व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2018 हे अभियान यशस्वीपणे राबविले आहे. आगामी काळातही हे अभियान अतिशय सक्षमपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी केले.
नगरपरिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आवारे यांनी नगरपरिषदेमध्ये घेतली. या बैठकीत स्वच्छ सर्वेक्षण 2018 या अभियानाचा आढावा घेण्यात आला. गेल्याच आठवड्यात या अभियानाची शासकीय पातळीवरील समितीने मुल्यांकन पाहणी केली. या पाहणीनंतर सर्वांनी समाधानकारक प्रतिक्रिया दिल्या असल्याचे मुख्याधिकारी आवारे यांनी सांगितले.
सहा दिवस चाललेल्या या पाहणीत समितीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी नगरपरिषद राबवीत असलेल्या अभियानाची कागदपत्रे नगरपरिषद कार्यालयात तपासली व शहरातील स्वच्छता अभियानासाठी निवडलेल्या जागांवर जाऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे शहरातील वेगवेगळया भागातील नागरिकांच्या या स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या अभियाना बाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या अधिकारी समितीने शहरातील वेगवेगळ्या भागातील 177 जागांची पाहणी केली. नागरिकांच्या 220 मुलाखती घेतल्या.
केंद्र शासन व राज्य शासनाने देश पातळीवर हे अभियान सुरु केलेले आहे. या अभियानातील स्वच्छता पाहणीचा निकाल 15 ते 30 मार्चच्या दरम्यान लागणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या सार्वजनिक संस्थाना 15 कोटी रुपये, व्दितीय क्रमांक येणाऱ्याला 10 कोटी रुपये आणि तृतीय क्रमांक येणाऱ्यास 5 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. हे अभियान असेच सक्षमपणे आगामी काळातही चालु ठेवणार आहे. याबाबत अधिकारी व कर्मचारी यांना नेमून दिलेली कामे अशीच पुढे चालू ठेवावीत अश्या सूचना मुख्याधिकारी आवारे यांनी दिल्या आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002