व्हीएस न्यूज – महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील सापांसाठी हाफकिन ही संस्था 75 पैसे दराने उंदीर देण्यास तयार असताना पालिका प्रशासन जीबी एन्टरप्रायझेस या खासगी संस्थेकडून 138रुपयाला एक उंदीर कशासाठी खरेदी करते? असा सवाल पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी उपस्थित केला आहे. या सर्व प्रकारामध्ये संबंधितांनी लाखो रुपयांचा घोटाळा केला असून प्राणी संग्रहालयातील अनागोंदी कारभाराची आयुक्तांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी अध्यक्ष वाघेरे यांनी केली आहे.
प्राणी संग्रहालयातील सापांसाठी खाद्य म्हणून पालिकेतर्फे उंदरांची खरेदी केली जाते. शहरातीलच हाफकिन ही संस्था एक उंदीर 75 पैशात देण्यासाठी तयार असताना जीबी एन्टरप्रायझेस या खासगी संस्थेकडून तब्बल 138 रुपयाला एक उंदीर खरेदी करण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त दैनिक प्रभातने प्रसिध्द करून हा अनागोंदी कारभाराला वाचा फोडली. त्यानंतर शहरातील सामाजिक संघटना, विरोधी पक्षातील नेत्यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे. यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप अध्यक्ष वाघेरे यानी केला आहे. याशिवाय बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात पालिकेने अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नाहीत. त्यामुळे येथील अजगर, मगरीची पिल्ले, मांडूळ यासारख्या प्राण्यांची चोरी झाली आहे. यासारख्या घटना थांबविण्यासाठी सुरक्षारक्षकांची, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असताना इतर गोष्टींवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे.
पालिकेने प्राणी संग्रहालयातील नियम पायदळी तुडवत एका कर्मचाऱ्याला संग्रहालयाच्या आवारातच राहण्यासाठी घर उपलब्ध करुन दिले आहे. याविषयी अधिक माहिती देण्यास संबंधित उद्यानातील अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे वरील प्रकरणाची तत्काळ चौकशी करुन संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ही संजोग वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002