडला. रमाकर यांचा कुजलेला मृतदेह आढळून आला. रमाकर हा मित्रासोबत राहत होता. मागील काही दिवसांपूर्वी मित्र गावी गेला होता. तीन दिवसांपूर्वी रमाकर यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलीसांनी व्यक्त केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.