व्हीएस न्यूज – येरवडा येथील पुणे महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालय परिसरामध्ये अस्वच्छा पसरली आहे. रुग्णालयाचा वाहनतळ मद्यपींचा अड्डाच बनला असून, दारुच्या बाटल्यांचा खच वाहनतळामध्ये साचला आहे. रुग्णालयामध्ये नागरिक खासगी वाहने आणून लावली जातात. त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, तर मारहाण करून शिवीगाळ केली जाते, असे सुरक्षारक्षकाने सांगितले आहे.
रुग्णालयामध्ये दररोज २५ ते ३० जण रुग्णालयाच्या वाहनतळामध्ये दारु पित बसतात. त्यामुळे रुग्णालयाची सुरक्षा धोक्यात आली आहे. राजीव गांधी रुग्णालयामध्ये येणाऱ्या महिला व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मद्यपी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही दमदाटी करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, त्यांच्यावर अद्याप कोणीही कारवाई करीत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यासंदर्भात नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे की, रुग्णालयात काम करताना कोणी अडथळा आणत असेल, आणि परिसरात कोणी दादागिरी करीत असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी येरवडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कदम यांच्याकडे केली आहे. याप्रसंगी, सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे, शैलेंद्र भोसले, महंमद शेख, आकारश घुमे उपस्थित होते. दरम्यान, कदम यांनी रुग्णालय परिसरात गस्त वाढवून कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहेत.