व्हीएस न्यूज - किरकोळ कारणावरून दोन सराईत गुन्हेगारांना मारहाण करत एकावर गोळीबार केला. ही घटना वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जयवंत भगवंत चितळकर (वय-30) आणि निलेश कोळपे (दोघेही रा. तुकारामनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. चितळकर याच्यावर चार तर कोळपे याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. चितळकरला चिंचवड पोलिसांनी डिसेंबर 2017 पर्यंत तडीपार केले होते.
याबाबत चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी माहिती दिली. चितळकर आणि कोळपे वाल्हेकरवाडीमधील शिवाजी चौकात बसले होते. त्यांनी दुचाकी रस्त्यात पार्क केली होती. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना अडथळा येत होता. एका मोटार चालकाने रस्त्यात लावलेली दुचाकी काढण्यास सांगितले. यावरून मोटार चालक आणि जखमींमध्ये वाद झाला. काही वेळाने मोटार चालकाने
साथीदारांना घेवून येत कोळपे व चितळकर यांना मारहाण केली. चितळकर याच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्याच्या डाव्या दंडाला गोळी लागली आहे.
घटनास्थळावर परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनायक साळुंखे आदींनी भेट दिली. फौजदार आर. बी. सोडनवार अधिक तपास करीत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002