व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालयासाठी लोगो बनवा स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यत मुदत होती. ही मुदत वाढवून 10 नोव्हेंबर 2017 करण्यात आली आहे.
महापालिकेतर्फे निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचा बृहत् विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने विविध विकासकामे सध्या सुरू आहेत. स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने प्राणिसंग्रहालयाचा नवीन लोगो बनविण्याचे प्रस्तावित होते.
स्पर्धेतील विजेत्या लोगोकरिता 15 हजार रुपये आणि 5 हजार रुपयांची प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धा नागरिकांसाठी खुली असून; व्यावसायिक, विद्यार्थी, हौशी कलाकार या स्पर्धेतून आपल्या कल्पना मांडू शकतात. स्पर्धेतील विजेता लोगो निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचा अधिकृत लोगो म्हणून स्वीकारण्यात येणार आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर या स्पर्धेच्या प्रवेशिका उपलब्ध आहेत; तसेच स्पर्धकांनी तयार केलेले लोगो आणि प्रवेशिका ऑनलाईन पद्धतीने zoopcmcindia.gov.in या “ई-मेल’वर “जेपीईजी’ किंवा “पीडीएफ’ स्वरूपात 10 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. याविषयीची सविस्तर माहिती www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन, बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय या पानावर उपलब्ध आहे.