व्हीएस न्यूज - शहरातील अनधिकृत पोस्टर्सविरुद्ध केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी एक जण कार्यालयात येऊन जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार सत्ताधारी भाजप नगरसेवकाने पोलीस ठाण्यात केली आहे. तसेच धमकी देणारी व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळे नगरसेवकाने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
भाजपचे पिंपळेनिलख, विशालनगर प्रभागाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात एकुमसिंग कोहली (रा. दापोडी) याच्या विरोधात तक्रार दिली आहे.
नगरसेवक कामठे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एकुमसिंग कोहली हा मला सातत्याने फोन करत आहे. तसेच शहरातील अनधिकृत पोस्टर्सविरुध्द केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी प्रत्यक्ष आमच्या कार्यालयात येऊन मला दमदाटी केली. त्याने अनेक वेळा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही त्याला सौजन्याने फोनवर बोलूनसुद्धा त्याचा उर्मटपाण थांबला नाही. अनधिकृत फलकांविरुद्ध आम्ही उचललेले धोरण थांबविण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत होता.
एकुमसिंग हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असे कामठे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच मला पोलीस संरक्षण द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002