व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील रेडझोनची हद्द कमी करणे, मावळ येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मिसाईल प्रकल्पासाठी अधिग्रहण केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांची खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मंगळवारी भेट घेत चर्चा केली.
या शिष्टमंडळात आमदार बाळा भेगडे, देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाअध्यक्ष विशाल खंडेलवाल, सुदाम तरस, कैलास पानसरे, मदन सोनिगरा, निवृत्त ब्रिगेडियर एस. के. मोहन उपस्थित होते. मावळ, पिंपरी चिंचवड भागातील रेड झोनची हद्द कमी करण्यासंदर्भात तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बरोबर 17 मार्च 2014, 16 मार्च 2016 व एप्रिल2016 रोजी बैठक झाली होती. त्या बैठकीच्या दरम्यान ऑगस्ट 2017 पर्यंत रेड झोनबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन पर्रीकर यांनी दिले होते. परंतू पर्रीकर यांना गोव्यात परत जावे लागले. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या बरोबरही या अगोदर दोन बैठका झाल्या आहेत. सबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून या प्रश्नाबाबत त्या माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा खासदार बारणे यांनी शिष्टमंडळासमवेत संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली.
या बैठकीत रेड झोनची हद्द कमी करण्याबरोबरच मावळ येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मिसाईल प्रकल्पासाठी अधिग्रहण केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा या मागणीवर चर्चा झाली. याबाबत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रश्नासंदर्भात आजून काही काळ लागणार असल्याचे सांगितले. या दोन्ही प्रश्नांबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून रेड झोनची हद्द कमी करणे हा देश पातळीवरील निर्णय असल्यामुळे यासाठी काही काळ जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच मिसाईल प्रकल्पाच्यासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्याचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने त्यामध्ये महाराष्ट्र सरकार जर सकारात्मक भूमिका घेणार असल्यास तोही विषय मार्गी लावण्यास मदत करणार असल्याचे खासदार बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002