व्हीएस न्यूज – हेल्पलाईन, संकेतस्थळ, मेल, मोबाईल ऍपनंतर आता व्हॉट्स ऍपवरूनही शहरातील नागरिक आता आपल्या तक्रारी पालिका दरबारी पोहचवू शकणार आहेत. समाजमाध्यमात सर्वाधिक वापर व्हॉट्स ऍपचा मानला जातो, त्यामुळे हे माध्यम प्रभावी ठरण्याची शक्यता पाहता पालिकेने तक्रारींसाठी 9922501450 हा व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर केला आहे. मात्र, आता तक्रारदारांना सुरुवातीला नोंदणीकामी आपले नाव व पूर्ण पत्ताही द्यावा लागणार आहे. पिंपरी महापालिकेने शहरातील नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी, तसेच महापालिका कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. प्रामुख्याने सारथी हेल्पलाईनला पालिका व नागरिक यांच्यातील दुवा म्हटले जाते. तसेच, संकेतस्थळ, एसएमएस, मेल, लोकशाही दिन, मोबाईल ऍप, किऑक्स या माध्यमातून नागरिकांना तक्रारी करता येतात. त्यात आणखी भर पडली असून पालिकेने 9922501450 या क्रमांकावर व्हॉट्स ऍपद्वारे तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे.