व्हीएस न्यूज – पिंपरी चिंचवड पालिकेने खरेदी केलेले बीन्स कंटेनर संशयांच्या जाळ्यात आले आहेत. या खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाचे शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनीच एका निवेदनाद्वारे केला आहे. पुणे महापालिकेने देखील अशाच प्रकारचे कंटेनर खरेदी केले होते. पिंपरी चिंचवड महापालिकेने मात्र पुण्याच्या दुप्पट दराने हे कंटेनर विकत घेतले आहेत. या प्रकरणातील संबंधित ठेकेदार आणि प्रशासनातील अधिकारी याला जबाबदार असून त्यांच्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणास वाचा फोडणारे भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे, परंतु सोबतच सत्ताधारी पक्षाला प्रशासनाने अंधारात ठेवल्याचे सांगून पक्षाची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न ही ते करत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे अमोल थोरात यांनी याबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी 4.5 घनमीटरचे कंटेनर खरेदी करण्यात आले. त्यासाठी महापालिकेच्या भांडार विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आणि एकूण 230 कंटेनर खरेदी करण्यात आले. आरोग्य विभागासाठी 4.5 घनमीटरचे एकूण 230 कंटेनर खरेदीची निविदा प्रसिध्द केली. यात मेसर्स निर्मिती इंजिनिअरिंग कार्पोरेशन आणि रेखा इंजिनिअरिंग या दोन पुरवठादार ठेकेदार संस्थांनी निविदा भरल्या. संबंधित पुरवठादार ठेकेदारांनी कंटेनरचा प्रति नग दर 74 हजार 777 रुपये असा दिला.
ऑनलाईन आणि गुप्त पध्दतीने राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत दोन पुरवठादारांनी सादर केलेले दर तंतोतंत एकसारखे असणे अशक्य असते. मेसर्स निर्मिती इंजिनिअरिंग कार्पोरेशन आणि रेखा इंजिनिअरिंग या दोन पुरवठादार ठेकेदार संस्थांकडून आलेले दर संशयास्पद आहेत, असे थोरात यांनी म्हटले आहे. महापालिका अंदाजपत्रकीय दरानुसार 1 कोटी 75 लाख 95 हजार रुपये किंमतीची निविदा होती. मात्र, निविदाकारांकडून एक कोटी 71लाख 75 हजार 710 रुपये असा लघुत्तम दर प्राप्त झाला. पालिकेच्या अंदाजपत्रकीय दरानुसार सदरचा दर 2.38 टक्क्यांनी कमी होता. त्यानुसार मेसर्स निर्मिती इंजिनिअरिंग कार्पोरेशन या पुरवठादार ठेकेदार संस्थेकडून 115 आणि रेखा इंजिनिअरिंग या पुरवठादार ठेकेदार संस्थेकडून 115 असे एकूण 230 कंटेनर 74 हजार 777 रुपये प्रति नग दराप्रमाणे खरेदी करण्यात आले.
लघुत्तम निविदाकार हा निकष लावत मेसर्स निर्मिती इंजिनिअरिंग कार्पोरेशन या पुरवठादार ठेकेदार संस्थेला 85 लाख 87 हजार 855 रुपये आणि रेखा इंजिनिअरिंग या पुरवठादार ठेकेदार संस्थेला 85 लाख 87 हजार 855 रुपये अशा पध्दतीने निविदा विभागून देण्यात आली होती. मात्र, पुणे महापालिकेने 3.8 घन मीटरचे बिन्स कंटेनरची नुकतीच खरेदी प्रति नग 34 हजार रुपये दराने केली. ज्याअर्थी 3.8 घनमीटरचा कंटेनर केवळ 34 हजार रुपयांना उपलब्ध होत आहे, त्याअर्थी 4.5 घनमीटरचा कंटेनर 40 हजार रुपये दरात सहज उपलब्ध होऊ शकतो; मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 4.5 घनमीटरच्या बिन्स कंटेनरच्या प्रति नगासाठी 74 हजार 777 रुपये दर देण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या तुलनेत दुप्पट दराने ही खरेदी होत असल्याचे यातून दिसून येते, असे थोरात यांनी म्हटले आहे.
अधिकारी, ठेकेदारांवर कारवाईची मागणी
कंटनेर खरेदी प्रक्रियेत घोटाळा झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन यातील संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर आणि कंटेनरचा चुकीचा तपासणी अहवाल देणाऱ्या मोरवाडी आयटीआयच्या संबंधित निदेशक, प्राचार्य आदींवर योग्य कारवाई करण्यात यावी. या सर्वांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. संबंधित निविदाकार अर्थात पुरवठादार ठेकेदार संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, चुकीचा दर देऊन भ्रष्टाचार केला आहे. तसेच पालिकेची आर्थिक फसवणूक करून आणि निविदेतील अटी-शर्तीनुसार दर्जेदार मालाचा पुरवठा न केल्याप्रकरणी संबंधित पुरवठादार ठेकेदार संस्थांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. ठेकेदारांकडून खरेदी व्यवहारातील रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002