सखोल चौकशी करण्याचे सहकार आयुक्तांचे आदेश
व्हीएस न्यूज - अण्णासाहेब मगर सहकारी बँकेत कर्जवाटप, आर्थिक व्यवहार, जागा खरेदी, वाहन खरेदी, इमारत बांधकाम यांसाख्या बाबींमध्ये अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचे तक्रार बँकेचे सभासद राहुल गव्हाणे यांनी केली होती. त्या आधारे केलेल्या चाचणी लेखापरिक्षणात नियमबाह्य कारभार आढळून आल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याचे सहकार आयुक्त व सहकार निबंधक डॉ. विजय झाडे यांनी दिले असल्याची माहिती बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अण्णासाहेब मगर सहकारी बँकेबाबत राहुल गव्हाणे यांनी बँकेच्या इमारतीच्या बांधकामासह अनेक बाबीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार सहकार आयुक्तांकडे केली होती. तसेच, बँकेचा कारभार एकाधिकारशाहीने व गैरपध्दतीने सुरू असल्याचेही म्हटले होते. त्या आधारे सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१(३क) नुसार बँकेचे चाचणी लेखापरिक्षण करण्याचे आदेश दिले होते. विशेष लेखापरिक्षक डी. एच. डोके यांनी केलेल्या चाचणी लेखापरिक्षणाच्या अहवालात संचालक मंडळ,अधिकारी वर्गाच्या कामकाजातील गंभीर चुका व नियमांचे पालन न केल्याचे समोर आले. परंतु, त्यावर बँकेने कुठलीही सुधारणा केली नाही.
त्यानंतर चाचणी लेखापरिक्षणाच्या अहवालानुसार आढळून आलेली अनियमितता, बँकेचे कामकाज आणि आर्थिक स्थिती यांची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ प्रमाणे सखोल चौकशी करण्याचे आदेश २५ मे २०१८ रोजी सहकार आयुक्तांनी दिले. त्यासाठी सहकारी संस्थेचे सहायक निबंधक श्रीकांत श्रीखंडे यांची प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चाचणी लेखापरिक्षणात आढळून आलेल्या मुद्यांच्या आधारे ही चौकशी करण्यात येणार आहे.
चौकशी आदेशात प्रामुख्याने बँकेने कार्यालयासाठी केलेली जागा खरेदी, इमारत बांधकाम कामासाठी देय नसताना ठेकेदाराला २.५३ कोटी रुपये ज्यादा अदा करणे, बँकेचे चेअरमन यांच्या नातेवाईकांना व संबधितांना कर्जवाटपात झालेली अनियमिततेची चौकशी करण्याचे नमदू करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त फर्निचरचे कामकाज, फॉर्च्युनर वाहन खरेदी,वाहनाच्या आकर्षक क्रमांकासाठी ७५ हजार रुपये बँकेच्या नावाने भरणे,कर्जदार मे. आशा असोसिएटसचे प्रवर्तक अरविंद सोळंकी यांना नियमबाह्य पध्दतीने अॅडव्हान्स देणे, बँकेचा आकुर्डी, शिंदे, वसुली, संगमनेर, दिघी व मांजरी शाखांचा जानेवारी २०१८ अखेरचा तोटा, कर्जदार एन. एच. गव्हाणे यांना ऑडी कार खरेदीसाठी ४० लाख कर्ज मंजुरी व विनियोगातील अनियमितता या गंभीर बाबींची चौकशी केली जाणार आहे.
त्याबरोबर बँकेचे चेअरमन यांनी त्याचे मालकीचे हॉटेल युवराज या नावाने चालू खात्यामध्ये २०१६ मध्ये १४ अवैधरित्या झालेले व्यवहार तर, बँकेच्या संबधित अधिका-यांनी चेअरमन यांच्या चालू खात्यातून शिल्लक नसताना अनेक चेक पारीत केले आहेत. तसेच, बँकेच्या नोकरभरतीसंदर्भात चेअरमनच्या १७ नातेवाईकांना भरती करून घेणे, तसेच इंफोसिस्टीमव्दारे नोकरभरती करणे, आकृतीबंध नसणे, मान्यता न घेणे, योग्यरित्या जाहिरात न देणे या गोष्टींची चौकशी होणार आहे. तसेच, बँकेचे शाखा व्यवस्थापक नितीन तापकीर यांना पात्राता नसताना दिलेल्या पदोन्नती व तापकीर यांच्या पत्नीच्या खात्यातून अवैधरित्या चेअरमन यांच्या खात्यात ११ लाख वर्ग केल्याची कार्यवाही आणि कॉसमॉस बँक खात्यावरील व्यववहाराच्या प्रलंबित नोंदींची देखील चौकशी होणार आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002