एस न्यूज - पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात सध्या महामेट्रोच्या वतीने मेट्रो प्रकल्पांच्या दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. हे काम वीस टक्के पूर्ण झाले आहे. तर वनाज ते रामवाडी या मार्गिकेचे आठ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या वर्षभरात महामेट्रोच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या विविध कामांचा आढावा दीक्षित यांनी घेतला. महामेट्रोकडे जबाबदारी दिली गेल्याने नागपूर मेट्रोसाठी काम करणा-या अनुभवी मनुष्यबळाचा उपयोग करून पुण्यात मेट्रोच्या विविध कामांना गती देण्यात आली. गेल्या वर्षभरात पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत हॅरिस ब्रिज (दापोडी) ते पिंपरी-चिंचवड महापालिका दरम्यान काम झपाट्याने सुरु आहे. एका वर्षात या भागातील सुमारे वीस टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोचे काम पुणे शहरापेक्षा पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत वेगात सुरू आहे. शहरातील 7.20 किलोमीटर अंतराच्या मार्गावर एकूण 104 फाउंडेशन व 55 पिलरचे काम पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोच्या कामाच्या भूमिपूजनास एक वर्षे पूर्ण होत असल्याने शहरासाठी ही कामगिरी नक्कीच डोळ्यात भरणारी आहे.
शिवाजीनगर ते स्वारगेट मार्गावरील काम पावसाळ्यानंतर सुरु होईल. मेट्रोच्या वनाज ते रामवाडी व वनाज ते सिव्हिल कोर्ट असे दोन ठिकाणी काम सुरु आहे. शिवाजीनगर धान्य गोदाम ते रामवाडी आणि रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गाच्या कामाच्या निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मार्च-एप्रिलपर्यंत या दोन्ही मार्गांवरही कामे सुरू करण्याचे नियोजन आहे. राज्य व केंद्र सरकारकडून मेट्रोच्या कामासाठी 1300 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यामुळे, अवघ्या वर्षभरात प्रत्यक्ष दोन मार्गांवर काम सुरू झाले असल्याचेही ते म्हणाले.
मेट्रो प्रकल्पात येणा-या स्थानकांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या अंतर्गत संत तुकाराम नगर येथे मेट्रोचे पहिले स्थानक तयार होणार आहे. बाकी स्थानकांचे प्राथमिक स्वरुपात काम सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त असल्याने उद्योनगरीत विनाअडथळा मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. महापालिका प्रशासनासह वाहतूक पोलीस व नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने काम वेगात सुरू आहे. सर्व काम 2021 पूर्वी पूर्ण केले जाईल. वाहतूक सुरळीत राहावी म्हणून सर्व दक्षता घेण्यात येत आहे, असे पिंपरी-रेंजहिल्स मेट्रो प्रकल्पाचे प्रमुख सुनील म्हस्के यांनी सांगितले. महामेट्रोच्या कामासाठी आतापर्यंत तीनशे कोटी खर्च झाले असून मार्च अखेरपर्यंत चारशे कोटी खर्च होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विशेष म्हणजे जागतिक पातळीवर सर्वमान्य असलेल्या पुनर्रोपण पद्धतीनुसार वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार असून या पद्धतीने पुनर्रोपण केल्यास वृक्षांचा तग धरण्याचा दर हा सर्वाधिक असल्याने महामेट्रो ही पद्धत अवलंबित आहे. हे काम सुरू असताना प्रकल्पाच्या मार्गात अनेक वृक्षांचे अडथळे येत आहेत. सदर वृक्षांचे पुनर्रोपण ही संपूर्णत: महामेट्रोची जबाबदारी असून त्या अंतर्गत 86 वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 35 कोटी मिळणार आहे. मेट्रोच्या जागेच्या बदल्यात 180 कोटी महापालिकेकडून येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षण दलाची जागा मिळावी यासाठी चर्चा सुरु आहे. मेट्रो स्थानकाबरोबरच वाहनतळाचीही सोय करण्यात येणार आहे.
याबरोबरच संत तुकाराम नगर येथील मेट्रो स्थानकाजवळ नवीन फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) तयार करण्यात येणार आहे. या पुलाच्या मदतीने मेट्रो स्थानक हे दुस-या बाजूला वल्लभनगर बस स्थानक व आयटी इंडस्ट्री यांना जोडण्यात येणार आहे. सदर पुलाची लांबी ही 65 मीटर तर रुंदी 6 मीटर इतकी असणार आहे. याचा उपयोग मेट्रो स्थानकावर उतरणा-या प्रवाशांबरोबरच या भागातील पादचा-यांनाही होईल. याशिवाय हा पूल जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात येणार असून तो वास्तुस्थापनेचा उत्कृष्ट नमुना असेल, असा विश्वास दाखवत नवीन पूल बांधल्यानंतरच जुना पूल पाडण्यात येणार असल्याचेही डॉ. दीक्षित म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002