व्हिएस न्यूज - जनावरांच्या गोठ्यात काम करणाऱ्या तरूणाला बैलाने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास काळेवाडी येथे घडला. शशिकांत चिरोजीलाल धोबी (वय-22,रा. आदर्शनगर, काळेवाडी) असे बैलाच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत काळेवाडी मधील स्मशानभूमीजवळ असलेल्या ग्यानसिंग यादव यांच्या गोठ्यात कामाला आहे. शुक्रवारी तो स्वच्छतेचे काम करत असताना बैलाने त्याला धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. शशिकांतला तात्काळ उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.