व्हीएस न्यूज - मागील वर्षी झालेल्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करु असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मंगळवारी विखे पाटील यांना मुंबईत भेटले. या शिष्टमंडळात साठेंबरोबर काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, शहर सरचिटणीस क्षितीज गायकवाड, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, बाळासाहेब साळवे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड मनपामधील गैर कारभाराविषयी माहिती देणारे निवेदन साठे यांनी विखे पाटील यांना यावेळी दिले. या निवेदनात प्रस्तावित पाणीपट्टीवाढ, कचरा उचलण्याच्या निविदेतील भ्रष्टाचार,टीडीआर मधील भ्रष्टाचार, पंतप्रधान आवास योजना निविदेतील भ्रष्टाचार याबाबत माहिती देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रस्तावित केलेली पाणीपट्टीमधील दरवाढ म्हणजे महागाईने पिचलेल्या सर्वसामान्य नागरिकांना खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. निवेदनात म्हटले आहे की, रस्ते विकासासाठी तब्बल 425 कोटी रुपयांच्या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या कामामध्ये सत्ताधारी भाजपने सुमारे 45 कोटींचा भ्रष्टाचार केल्याची चर्चा आहे. तसेच कचरा वाहतुक निविदेतही सुमारे 252 कोटी रुपयांचा जादा खर्च करून गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकेने मागील आठ महिन्यांच्या कालावधीत तब्बल 41 लाख 27 हजार चौरस फुटांचे टीडीआरचे वाटप केले असून त्याची किंमत 5300 कोटी रुपये आहे. यामध्ये ही आयुक्त आणि भाजप पदाधिका-यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. पंतप्रधान आवास योजनेतर्गत घरबांधणी प्रकल्पांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेची चौकशी व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधा-यांकडून सुरू असलेला भ्रष्टाचार आणि प्रस्तावित केलेली पाणीपट्टी दरवाढ मागे घेण्याबाबत व इतर प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक घेऊन चर्चा करु. असे आश्वासन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाला मंगळवारी मुंबई येथे दिले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002