व्हीएस न्यूज – त्रिपुरा, आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालॅंड, सिक्कीम या पूर्वोत्तर सात राज्यातील कलाकारांनी अप्रतिम सौंदर्यपूर्ण नृत्ये सादर करुन रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. नंदकिशोर कल्चरल सोसायटी व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निगडीतील नंदकिशोर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात सात राज्यातील अडीचशे कलाकारांनी सहभाग घेतला. यावेळी सीआरपीएफचे उपकमांडंट सचिन गायकवाड, राज्य निदेशक संध्या देवताळे,मुख्य समन्वयक यशवंत मानखेडकर, पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शैलजा मोरे, प्रसिध्द कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका अश्विनी बोबडे,माजी नगरसेविका सुलभा उबाळे, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, सामाजिक कार्यकर्ते दीपक मोढवे पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. नंदकिशोर कपोते यांच्या शिष्यांनी गणेश वंदना, कथक रंगमंच प्रणाम, तराना, नादी आदी विविध नृत्य प्रकार सादर केले. यानंतर बाहेरील राज्यातून आलेल्या कलाकारांचे सादरीकरण सुरु झाले. प्रथम त्रिपुरा राज्यातील कलाकारांचे सुंदर लोकनृत्य झाले. आसाम येथील कलाकारांनी पारंपारीक बिहू नृत्य सादर करत दाद मिळवली. मिझोराम राज्यातील कलाकारांनी सरलाम काई व तलंगलाम ही आकर्षक नृत्य सादर केली. अरुणाचर प्रदेशातील कलाकारांनी भुरी नाईझिर नृत्य पेश केले. मणिपूर राज्यातील कलाकारांनी अभिसार, खांबा थोईबी, मार्शल आर्टसह मिटी जागोई अशी विविध नृत्ये सादर करुन उपस्थित रसिकांची मने जिंकली. नागालॅंड राज्यातील कलाकारांनी नृत्याव्दारे स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवले. सिक्कीम राज्यातील कलाकारांनी नेपाली व लेपचा नृत्य सादर करुन रसिकांना डोलायला लावले.
कलाकारांची महापालिकेला भेट…
मणिपूर, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा व नागालॅंड या पूर्वोत्तर राज्यातील कलाकारांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट दिली. उपमहापौर शैलजा मोरे,आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्या अनुराधा गोरखे, डॉ. नंदकिशोर कपोते, संध्या देवतळे, यशवंत मानखेडकर, व्ही. डी. काळे, कुसूम ससाणे, कार्यालयीन अधिक्षक हरी ठाकरे, संजय कुरणे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी प्रवीण निकम, दहा वर्षांचा बाल शास्त्रज्ञ हेमांग येलोरे आदी उपस्थित होते. श्रावण हर्डीकर व एकनाथ पवार यांनी कलाकारांशी संवाद साधला. सूत्रसंचालन यशवंत मानखेडकर यांनी केले. रमेश भोसले यांनी आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002